Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 July
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ जूलै २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· ‘सर्वजन
हिताय’ ची ही भावनाच भारताची ओळख आणि शक्ती-मन की बातमधून पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· सिंगापूरच्या
सात उपग्रहांचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण
· विद्यार्थ्यांच्या
पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांचं एकच पुस्तक-शालेय शिक्षण मंत्री दीपक
केसरकर
· आयकर
भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ;काल सायंकाळपर्यंत सहा कोटीहून अधिक विवरणपत्रं दाखल
· राज्यात
पूर परिस्थितीमुळे संभाव्य साथरोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
आणि
·
भारतीय महिला हॉकी संघाला स्पॅनिश हॉकी
महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद
सविस्तर
बातम्या
‘सर्वजन हिताय’ ची ही भावनाच भारताची ओळख तसंच शक्ती असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. आकाशवाणीवरुन दर महिन्याच्या
शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा कालचा शतकोत्तर तिसरा भाग होता.
गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी, सामुहिक शक्तीच्या प्रयत्नांचं महत्त्व
विशद केलं. पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण, पर्जन्य जलपुनर्भरण तसंच जलसंधारणाचं आवाहन त्यांनी केलं.
श्रावण महिन्यातल्या सण उत्सवांबाबत बोलताना, आपले सण आणि परंपरा गतिमानता देणारे असल्याचं ते म्हणाले.
मेहरमशिवाय हजयात्रा करणाऱ्या मुस्लिम महिलांनी पाठवेल्या पत्रांचा पंतप्रधानांनी उल्लेख
केला. अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी जनतेला यावेळी केलं.
उज्जैनमधे १८ चित्रकार मिळून
भारतीय परंपरेतल्या पुराणकथांवर आधारित चित्रकथा तयार करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राजकोटचे
चित्रकार प्रभातसिंग बरहाट यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या
प्रसंगावरच्या चित्राची माहिती देत पंतप्रधानांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवानिमित्त' सुरू होत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ - ‘माझी माती माझा देश’,
या अभियानाची
देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. या अभियानात सर्वांनी सहभागी होत, अमृतकालसाठी आपण मागे चर्चा केलेल्या
‘पंच प्राण’ पूर्ततेसाठी, देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घ्यावी, आणि ही शपथ घेतानाचे सेल्फी युवा
डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
अर्थात इस्रोच्या वतीनं,
आंध्र प्रदेशातल्या
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून, सिंगापूरच्या डी. एस. - एस. ए. आर. उपग्रहासह एकूण सात
उपग्रह, काल सकाळी अवकाशात यशस्वीरित्या
प्रक्षेपित करण्यात आले. पी.एस.एल.व्ही. सी- छप्पन या रॉकेटद्वारे हे उपग्रह सकाळी
साडे सहा वाजता अवकाशात प्रक्षेपित झाले. ही कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांमधला महत्त्वाचा
टप्पा असून, व्यावसायिक स्वरुपातलं अभियानही
याद्वारे यशस्वीरित्या साध्य झालं आहे. हे प्रक्षेपण म्हणजे इस्रोच्या रिमोट सेन्सिंग
क्षमतेच्या प्रगतीचं प्रतीक आहे. डी एस-एस ए आर उपग्रहाच्या माध्यमातून खराब वातावरणात
आणि रात्रीही उत्तम दर्जाची छायाचित्रं मिळू शकतात. पीएसएलवीच्या कोर अलोन प्रकारातलं
हे १७ वं उड्डाण आहे.
****
ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक
कोंडी होऊ नये,
यासाठी आठ
पदरी रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ठाणे-नाशिक
महामार्गावर खारेगाव ते पडघा,
खडवली फाटा
या रस्त्याची काल मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. लहान वाहनांना रस्ता मिळावा याकरता
अवजड वाहनं डाव्या बाजूने चालवण्यासंदर्भात वाहनचालकांना सूचना देण्याचे, तसंच या मार्गावरील खड्डे तातडीनं
मास्टीकनं भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
महात्मा गांधी यांच्याविषयी
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध
केला असून, याविरोधात उचित अशी कारवाई
करू असं आश्वाासन दिलं आहे. ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान
सहन केला जाणार नाही,
असं फडणवीस
यांनी नमूद केलं.
दरम्यान, संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात
करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलव्दारेद्वारे अनोळखी व्यक्तीनं
धमकी दिली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. याप्रकरणी
कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
****
कामगार विभागाच्या योजनांचा
लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी
तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी
सांगितलं आहे. वर्धा इथं शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत, २२ ते ३० जुलै या कालावधीत कामगारांना
विविध योजनेचा लाभ देण्यासाठी घेण्यात आलेल्या, कामगार सेवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात, ते काल बोलत होते. उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये कामगारांची
भूमिका महत्त्वाची असते. मात्र,
या कामामध्ये
कामगारांना सन्मान मिळत नाही,
त्यांना
त्यांचा सन्मान मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहेत, असं खाडे यांनी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील
दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार
असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. नाशिक इथं काल शिक्षण विभागाच्या
अधिकाऱ्यांची आढावा बैठक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने पहिल्या
टप्प्यात ३० हजार तसंच दुसऱ्या टप्यात २० हजार शिक्षकांची भरती सुरू केली आहे. जोपर्यंत
नवीन भरती पूर्ण होत नाही,
तोपर्यंत
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेऊन विद्यार्थ्यांना
शिकवण्यात येणार असल्याचं,
केसरकर यांनी
सांगितलं.
****
या वर्षी आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या
संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती आयकर विभागानं दिली आहे. काल सायंकाळपर्यंत
सहा कोटीहून अधिक कर विवरणपत्रं दाखल झाली आहेत. काल एका दिवसात एक कोटी तीस लाख विवरण
पत्रं दाखल झाल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा
आज शेवटचा दिवस आहे.
****
जम्मू इथल्या यात्री निवासातून
एक हजार ९८४ भाविकांचा अठ्ठावीसावा जथ्था काल अमरनाथ गुहेच्या दिशेनं रवाना झाला. यातले
५६४ भाविक बालतल मार्गाने तर ४१० भाविक नुनवान पहलगाम या मार्गाने अमरनाथ ला पोहोचतील.
या वर्षीची अमरनाथ यात्रा गेल्या एक जुलै पासून सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत तीन
लाख ८३ हजार ५३४ भाविकांनी हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला
ही यात्रा पूर्ण होईल.
****
राज्यात विविध ठिकाणच्या पूर
परिस्थितीमुळे संभाव्य साथीच्या आजारांना आणि अन्य प्रकारच्या रोगराईला तोंड देण्यासाठी
राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य विभागातर्फे राज्य आणि जिल्हा पातळीवर
स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, ४९६ वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच मदत छावण्यांमध्येही
पुरेसं वैद्यकीय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा
साठा उपलब्ध करण्यात आला असल्याचं वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर कैलास बाविस्कर यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात देखील
पावसामुळे येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा तयार आहे. जिल्ह्यात ढगफुटीसारख
मुसळधार पाऊस झाला, तर मदतीसाठी दोन हजार ५०० पथकं तयार करण्यात आली आहेत. नदीकाठच्या गावात
पूर्व प्रशिक्षण, जनजागृती करण्यात आली असून, बचाव साहित्य
वितरीत करण्यात आलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत
सरासरीच्या ४० टक्केच पाऊस झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल विभागीय
आयुक्त कार्यालयानं शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परिक्षेचं आयोजन केलं होतं. गुणवत्ता सुधारण्यासाठी
घेण्यात आलेल्या या परिक्षेत फक्त ४५७ शिक्षकच हजर होते. जिल्ह्यात एकूण
१७ हजार ८७७ शिक्षकांपैकी या परिक्षेसाठी फक्त तीन हजार १८९ शिक्षकांनी नोंदणी केली
होती.
एकूण
शिक्षकांच्या तुलनेत केवळ तीन पूर्णांक ८० टक्केच शिक्षकांनी ही परिक्षा दिली.
****
पश्चिम विभागीय आंतराज्य बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघात, औरंगाबाद इथले बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुलकर्णी
याची एकेरी करता,
आणि सोनाली
मिलखेलकर यांची दुहेरी करता निवड झाली आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात संघांचा समावेश
आहे. ही स्पर्धा मध्य प्रदेशातल्या इंदूर या शहरात आठ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या दरम्यान
होणार आहे. सोनाली आणि प्रथमेश हे दोघं अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल
नेहरू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
****
भारतीय महिला हॉकी संघानं
स्पेनचा ३
-०
असा पराभव करत स्पॅनिश हॉकी महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद
पटकावलं आहे.
टेरासा
इथं काल झालेल्या या सामन्यात भारताच्या वतीनं वंदना कटारिया हिनं २२ व्या मिनिटाला, मोनिका हिनं ४८
व्या मिनिटाला आणि उदिता हिनं ५८ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. या संपूर्ण स्पर्धेत
भारतीय संघ अपराजित राहिला.
या स्पर्धेत भारताचा पुरुष
हॉकी संघ तिसर्या स्थानावर राहीला. काल झालेल्या तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात
भारतानं नेदरलँडचा दोन – एक असा पराभव केला.
****
चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या
जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे अमन सैनी आणि प्रगती या जोडीनं तिरंदाजीतल्या
मिश्र गटाचं सुवर्णपदक मिळवलं. दक्षिण कोरियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चो सुआ आणि पार्क
सेंघीयन या जोडीचा त्यांनी १५७ विरुद्ध १५६ असा पराभव केला. महिला सांघिक गटात अवनीत
कौर आणि पूर्वाशाच्या साथीनं प्रगतीने रौप्यपदक मिळवलं. नेमबाजीत २५ एम रॅपिड फायर
प्रकारात विजयवीर सिधू,
उदयवीर सिधू
आणि आदर्श सिंग यांच्या चमूनं रौप्य पदक जिंकलं.या स्पर्धांमधे चार सुवर्ण, दोन रौप्य, आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकं
मिळवून भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर
इथं विकास कामांचं भूमिपूजन काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात
आलं. या विकास कामांमध्ये अद्ययावत बसस्थानक, शंभर एकर परिसरात भक्तांसाठी रहिवासी संकुल, आणि मंदिर परिसरातल्या विकास कामांचा
समावेश आहे. बसस्थानकासाही तीन कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर असून, गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करुन
देण्यात येईल असं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार
नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असं मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं
आहे. जळकोट तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते काल रावणकोळा इथं शेतकरी, ग्रामस्थांशी बोलत होते. शासनानं
नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार,
एन डी आर
एफ निकषापेक्षा जास्त दरानं ही मदत देण्यात येईल, असं बनसोडे यांनी सांगितलं. घोणसी मंडळात अतिवृष्टीमुळे
झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना शासकीय मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तर अजूनही
कोणत्या नुकसानीचे पंचनामे राहिले असल्यास ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला
केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. अतनूर ते गव्हाण रस्त्यावरील पुलाची तसंच मरसांगवी, अतनूर इथल्या शेतीच्या नुकसानीचीही
मंत्री बनसोडे यांनी काल पाहणी केली.
****
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी
यांच्या पार्थिव देहावर काल अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचं काल
उपचारादरम्यान निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर इथं एका खाजगी रुग्णालयात
उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी
मुंबई इथल्या दवाखान्यात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
****
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या
सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना योग्य तो लाभ घेता यावा, तसंच नागरिकांमध्ये महसूल विभागाकडून
देण्यात येणाऱ्या सेवा -सुविधांबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी उद्या एक ऑगस्टच्या महसूल
दिनापासून राज्यभरात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद
असे उपक्रम घेण्यात येतील. नांदेड जिल्ह्यात महसूल सप्ताहाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्रं,
जनतेची विविध
कामं, सैनिकांची विविध कामं असे उपक्रम
जनसहभागाद्वारे राबवण्यात येणार आहेत,
अशी माहिती
जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.
****
पुण्यात हडपसर भागात अफू विक्रीसाठी
आलेल्या राजस्थान मधल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलं. मोहनलाल
मेगाराम बिष्णोई असं त्याचं नाव असून,
त्याच्याकडून
६० लाख रुपयांची तीन किलो २९ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे.
****
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी
लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं सोलापूरहून तिरूपतीकडे जाणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीला
साठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सोलापूर-तिरुपती-सोलापूर ही साप्ताहिक विशेष गाडी आता
२९ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. या साठ दिवसात या गाडीच्या तिरूपतीला जाऊन येऊन एकूण
आठ फेऱ्या होतील. इतरही काही गाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे, यामध्ये सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस
साप्ताहिक विशेष गाडीचाही समावेश आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश
ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस
पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment