Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 26 July 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ जूलै
२०२३ दुपारी १.०० वा.
****
मणिपूर मुद्यावरुन लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.
काँग्रेसचे गौरव गोगई यांनी हा प्रस्ताव दिला असून, तो स्वीकारल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. या प्रस्तावावर चर्चेचा
दिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने ठरवला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास असल्याचं, संसदीय
कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी
बोलत होते. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यासंदर्भात बोलताना, सरकार
मणिपूरवर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं.
****
मणिपूर मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच या मुद्यावर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरु केली.
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुनही गदारोळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज
१२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर, मणिपूर मुद्यासंदर्भात काही प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचं सभापती जगदीप धनखड
यांनी सांगितलं. सरकार यासंदर्भात चर्चेसाठी तयार असल्याचं ते म्हणाले. मात्र विरोधी
पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे
राज्यसभेचं कामकाजही दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
****
बोगस खते आणि बियाण्यांच्या विक्रीसंदर्भात या अधिवेशनात कायदा आणणार असल्याचं
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते आज प्रश्नोत्तराच्या तासात
बोलत होते. बियाणे तयार करणारा हा मुख्य आरोपी असेल, आणि संबंधित विक्रेता किंवा कृषी सेवा केंद्रांनी शेतकर्यांना फसवून हे बियाणे
विकले असतील, तर या केंद्रांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात प्रस्तावित असल्याचं मुंडे
यांनी सांगितलं.
पुढच्या खरीपाच्या हंगामापर्यंत कृषी विभागासाठी डॅशबोर्ड तयार करण्याचा विचार
असून, त्यावर कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व वस्तुंची इत्यंभूत माहिती समाविष्ट करण्याचा
प्रयत्न राहील, असं देखील मुंडे यांनी सांगितलं.
****
इगतपुरी तालुक्यात आदिवासी गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यानं तिचा
मृत्यू झाला, तसंच पालघर जिल्ह्यात अन्य गर्भवती आदिवासी महिलेला पुराच्या पाण्यातून वैद्यकीय
मदतीसाठी जावं लागलं, या मुद्द्यावर विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिला. मात्र अध्यक्षांनी
तो नाकारुन, यावर सरकारने निवेदन करण्याची सूचना केली. यासंदर्भात निवेदन आणि गरज वाटल्यास
चर्चा करु, विरोधकांनी राजकारण करु नये, असं उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी या मुद्यावरुन
सभात्याग केला.
****
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. १९९९ मध्ये लडाखमधल्या उत्तर कारगिल युद्धातल्या
वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या
लढाईनंतर लडाखमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला होता. यानिमित्त
कारगिल मधल्या द्रास इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी द्रास युद्ध स्मारकावर युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना
आदरांजली वाहिली.
दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र
अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना
अभिवादन केलं. या सैनिकांची शौर्यगाथा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना
आदरांजली वाहिली असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
****
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केलेल्या लेखी सूचनेनंतर लाचलुचपत
प्रतिबंधक विभागातर्फे भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची चौकशी सुरु करण्यात
आली आहे. त्याबद्दलचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
****
रायगड जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हा
प्रशासनानं शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी
मदत आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नदी, खाडी काठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु
असून, धरण पूर्ण भरलं आहे.
****
No comments:
Post a Comment