Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं
कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार - विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम
गोऱ्हे यांची माहिती.
·
मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी
एक खिडकी योजना पारदर्शक हवी - विरोधीपक्ष
नेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी.
·
आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी
आणखी एकाला अटक.
आणि
·
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान
तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू
राहणार असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. आज
मुंबईत विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती गोऱ्हे बोलत
होत्या. दरम्यान, मुंबईत आझाद मैदानात गिरणी कामगारांचं आंदोलन
सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी
या बैठकीत केली.
****
राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीस चालना मिळावी यासाठी मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी
एक खिडकी योजना पारदर्शक असावी, अशी मागणी विधान परिषदेतले
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. ते परिषद सभागृहात उद्योग विभागानं मांडलेल्या
मैत्री विधेयकावर बोलत होते. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात उद्योगांना जास्तीतजास्त
सवलती देण्यात याव्यात, असं दानवे म्हणाले. अन्य राज्यांत उद्योगांना
लागणाऱ्या परवानग्या २४ तासांत दिल्या जातात. आपल्या राज्यात उद्योजकांना यासाठी आठ
महिन्यांपर्यंत थांबावं लागतं, अशी टीका त्यांनी केली. उद्योजकांना
परवानग्या काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अधिकारी
त्यांना फेऱ्या मारायला लावतात, असा आरोप त्यांनी केला. तेलंगणा,
गुजरात, राजस्थान आदी राज्यांत कशाप्रकारे उद्योगांना
पोषक वातावरण दिलं जातं, त्याचा आदर्श आपल्या राज्यानं घेण्याची
आवश्यकता असल्याचं दानवे यांनी नमुद केलं. राज्यात उद्योगांना वीज अतिशय महागड्या दरानं
दिली जाते. आपल्या राज्यातल्या मराठी उद्योजकांवर राज्यात अन्याय होत असल्यानं उद्योग
अन्य राज्यात नेले जात असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
****
राज्यात सर्पदंशावरच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब
थोरात यांनी विधानसभेत केला आहे. रायगडच्या पेण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरचं
औषध उपलब्ध नसल्यामुळं बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याची टीका त्यांनी केली. सर्पदंशावरचं औषध उपजिल्हा
रुग्णालयात ठेवणं सक्तीचं असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते का
उपलब्ध नव्हतं याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच यात बेजबाबदार
आणि बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज पुढं
चालवू नये, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या
विरुद्ध कडक कारवाई करणार असून या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या
ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या
चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला
असून संबंधिताची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात येईल, असं
फडणवीस म्हणाले.
****
राष्ट्रीय अन्वेषण संस्था- एनआयएनं दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी
आज आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी राज्यातून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता
पाच झाली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिल्या
प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा इथं छापा टाकून डॉ. अदनान अली
सरकार या ४३ वर्षीय आरोपीला त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराच्या
झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक
अपराधी सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यावरुन त्याचे या दहशतवादी संघटनेशी असलेले
संबंध आणि तरुणांना फसवून भरती करत दहशतवादी संघटनेच्या हिंसक कार्यक्रमाला चालना देण्यातली
त्याची भूमिका स्पष्ट झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. हा आरोपी आयएसआयएसच्या कटाचा भाग
म्हणून देशाच्या सरकारच्या विरोधात युद्ध पुकारात होता, असंही एनआयएतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागानं पुढचे दोन दिवस
नांदेड तसंच ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग,
कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा,
गोंदिया या जिल्ह्यांसाठी नारंगी बावटा फडकवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान
विभागानं लाल बावटा फडकवला आहे. त्यामुळं या भागात अती मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर
सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हृयाच्या सर्व भागात आज दुपारीही मुसळधार
पाऊस कोसळला. सिरोंचा तालुक्यातल्या प्राणहिता आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत
वाढ होणार आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातल्या सर्व
शैक्षणिक संस्थांना उद्या आणि परवा सुटी जाहीर केली आहे.
****
भारतीय डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं २०१८ पासून अमेरिकेनं
इथल्या डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि प्लांट कॉरंटाईन
इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून २०२२ पासून ही निर्यात बंदी उठली
आहे. ती उठल्यानंतर आज प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाची ४५० खोकी म्हणजे १५० किलो
डाळिंब विमानानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं पाठवण्यात आलं. कृषी आणि प्रक्रिया केलेले
अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापक विनिता सुधांशू यांनी या
गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या निर्यातीनंतर अमेरिकेतली डाळिंबाची मोठी बाजारपेठ भारतासाठी
खुली होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यात १४ हजार कृषी समृद्धी केंद्रांतून शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणार असल्याचं
भारताय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील सीकर इथं झालेल्या कृषी केंद्रांच्या लोकार्पण
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज नाशिक कांदा-बटाटा भवनमध्ये करण्यात आलं. यानिमित्तानं
नाशिकमध्ये बावनकुळे यांच्या उपस्थितीत कृषी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी
ते बोलत होते. शेतकऱ्यांची विविध कारणांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे केंद्र सर्वोत्तम
पर्याय ठरणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या वडगावच्या आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी
शाळेत आज सकाळी २६ विद्यार्थ्यांना अल्पोपहारातून विषबाधा झाली. या शाळेत ४०० विद्यार्थी
शिक्षण घेतात. सकाळी अल्पोपहार झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांना तात्काळ अचलपूर इथल्या
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार
या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून
सुरुवात होत आहे. पहिला सामना आज बार्बाडोस इथं खेळला जाणार असून, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला
दुसरा सामना याच मैदानावर शनिवारी होणार आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या
एक ऑगस्ट रोजी त्रिनीदाद इथं होईल.
****
उस्मानाबाद इथं आज ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व लिंगनिदान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसंच वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव यांनी यावेळी गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूणाचे गर्भपात होत असेल तर याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं संपर्क करुन माहिती देण्याचं आवाहन केलं. जिल्हा डाँक्टर संघटना आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी औरंगाबाद इथल्या केंद्रीय
विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचं विद्यालयाचे प्राचार्य अनिल
यादव यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रीय विद्यालयात पी एम श्री, विद्या प्रवेश, बालवाटिका, निपूण
भारत, परख, कौशल्य विकास, पी एम इ विद्या आणि विद्यांजली पोर्टल या शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment