Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना तीन दिवसांची
मुदतवाढ, महाराष्ट्रात आतापर्यंत दीड कोटीहून
अधिक अर्ज दाखल.
·पंतप्रधान मोदींचा उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारानं
गौरव, विविध विकासकामांचं उद्घाटन.
·पालघरजवळ धावत्या रेल्वेत गोळीबार, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यासह तीन प्रवाशांचा
मृत्यू, आरपीएफच्या जवानाला अटक.
आणि
·संत मुरारी बापू यांची चित्रकूट भारत गौरव
यात्रा हिंगोलीत दाखल, औंढा इथं रामकथावाचन.
****
पीक विमा भरण्यासाठी
काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने तीन दिवसांची मुदतवाढ
दिली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय
मुंडे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. एक रुपयात पीक विमा अर्ज भरून पंतप्रधान
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता तीन
ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात एक कोटी
पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून या योजनेत
सहभाग घेतला आहे. कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू
नये, यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित
शेतकऱ्यांनी आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असं आवाहन
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
****
मणीपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन देण्याच्या मागणीवरून
विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही वारंवार बाधित झालं. आज लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या मुद्यावरून
जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पंतप्रधानांनी तातडीने या विषयावर
निवेदन देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले होते. या गदारोळातच
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ कमी न झाल्यानं अध्यक्षांनी प्रारंभीच्या
तहकुबीनंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
राज्यसभेतही कामकाज सुरू होताच विरोधकांनी मणिपूर मुद्यावर नियम
२६७ अन्वये चर्चेची मागणी लावून धरली. या मुद्यावर
सरकार चर्चेला तयार असल्याचं सभागृह नेते पियुष गोयल यांनी सांगितलं. त्याचवेळी विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी
मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी केली. सभागृहात
सुरू असलेला गदारोळ पाहता सभापतींनी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत,
नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
दरम्यान, संसदेतील सभागृहाचे
कामकाज सुरळीत चालावे यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज सर्वपक्षीय
बैठक घेतली. सदनाचे नेते पियुष गोयल, विरोधी पक्षनेते
मल्लिकार्जुन खरगे, द्रविड मुन्नेत्र कळघमचे तिरुची शिवा,
तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय, सीपीआयचे
बिनॉय विश्वम, राष्ट्रीय जनता दलाचे प्राध्यापक मनोज झा
यांची बैठकीला उपस्थिती होती.
****
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्या
अगोदर काही राज्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांशी चर्चा करणार आहेत. आजपासून दररोज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांबरोबर ते बैठक घेणार
आहेत. हे बैठकांचं सत्र १० ऑगस्टपर्यंत चालेल. येत्या आठ ऑगस्ट रोजी ते एनडीएच्या महाराष्ट्रातील
खासदारांशी चर्चा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक
राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे दौऱ्याची सुरुवात
पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन आणि पूजा करून करणार आहेत.
पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पिंपरी
चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यातून उर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं,
तर पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
बांधलेल्या एक हजार २८० हून अधिक घरांचं तसंच पुणे महापालिकेने बांधलेल्या दोन हजार
६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार
आहे.
****
पाण्यात आढळणाऱ्या आर्सेनिक या
हानिकारक घटकाचं प्रमाण कमी झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जल शक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत
एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. ऑगस्ट २०१६ मध्ये देशातील सहा राज्यात १४ हजार
२० लोकवस्त्यांवर पिण्याच्या पाण्यात आर्सेनिक प्रमाणापेक्षा जास्त असल्याची
माहिती मिळाली होती. यावर्षी २५ जुलैपर्यंत ही संख्या कमी होऊन फक्त ४६० इतकी
राहिल्याचं शेखावत यांनी सांगितलं.
पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्येच आता याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
****
पश्चिम रेल्वेच्या
पालघर स्थानकाजवळ चालत्या रेल्वेगाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसाने केलेल्या गोळीबारात आज एका वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्यासह इतर
तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात
असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर पोलिस पळून
जायच्या प्रयत्नात असताना दहिसर स्थानकातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.
****
चित्रकूट भारत गौरव यात्रा आज हिंगोली जिल्ह्यातील
औंढा नागनाथ इथं पोहोचली. त्या
निमित्ताने नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात संत मुरारी बापू यांचं
रामकथा वाचन झालं. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून देशभरात महाराष्ट्राचं मोठं
महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं. विठ्ठल नावाचे नामस्मरण करून अभिवादन केलं. केदारनाथ
इथून या यात्रेला सुरुवात झाली असून बारा ज्योतिर्लंग ठिकाणी भक्तांच्या वतीने राम
कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेमध्ये मुरारी
बापू यांच्या सोबत एक हजार आठशे भाविक आहेत. या मध्ये १८० देशातील प्रतिनिधींचा
समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून
उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकास कामं करण्याबरोबरच,
निधी वेळेत खर्च होईल याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना जिल्हा वार्षिक योजनेच्या आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वर्ष
२०२३-२४ या चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागप्रमुखांनी प्रस्तावास
तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कामांची प्रक्रिया सुरु करावी.
प्रलंबित कामांचा आणि खर्चाचा नियमितपणे आढावा घ्यावा असंही जिल्हाधिकारी यांनी
यावेळी सांगितलं.
****
धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी ३० खाटांचा
अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी
दाखल होणाऱ्या महिला या सर्वसाधारण, गरीब असतात. प्रसुती दरम्यान
काही नवजात बालकांना जन्मताच ऑक्सीजनची गरज लागते अथवा इतर व्यांधीमुळं अतिदक्षता
विभागाची आवश्यकता भासते. त्यामुळे शासनानं ३० खाटांचा अतिदक्षता विभाग
कार्यान्वित करण्यास मंजुरी दिली आहे.
****
पावसाळ्यात पसरणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन
लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केलं आहे. या आजारात डोळ्यांना
खाज सुटते, सूज येऊन डोळे लालसर होतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळे आलेल्या व्यक्तीने
विलगीकरणात राहावं, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच
औषधोपचार घ्यावा, असं डॉ वडगावे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी
सर्वोच्च न्यान्यालयानं पुढं ढकलली आहे. आजारपणाच्या कारणावरून मलिक यांनी
मागितलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं १३ जुलैला फेटाळला होता. त्यावर मलिक
यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचं एक मूत्रपिंड निकामी झालं असून, दुसऱ्याचंही काम थांबलं आहे, त्यामुळं त्यांना जामीन
द्यावा, असं मलिक यांचे वकील कपील सिब्बल यांनी न्यायालयाला
सांगितलं. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होईल, असं न्यायमूर्ती
अनिरुद्ध बोस यांनी सांगतिलं.
****
आगामी दोन दिवसात मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान
खात्याने व्यक्त केली आहे. तर कोकणातील अनेक भागांमध्ये, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
उद्या एक ऑगस्ट या महसूल दिनापासून सर्वत्र महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं
आहे. हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. महसूल
विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
नागरिकांना व्हावी यासाठी हा सप्ताह राबवण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment