Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 July
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ जूलै २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचं
आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा
हप्ता देखील वितरित करण्यात येणार
·
मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन लोकसभेत
केंद्र सरकारविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव दाखल
·
औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास
कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी
पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
·
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे
माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या कारावासाची
शिक्षा
आणि
·
नांदेड इथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमानसेवेला
मंजुरी
सविस्तर
बातम्या
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र
म्हणजेच वन स्टॉप शॉपचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
राजस्थानातल्या सिकर इथं होणाऱ्या या कार्यक्रमात, देशभरातल्या सुमारे दोन लाख ८० हजार खत विक्री दुकानांचं, पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रामध्ये
रुपांतर होणार आहे. शेतीसाठी लागणारं बियाणं, खतं तसंच इतर साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं, या साहित्याचा दर्जा राखला जावा, हा या किसान समृद्धी केंद्र उभारणीचा
उद्देश आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान
सन्मान निधीचा चौदावा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे. सुमारे साडे आठ कोटींपेक्षा
अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, एकूण १८ हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातल्या ८५ लाख ६६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, एक हजार ८६६ कोटी ४९ लाख रुपये जमा
होणार आहेत.
औरंगाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष
संजय खंबायते तसंच पक्षाचे निवडणूक प्रमुख समीर राजुरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्या
टप्प्यात २६४ पेक्षा अधिक पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रं सुरू करण्यात येत असल्याचं, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य
पाटील यांनी सांगितलं.
****
मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन
लोकसभेत केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी काल अविश्वास प्रस्ताव दाखल केला. काँग्रेसचे
गौरव गोगोई यांनी सादर केलेला हा एका ओळीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.
या प्रस्तावावर चर्चेचा दिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने ठरवला जाईल, असं ते म्हणाले.
****
दरम्यान, मणिपूर मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही
सभागृहांचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच या मुद्यावर विरोधी
पक्षांनी घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुनही गदारोळ
सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज सुरवातीला दोन वेळा स्थगित झालं, दुपारनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही
विरोधकांचा गदारोळ सुरू होता,
या गदारोळातच
वन संरक्षण सुधारणा विधेयक संमत झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी
तहकूब झालं.
राज्यसभेत देखील विरोधकांच्या
घोषणाबाजीमुळे कामकाज आधी दोन वेळा स्थगित झालं. दुपारी दोन वाजेनंतर विरोधी पक्षाच्या
गदारोळातच कामकाज पुन्हा सुरू झालं,
याच गदारोळात
अनुसूचित जमाती घटना दुरुस्ती विधेयक सदनानं मंजूर केलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित
करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध
विकास कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातले
पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत, याकडे लक्ष देण्यात यावं, असंही त्यांनी सांगितलं. काल मुंबईत, औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास
कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री संदीपान भुमरे, विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. अजिंठा लेणी परिसर, पैठण इथलं नाथसागर परिसरातलं संत
ज्ञानेश्वर उद्यान तसंच संतपीठ उद्यान,
रामकृष्ण
गोदावरी उपसा जलसिंचन योजना,
तसंच ऊर्जा
विभागाशी निगडीत विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.
****
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी
कमी पडू देणार नाही,
अशी ग्वाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या
राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचवणं आणि त्यांचं
पुनर्वसन करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळप्रसंगी चौकटीबाहेर जाऊन काम करावं
लागलं, तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत
निर्णय घ्यावा,
अशी सूचना
पवार यांनी केली. अतिवृष्टी,
पूरस्थिती
तसंच अवर्षण परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत
सतर्क राहून काम करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.
****
राज्यात कोणत्याही प्रकारची
कंत्राटी पोलीस भरती होणार नसल्याचं,
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी
कंत्राटी पोलीस भरती बाबत मुद्दा उपस्थित केला होता, त्याला फडणवीस उत्तर देत होते.
****
शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार असल्याचं
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. सांगली जिल्ह्यात बनावट
भेसळयुक्त कृषी औषधांची विक्री होत असल्याबाबत, सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मुंडे बोलत होते.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई नवीन कायद्याअंतर्गत करण्यात येईल, त्याचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात
असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय कृषी विकास योजना
आणि राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानातल्या अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू
असून, उर्वरित लाभार्थींचं अनुदानही
लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी काल विधानसभेत दिली.
****
औरंगाबाद इथं शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांचं नियोजित स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, आवश्यक तो निधीही देण्यात येणार असल्याची
माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी
काल विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
या स्मारकासाठी ३५ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २३ कोटी निधी वितरित करण्यात
आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर नऊ कोटी चाळीस लाख रुपये निधी खर्च झालेला असून, स्मृती वन तसंच स्मारकाचं ६० टक्के
काम पूर्ण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.
****
राज्यातल्या महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतल्या
शिक्षण संस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत, न्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करण्यात येणार असल्याची
माहिती, मंत्री उदय सामंत यांनी काल
विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
****
खाजगी पशू वैद्यकीय महाविद्यालयं
सुरू करण्यासाठी परवानगी देणारं,
महाराष्ट्र
पशू आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ सुधारणा विधेयक, काल विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं.
पशू वैद्यकीय पदवीधर उमेदवारांची वाढती मागणी तसंच पशू रोगांचं वाढतं प्रमाण लक्षात
घेता, हा निर्णय घेतल्याची माहिती
पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
****
राज्यातल्या पॅथॉलॉजी लॅब-वैद्यकीय
प्रयोगशाळा नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली
समिती नेमण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत ही
माहिती दिली. काही तपासण्यांचे अहवाल वेगवेगळ्या प्रयोगशाळेत वेगवेगळे येत असल्याच्या
तक्रारीवरुन,
विधान परिषद
सदस्य अनिकेत तटकरे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला सावंत उत्तर देत होते.
दरम्यान, विधान परिषदेत काल वर्ष २०२३-२४ च्या
४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या
मंजूर करण्यात आल्या.
****
राज्यातल्या इतर मागास प्रवर्गासाठी
‘मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा
निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, या योजनेअंतर्गत राज्य सरकार तीन वर्षात इतर मागास प्रवर्गातल्या
नागरिकांसाठी,
१२ हजार
कोटी रुपये खर्च करून १० लाख घरं बांधणार आहे. तसंच या योजनेअंतर्गत क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत, ५०० चौरस फूट जागेसाठी ५० हजार रुपयांपर्यंत
अनुदान देखील मिळणार आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याचे अन्न नागरी
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी इतर मागास प्रवर्गासाठी विविध योजना
राबवण्याचा आग्रह धरला.
****
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या
विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा
यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात कोळसा विभागाचे माजी
सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात
आली आहे. तसंच दर्डा यांच्या जे एल डी यवतमाळ या कंपनीला न्यायालयानं ५० लाख रुपयांचा
दंडही ठोठावला असल्याचं,
वृत्तसंस्थेनं
दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
नांदेड इथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमानसेवेला
मंजुरी मिळाली आहे. स्पाईस जेट ही कंपनी नांदेड इथून मुंबई, दिल्ली, अमृतसर, आणि पाटणा या महानगरांसाठी, फ्लाय नाईंटी वन ही कंपनी बंगळुरू
तसंच गोव्यासाठी,
तर स्टार
एअर ही कंपनी पुणे,
अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबादसाठी विमान सेवा
पुरवण्यासाठी तयार झाली आहे. देशातल्या प्रमुख महानगरांशी नांदेड आता विमानसेवेनी जोडलं
जाणार असल्यानं,
इथल्या उद्योग
जगतासह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला
आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या आगामी पंचवार्षिक बृहत आराखड्याला, काल अधिसभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्रातल्या चार जिल्ह्यात मिळून सुमारे ६६० नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित असून, ८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना
प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी १९४, जालना १५२, बीड १७४ तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी, १४० अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे.
विद्यापीठाचा मुख्य परिसर तसंच उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी मिळून, जवळपास ४० अभ्यासक्रम यामध्ये प्रस्तावित
आहेत. गेल्या चार वर्षात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी प्रशासकीय शिस्त आणली, याबद्दल अधिसभा सदस्यांनी एकमताने
अभिनंदनाचा ठराव संमत केला.
****
रासायनिक खतं खरेदी करताना
खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करत असल्यास, नजिकच्या कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार
करावी, असं आवाहन, नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट
खतांचा संतुलीत वापर करावा,
तसंच कमी
खर्चात खतांचं नियोजन होईल याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच
खताचा आग्रह न धरता पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असं आवाहन बऱ्हाटे
यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शयनशायिका
असलेल्या सर्व खासगी प्रवासी बसधारकांनी, ३१ जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान वाहनांची नि:शुल्क पडताळणी
करून घ्यावी,
असं आवाहन, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी
स्वामी यांनी केलं आहे. मागील काही दिवसात खासगी बसचे अपघात घडले असून, या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयाकडून
बसची तपासणी,
कागदपत्र
पडताळणी केली जात आहे. सोबतच चालकांचीही तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी पूर्णत:
नि:शुल्क असल्याचं उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी
खरीप हंगाम २०२३ साठी ३१ जुलै पर्यंत आपली ई-पीक नोंदणी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी
केलं आहे. शासनाच्या विविध योजना,
पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान यासह विविध योजनांचा
लाभ घेण्यासाठी या नोंदणीची मदत होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या काही सामूहिक
सेवा केंद्रधारक पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी
प्राप्त होत आहेत. असे गैरप्रकार झाल्यास शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी
अथवा तहसीलदार,
जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणात दोषी
असणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी
विजयकुमार ढगे यांनी दिला आहे.
****
कामात दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकावर
कडक कारवाईचा इशारा,
औरंगाबाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिला आहे. ते
काल ग्रामसेवकांच्या बैठकीत बोलत होते. शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायती स्तरापर्यंत
पोहोचवण्यासाठी ग्रामसेवकांनी नेहमीच प्रयत्नशील असावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
राज्याच्या विविध भागात मुसळधार
पाऊस होत असून,
अनेक ठिकाणी
नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ
झाली आहे. आज आणि उद्या रायगड,
रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान
विभागाने रेड अलर्ट दिला असून,
ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यांना
ऑरेंज अलर्ट दिला आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या
स्फूर्तिगाथेचा महानगरपालिका ते गावपातळीपर्यंत विविध उपक्रम राबवून जागर करण्यात येणार
आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल यासंदर्भातल्या आढावा
बैठकीत ही माहिती दिली. ग्रामीण भागातही हे उपक्रम राबवता यावे, यासाठी तालुकास्तरावरुन विविध कार्यक्रमांचं
नियोजन करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.
****
No comments:
Post a Comment