Monday, 24 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना संवेदनशीलतेनं वागणूक द्यावी-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सूचना.

·      अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फीचा राज्याच्या गृहमंत्र्यांचा इशारा.

·      पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीच्या सानुग्रह अनुदानात दुपटीने वाढ.

·      ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन.

आणि

·      लिंगनिदान तसंच गर्भपातप्रकरणी बार्शी इथं आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

****

कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना संवेदनशीलतेनं आणि मानवी भावनांचा विचार करुन वागणूक द्यावी अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या आहेत. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. काही खाजगी बँका तसंच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कर्ज परतफेडीच्या प्रकरणात कडक कारवाई करत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं, त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी लोकसभेतून बँकांना या सूचना केल्या.

****

केंद्र सरकारनं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या जमा भविष्य निर्वाह निधी व्याजदरात पाच शतांश टक्क्याने वाढ केली आहे. सन २०२१-२२ साली हा दर ८ पूर्णांक १० शतांश टक्के होता तो आता ८ पूर्णांक १५ शतांश टक्के करण्यात आला आहे.

****

विरोधी पक्षांना मणिपूर प्रकरणी संसदेत चर्चा करायची नसल्याचा आरोप, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. ते आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. मणिपूर प्रकरणी सरकार चर्चा करण्यास तयार असून विरोधी पक्षांनी या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन जोशी यांनी केलं.

दरम्यान विरोधी पक्षांनी आज संसद भवन परिसरात धरणे आंदोलन करत मणीपूर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी केली. या आंदोलनात कांग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, जनता दल युनायटेडचे ललन सिंह, आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांच्यासह इतर विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केलं.

****

अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आज विधान परिषदेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत तारांकित प्रश्न विचारला, त्याला फडणवीस उत्तर देत होते. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पक्ष तसंच जातपात न पाहता कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी रमी तसंच ड्रीम इलेव्हन यांसारख्या ऑनलाइन जुगारांवर बंदी घालण्याची आणि याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटींवर कारवाईची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय देताना हे जुगार नसून ते खेळ आणि कौशल्य असल्याचं म्हटल्यामुळे यावर कारवाई शक्य नाही, मात्र जागृती करणं गरजेचं असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

****

निधीच्या बाबतीत अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला जात असून सत्ताधारी आमदारांना झुकतं माप दिलं जात आहे, असा आरोप विरोधकांनी आज विधान परिषदेत केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत सर्व आमदारांना निधीचं समान वाटप करावं अशी मागणी केली, त्याला फडणवीस उत्तर देत होते.

****

पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीचं सानुग्रह अनुदान दुपटीनं वाढवण्यात आलं आहे. आता पूरग्रस्तांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भातल्या पूरस्थितीसंदर्भात आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन केलं. त्यावेळी ही माहिती दिली. ते म्हणाले...

ज्या घरात पुरांचं पाणी शिरलं त्या सध्याच्या दरात पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई सुरु करावी आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आत्ताच सरकारने घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी तो आत्ता इथं सांगितला.

 

****

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत असून, याबाबत रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा 'एनडीआरएफ'चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री पवार उत्तर देत होते.

****

पीक विमा योजनेत विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचं, कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. मराठवाड्यात पावसाअभावी २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्यानं, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये मांडली, त्यावर मुंडे बोलत होते. २४ जुलै पर्यंत राज्यात एक कोटी चार लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असल्याची माहिती मुंडे दिली.

****

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. शंभराहून अधिक मराठी नाटकं, मराठी चित्रपट, तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी अजरामर भूमिका केल्या होत्या, तसंच ३० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केलं होतं. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात सावरकर यांनी काम केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांच्या निधनाबद्दल दु: व्यक्त केलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी इथं लिंगनिदान करून घरातच गर्भपात केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल अनंत चौरे यांच्या सदनिकेत हा प्रकार होत असल्याचं उघडकीस आलं. मागील सहा महिन्यात या ठिकाणी ३२ गर्भपात केल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. यातील आठ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

****

मणिपूर प्रकरणात दोषींवर कारवाई करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी आमदार संतोष टारफे, यांच्यासह आदिवासी समाजातील नेतेमंडळी सहभागी झाली होती.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या कचरा वेचक घंटा गाड्या येत्या एक ऑगस्टपासून फक्त ओला - सुका असं वर्गीकरण केलेला कचराच घेणार आहेत. महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छ करण्यासाठी हम होंगे कामयाब हा उपक्रम प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आला आहे. जी श्रीकांत यांनी आज स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. प्रबोधन केल्यानंतरही जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देण्यास नकार देतील, त्यांचा एकत्रित असलेला कचरा परत करण्याचे निर्देश जी श्रीकांत यांनी दिले.

****

धुळे इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि धुळे महापालिकेच्या वतीनं शहरानजिक प्रसिद्ध लळींग किल्ल्यावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत किल्ल्याच्या मार्ग आणि परिसरातील केर कचरा, प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्या गोळा करत किल्ल्याच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. महापौर प्रतिभा चौधरी यांनी स्वतः या मोहिमेत भाग घेऊन उपस्थितांचा उत्साह वाढवला. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं पोलिस निरीक्षक चौधरी यांच्या सहकार्यानं सुमारे शंभर ते सव्वाशे पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. लळिंग किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असून धुळ्यासह आणि अनेक जिल्ह्यातील नागरिक या किल्याला आवर्जून भेट देतात.

****

शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज आषाढी वारी करून शेगाव इथं परतली. काल पालखी सोहळा खामगाव शहरात पोहोचला होता. आज जिल्हाभरातले भक्त मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खामगाव ते शेगाव या १८ किलोमीटर मार्गावर प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं चहापान तसंच फराळाची मोफत सेवा देण्यात आली.

****

 

No comments: