Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 July
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ जूलै २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· विधानसभेत
काल ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
· शिक्षकांची
तीस हजार पदं ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू
· ज्येष्ठ
पत्रकार-लेखक शिरीष कणेकर यांचं मुंबईत निधन
· औरंगाबाद
शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात सर्वेक्षणाची
सूचना
· नांदेडचे
डॉक्टर सुरेश सावंत यांना बालकुमार साहित्य संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार
· विद्यार्थ्यांना
अंमली पदार्थ विकणाऱ्या इसमाला औरंगाबाद इथं अटक
आणि
· रसायनशास्त्र
ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला तीन रौप्यपदकांसह एक सुवर्णपदक
सविस्तर
बातम्या
विधानसभेत काल ४१ हजार २४३
कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. विविध योजनांसाठी पुरवणी मागण्यांमधे
तरतुदी केल्या आहेत. त्यात शेतकरी सन्मान योजना, साखर कारखान्यांना मदत, शेतकरी कर्ज परतफेड योजना आदींचा समावेश आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. राज्यातल्या विकास निधीच्या
वाटपात २०१९ ते २२ या काळात जे धोरण राबवलं गेलं, त्यात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे असमान निधी वाटप होत असल्याची
तक्रार चुकीची आहे,
असं अजित
पवार यांनी स्पष्ट केलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ केला. यानंतर पुरवणी मागण्या मंजूर
करण्यात आल्या. निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही, असं पवार यांनी सांगितलं. आम्हाला
आवश्यक निधी द्या,
अशी मागणी
नाना पटोले यांनी विनियोजन विधेयकाच्या वेळी केली. हे विधेयक मंजूर होताच विरोधकांनी
सभात्याग केला.
****
केळी महामंडळासाठी पन्नास कोटी
रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत ही माहिती
दिली. केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनानं घेतला असून, या महामंडळाच्या माध्यमातून केळी
पिकाबाबत संशोधन करण्यात येणार आहे,
असं ते म्हणाले.
सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी
हे निवेदन दिलं.
****
शेतीला समृद्धी देण्याच्या
व्यापक उद्देशानं तयार करण्यात आलेली पोकरा ही लाभदायक योजना, प्रत्येक गावात लागू व्हावी, असं सरकारचं उद्दिष्ट आहे, आणि त्यासाठी प्रयत्नरत असल्याचं, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
ते काल विधान परिषदेत बोलत होते. सदस्यांनी उपस्थित केलेल्या, पीक कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी,
काही शेतकऱ्यांच्या
उर्वरित लाभाबाबत बोलताना,
पुरवणी मागण्यांमधून
या रकमेची तरतूद करण्यात आली असून,
येत्या १५
ऑगस्टपर्यंत या रकमा वितरित केल्या जातील, असं मुंडे यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या
पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुंडे यांनी नमूद केलं.
****
शासकीय विश्रामगृहांमध्ये ऑनलाइन
बुकिंग करण्यासाठी ॲप विकसित करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र
चव्हाण यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. पुढच्या अधिवेशनापूर्वी हे ॲप तयार
करण्यात येईल,
असं त्यांनी
सांगितलं. शासकीय विश्रामगृहांची दुरवस्था झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न, भाजपाचे भाई गिरकर यांनी विचारला
होता त्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण बोलत होते. विश्रामगृहांची दुरुस्ती, पुनर्बांधणी तसंच या सगळ्यात पारदर्शकता
आणण्यासाठी नव्यानं धोरण तयार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर
तालुक्यात वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचं प्रलंबित काम, मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार
असल्याची माहितीही,
रवींद्र
चव्हाण यांनी दिली. सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतीत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर
देत होते.
****
मुंबई पोलिस सेवेमध्ये कंत्राटी
पद्धतीनं पोलीस भरती करण्याचा निर्णय धोकादायक असून, गृह विभागानं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
काल विधान परिषदेत,
स्थगन प्रस्तावाच्या
माध्यमातून केली. अशा पद्धतीनं भरती केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊ शकेल,
अशी भीती
व्यक्त करत, पोलीस हे सरकारच्या अखत्यारीतच
असले पाहिजेत,
असं दानवे
म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या
मुलांना संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या तीन संस्थांमध्ये, मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा
आरोपही, दानवे यांनी केला. याबाबतीतला
शासन निर्णय असतानाही सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष आणि सचिवांनी हे प्रशिक्षण
बंद का केलं,
असा प्रश्न
त्यांनी केला. दरम्यान,
सर्व घटनांचा
विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही,
याची पूर्ण
दक्षता घेतली जाईल,
असं उत्तर
सरकारकडून देण्यात आलं.
****
राज्यात शिक्षकांच्या रिक्त
पदांपैकी तीस हजार पदं ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते
उत्तर देत होते. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ
नये, यासाठी नियमित शिक्षकांची नियुक्ती
होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना
जारी केल्याचंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं
****
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर
ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही, मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन, मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत
केलं. कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. प्लास्टर ऑफ
पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळे मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचं
नुकसान होतं,
अशी मागणी
शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या
रंगांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
****
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचं
काल मुंबईत निधन झालं,
ते ८० वर्षांचे
होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का
बसला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आपल्या खुमासदार शैलीतल्या
लेखनानं कणेकर यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं.
अनेक वृत्तपत्रांसाठी त्यांनी राजकारण,
क्रीडा, सिनेमा, अशा विषयांवर स्तंभलेखन केलं. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीषासन' या सदरांमधल्या त्यांच्या विनोदी
लेखांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 'लगाव बत्ती’
या त्यांच्या
कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि.जोशी पुरस्कार
मिळाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपलं वेगळेपण जपत महाराष्ट्राचं सांस्कृतिक क्षितीज
उजळून टाकणारा अवलिया,
आपल्यातून
निघून गेला, कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या
कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात
नमूद केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना, महाराष्ट्रानं खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला
असं म्हटलं आहे,
तर उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी कणेकर यांना श्रद्धांजलीपर संदेशात, क्रिकेट आणि सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला, मात्र त्यांच्या अजरामर साहित्यकृती
आणि कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील, असं म्हटलं आहे.
****
मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज काल सलग चौथ्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच
काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, संयुक्त जनता दल आणि भारत राष्ट्र
समितीच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. दरम्यान, लोकसभेत,
काल जैव
विविधता सुधारणा विधेयक,
बहुराज्य
सहकारी समिती सुधारणा विधेयक संमत झालं.
राज्यसभेत, मणिपूर विषयावरून गदारोळ सुरू झाल्यानं
कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणिपूर मुद्द्यावरच बोलण्याचा आग्रह धरला, त्याला उपसभापती हरिवंश यांनी नकार
दिल्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्यानंतर राज्यसभेत अनुसूचित जमाती घटनादुरुस्ती
विधेयक २०२२ वर चर्चा होऊन ते संमत करण्यात आलं.
****
संसदेच्या अधिवेशनात सातत्यानं
अडथळे आणत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर तीव्र टीका केली
आहे. अशा प्रकारचा दिशाहीन विरोधी पक्ष आपण कधीही पाहिला नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतीय
जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. आगामी काळातही विरोधी पक्ष
म्हणूनच काम करण्याची विरोधी पक्षांची मानसिकता झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात मुकुंदवाडी
स्थानकावर जलदगती रेल्वेंना थांबा देण्यात यावा, याकरता संबंधितांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश, रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव
यांनी दिले आहेत. या स्थानकावर जलदगती रेल्वे थांबत नसल्यानं प्रवासी आणि व्यापाऱ्यांची
प्रचंड गैरसोय होत असल्याची तक्रार,
खासदार इम्तियाज
जलील यांनी, वैष्णव यांच्याकडे केली होती.
ही अडचण दूर करण्यासाठी मुकुंदवाडी स्थानकावर नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस, आदिलाबाद - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, आणि जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
रेल्वेला थांबा देण्यात यावा,
अशी मागणी
जलील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार तपशीलवार सर्वेक्षण
करुन रेल्वे थांबा देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचं, रेल्वे मंत्री वैष्णव यांनी, खासदार जलील यांना पत्रानं कळवलं
आहे.
****
नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक
डॉक्टर सुरेश सावंत यांना,
बालसाहित्यातल्या
महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर
सावंत यांची बालसाहित्याची अठ्ठावीस पुस्तकं प्रकाशित झाली असून, २००२ मध्ये कुंटूर इथं झालेल्या आणि
२०१९ मध्ये जळगाव इथं झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं
आहे. येत्या वीस ऑगस्टला पुण्यात एका समारंभात डॉक्टर सावंत यांना हा पुरस्कार देण्यात
येणार आहे.
****
औरंगाबाद इथं विद्यार्थ्यांना
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमाला काल पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अनिल
माळवे असं त्याचं नाव असून,
तो महाविद्यालयासह
शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये प्रती ग्रॅम चरस, दोन हजारात एम डी आणि दोनशे रुपयात गांजा विक्री करत असल्याची
माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ९३ हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा
जप्त केला.
****
५५ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र
ऑलिम्पियाडमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटकावली आहेत. स्वित्झर्लंडमधल्या
झुरिच इथं झालेल्या या स्पर्धेत उत्तर प्रदेशात नोएडा इथल्या क्रिश श्रीवास्तवला सुवर्ण
पदक, गुजरातच्या अहमदाबाद इथली अदिती
सिंह, मुंबईतल्या अवनीश बन्सल, आणि उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधल्या
मलय केडिया या तिघांना रौप्य पदक मिळालं आहे. या वर्षी ८७ देशांमधले ३४८ विद्यार्थ्यांनी
या ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला होता. एकूण पदकांच्या संख्येत, इतर अनेक देशांसह भारत १२ व्या स्थानावर
आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या बेलोर
गावामध्ये लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. वाशिम
जिल्ह्यात १९ ते २३ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतीपिकांचं तसंच घरांचं मोठं
नुकसान झालं. या संकटकाळात कोणत्याही लोकप्रतिनिधीनं या भागाला भेट दिली नाही. जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय राठोड आणि मदत,
पुनर्वसन
आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी एकही आमदार किंवा खासदार
उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हा प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य
दुकानाचा दहा टन तांदूळ काळ्या बाजारासाठी नेण्यात येत असताना, पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकानं
पकडला. हिंगोली तालुक्यातल्या नर्सी फाटा इथं सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
यावेळी साडेआठ लाख रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण
पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत
सध्या अस्तित्वात असलेल्या नऊ प्रशासकीय विभागांची पुनर्रचना करून दहा प्रशासकीय विभाग
तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना प्रभागांच्या हद्दी स्पष्ट व्हाव्यात तसंच कार्यालयीन
कामात सुसूत्रता येऊन महसुलावर अनुकूल परिणाम व्हावा, यासाठी मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार हा
बदल करण्यात आला आहे. नव्या विभागांच्या हद्दी दर्शवणारा नकाशा आणि संबंधित माहिती
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबतीतल्या सूचना किंवा
हरकती येत्या सात दिवसात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा शहरातल्या
नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचं बंद असलेलं लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्यामुळे एका
मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी हा अपघात झाला. सोमनाथ पवार असं या बालकाचं नाव आहे.
****
बुलडाणा -मोताळा मार्गावर राज्य
परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात होऊन वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. काल
सकाळी ही दुर्घटना घडली. राजूर घाटात बसचं टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
लातूर विभागात वेगवेगळ्या व्यवसायांसाठी शिकाऊ उमेदवारांची बावन्न पदं भरण्यात येणार
आहेत. या पदांसाठी इच्छुक आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट
ॲप्रेन्टिसशिप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर, तसंच पदवीधर आणि पदविकाधारक उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच
आर डी एन ए टी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर येत्या २६ जुलै ते नऊ ऑगस्ट
दरम्यान ऑनलाईन नोंदणी करून अर्जप्रक्रिया पूर्ण करायची आहे.
****
भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ
या योजनेअंतर्गत अग्निवीर वायु दलात पदांची भरती सुरू आहे. या पदाच्या परिक्षेसाठी
अग्निपथ वायू डॉट सी डी ए सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment