Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
उमेद अभियानातील महिलांच्या
स्वयं सहाय्यता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ; समुदाय
संसाधन व्यक्तींचं मानधनही दुप्पट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
·
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात
आतापर्यंत विविध आपत्तींमुळे १०१ जणांचा मृत्यू.
·
मणीपूर हिंसाचार मुद्यावरून
संसदेचं कामकाज आजही ठप्प.
आणि
·
कामचुकार ग्रामसेवकांवर कठोर
कारवाईचा औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा.
****
उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ
करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज विधानसभेत यासंदर्भात केलेल्या
निवेदनात मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक गटांना ३० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय जाहीर
केला. या वाढीमुळे अतिरिक्त ९१३ कोटी रुपये निधीची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात
येणार आहे.
कर्मचारी आणि चळवळीतील समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात देखील दुप्पट वाढ मुख्यमंत्र्यांनी
जाहीर केली. आता हे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये केलं जाणार आहे. गावपातळीवरच्या
एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. यासाठी १६३ कोटी रुपये
अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली
****
राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना आता १८० दिवस काम दिलं जाईल त्यासाठी
साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री
आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी
मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. आता होमगार्डसना दर तीन वर्षांनी नोंदणी
करण्याची करण्याची आवश्यकता नाही, ही अट शिथिल करण्यात आली आहे
असं फडणवीस यांनी सांगितलं. होमगार्डसना कवायत भत्ता देखील मंजूर केला जाईल असंही फडणवीस
यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत निवृत्त अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचारी यांचं मासिक निवृत्तीवेतन
वेळेवर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं आश्वासन ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी
दिलं. ते आज विधान परिषदेत आमदार नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विचारलेल्या
प्रश्नाला उत्तर देत होते. ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग,
तसंच वित्त विभाग या तिन्ही विभागाच्या समन्वयातून एक अद्ययावत ऑनलाईन
प्रणाली विकसित करण्यात येईल तसंच विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनापूर्वी हा विषय मार्गी
लावला जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.
****
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात विविध प्रकारच्या आपत्तींमुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे, १३ लोक बेपत्ता असून १२३
जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली आहे. गेल्या
२४ तासात कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर आणि
सिंधुदुर्गात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पावसामुळं राज्यातले २६ हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले त्यांच्यासाठी २५ मदत
छावण्या उभारल्या आहेत. या पावसाळ्यात १२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे, २ घरांचं पूर्ण तर ४६४ घरांचं काही प्रमाणात नुकसानग्रस्त झालंय.
****
राज्यातले डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातले
सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्याकरता सुमारे तेराशे कोटी रुपयांचा आराखडा तयार
केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या
उत्तरात ही माहिती दिली. त्यातून ओढे आणि नाल्यांवरचे छोटे पुल पक्क्या स्वरूपात बांधले
जातील, असं त्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवणाऱ्या महाबीज या राज्य सरकारच्या कंपनीचं बळकटीकरण
करण्यासाठी व्यवस्थापनात बदल केला जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री
धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. याबाबत सचिन अहिर तसंच विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बोगस बी-बियाणं, खतं आणि औषधाच्या विरोधात कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा या अधिवेशनातच संमत
केला जाईल, असंही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यात कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या
नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे
राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातली कृषी महाविद्यालयं आणि कृषी
अभ्यासक्रम प्रवेशासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यात घेतलेल्या या निर्णयामुळे कृषी
अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात
रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत.
या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल
तसंच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणं शक्य होणार आहे.
****
मणीपूर हिंसाचार तसंच सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून संसदेचं कामकाज
आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेसचे अधीररंजन चौधरी यांनी सरकारविरोधातल्या
अविश्वास प्रस्तावाबाबत पुढे कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली. संसदीय कामकाजमंत्री
प्रल्हाद जोशी यांनी, हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर दहा दिवसांत पुढची
कार्यवाही करता येण्याची तरतूद असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं,
कामकाज आधी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू
झाल्यावरही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, संयुक्त जनता दल, तसंच
इतर विरोधी पक्षांनी हौद्यात उतरून मणीपूर मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात
सदनाने खाण आणि खनिज सुधारणा विधेयक, राष्ट्रीय दंत आयोग विधेयक
तसंच राष्ट्रीय परिचर्या आणि सूतिकाशास्त्र विधेयक संमत केलं. भारतीय व्यवस्थापन संस्था
सुधारणा विधेयक सदनासमोर सादर करण्यात आलं. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
करण्यात आलं.
राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणीपूर मुद्यावर नियम २६३ अन्वये चर्चेची
मागणी लावून धरली. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या आचरणाबाबत
सभापतींनी नाराजी व्यक्त करत सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. त्यापूर्वी गोव्याचे
खासदार विनय तेंडुलकर यांना सदनानं निरोप दिला. तेंडुलकर यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा
कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत आहे.
****
३ ते ८ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींना शिक्षण व्यवस्थेत घेण्याचं नियोजन केंद्र
सरकारनं केलं आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी
आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
शिफारसींनुसार शिक्षकांसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य तयार केल्याचं
त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून देशातल्या
शिक्षण व्यवस्थेत झालेल्या बदलांचा आढावा घेण्यासाठी उद्यापासून नवी दिल्लीत २ दिवसीय
अखिल भारतीय शिक्षा परिषद आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं
उद्घाटन करणार असल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
****
ग्रामस्तरावर उत्कृष्टपणे काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा प्रशासन सत्कार करेल मात्र
कामचुकार ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा
इशारा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी दिला आहे. ग्रामस्तरावर होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांच्या
बैठकीत ते बोलत होते. ग्रामसेवकांनी निधी विकासात्मक कामावर खर्च करावा, शासकीय योजनेची गावात जनजागृती करावी, नियमित ग्रामसभा,
मासिक सभा घेण्याच्या सूचना त्यांनी ग्रामसेवकांना दिल्या. जिल्ह्यातले
५ टक्के ग्रामसेवक निष्क्रिय असल्याने त्याचा ग्राम स्तरावरील कामावर परिणाम दिसून
येतो, असं मीणा म्हणाले.
****
लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील काही भागात पुराचे पाणी घरात घुसून, तसेच घरांच्या पडझडीने नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी रावणकोळा, मरसांगवी, आतनुर आणि शिवाजीनगर तांडा येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. जनावरांचा
मृत्यू, जमीन खरडून जाणे आदी नुकसानीचीही जिल्हाधिकारी यांनी
माहिती घेतली, तसंच या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला.
****
No comments:
Post a Comment