Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 July 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ जूलै
२०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज आठव्या दिवशी लोकसभेचं कामकाज सुरु होताच, मणिपूर
हिंसाचार मुद्यावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची
मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहाच्या मर्यादेचं
पालन करण्यास सांगितलं. मात्र, हिंसाचारा बाबत निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घातलेल्या विरोधी पक्ष सदस्यांनी
गदारोळ सुरु ठेवल्यानं, अध्यक्षांनी संसदेच कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही
मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं राज्यसभेचं कामकाजही
दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
****
देशातल्या शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या सिकर इथं पंतप्रधान
किसान समृद्धी केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी मोदी बोलत होते. याअंतर्गत सुमारे दोन लाख ८० हजार खत विक्री दुकानांचं, पंतप्रधान
किसान समृद्धी केंद्रात रुपांतर होणार असून शेतीसाठी लागणारं बियाणं, खतं तसंच
इतर साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या
हस्ते अठरा हजार कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता देखील
वितरित करण्यात आला. याचा लाभ सुमारे साडे आठ कोटींपेक्षा अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना
होणार आहे. महाराष्ट्रातल्या ८५ लाख ६६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, एक हजार
८६६ कोटी ४९ लाख रुपये जमा होणार आहेत.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी ७२ तासांची मागणी मर्यादा ९२
तास करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे
यांनी आज विधानसभेत विशेष सत्रात दिली. ही लक्षवेधी सूचना श्वेता महाले यांनी मांडली
होती. राज्यातल्या एक कोटी १४ लाख ५३ हजार हून अधिक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या एक
रुपयात विमा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असून ३१ जुलैपर्यंत या नोंदणीची
मुदत आहे. गेल्या वर्षी ही संख्या ९२ लाख इतकी होती असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा
समावेश करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. दीपक
चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा
समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे.तसंच या योजनेत समावेश करायच्या
आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असल्याचं सावंत यांनी यावेळी
नमूद केलं.
****
दगड खाण, मुरूम, चिखलमाती यांच्या साठी असणारी `शून्य स्वामित्व` सुविधा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी केली आहे. ते आज विधानसभा विशेष सत्रात महेश बालदी यांनी मांडलेल्या लक्षवेधी
सूचनेला उत्तर देतांना बोलत होते. दगड खाण विषयी नवीन धोरण लवकरचं आणलं जाईल असंही
महसूल मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागामार्फत काही ठिकाणी
अती मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबईत गेल्या २४ तासांत ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात
सततच्या पावसामुळं, कोयना धरणाच्या पायथा गृहाच्या एका संचातून एक हजार ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.आज दुपारी चार वाजेनंतर पायथा गृहाच्या दुसऱ्या
संचातून दोन हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात
येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या एच. एस. प्रणय आणि लक्ष्य सेन
यांनी पुरुष एकेरीमध्ये उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रणयनं आज उपउपांत्य पूर्व
फेरीच्या सामन्यात भारताच्याच श्रीकांत किदाम्बीवर
१९-२१, २१-९, २१-९ असा विजय नोंदवला. लक्ष्य सेननं अन्य उपउपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात
जपानच्या कांता सुनेयामावर २१-१४, २१-१६ अशी सहज मात केली.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी औरंगाबाद इथल्या केंद्रीय
विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचं विद्यालयाचे प्राचार्य अनिल
यादव यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
No comments:
Post a Comment