आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
गुजरतमधल्या गांधीनगर इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते सेमीकॉन इंडिया २०२३ या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या संमेलनाचं आयोजन केलं
असून, सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताचा झालेला विकास आणि
भारताचं धोरण जगासमोर मांडण, हा या संमेलनाचा
उद्देश आहे.
****
मणिपूरमधल्या महिला अत्याचार व्हिडीओ प्रकरणाचा तपास केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश
गृह मंत्रालयानं दिले आहेत. या प्रकरणी आजपर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
केंद्र सरकार देखील या प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर घेण्याची विनंती करणारं प्रतिज्ञापत्र
सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.
****
महाराष्ट्रात काही जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज होणारी इयत्ता दहावीची पुरवणी
परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता इतिहास आणि राज्यशास्त्र याविषयाची परीक्षा येत्या
तीन ऑगस्ट रोजी दुपारी ११ ते एक यावेळेत होईल. परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात मात्र
कोणताही बदल नसल्याचंही मंडळानं कळवलं आहे.
****
धुळे शहरात विक्रीसाठी येणारं १६० लिटर भेसळयुक्त दूध काल दूध
भेसळ समितीच्या पथकानं नष्ट केलं. शहरातल्या साक्रीरोड मार्गे धुळे शहरात येणाऱ्या
दुधाची वाहनं अडवून ही कारवाई करण्यात आली. यावेळी १२ वाहनांची तपासणी केली असता आठ
वाहनांमध्ये दुधात पाण्याची भेसळ केल्याचं आढळून आलं.
****
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये
पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक
सखल भागामध्ये पाणी साचलं आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं
आहे.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज सर्व शाळांना सुटी जाहीर
करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र काल पावसाची संततधार सुरु होती. अनेक
भागात शेतामध्ये पाणी शिरुन पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment