Tuesday, 25 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.07.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौथ्या दिवशी बाधित झालं.

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, संयुक्त जनता दल आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन देण्याची मागणी हे सदस्य करत होते. या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सदस्यांना शांत राहून कामकाज सुरळीत चालवण्याचं आवाहन केलं, मात्र तरीही गदारोळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर मणिपूर हिंसाचार मुद्यावर सरकार तयार असल्याचं सभागृह नेते पियुष गोयल यांनी सांगितलं. मात्र या मुद्यावर नियम २६७ अन्वये या मुद्यावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे पी चिदंबरम यांनी केली. इतर विरोधी पक्ष सदस्यांनी देखील या मुद्यावर घोषणाबाजी सुरु केल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची बैठक आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संसदेत कामकाजादरम्यान होत असलेल्या गदारोळाबद्दल तसंच विरोधी पक्षांना प्रत्यूत्तर देण्याच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका केली. इंडिया या नावाचा राजकीय वापर विरोधी पक्ष करत आहेत, असं ते म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, यांच्यासह पक्षाचे वरीष्ठ नेते, खासदार हजर होते. 

****

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्यासाठी असलेल्या चांगल्या योजनांना विरोधकांनीही समर्थन द्यावं, असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केलं. विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्रपणे मांडलेल्या शेतकरी आणि त्यासंदर्भात झालेल्या चर्चेला मुंडे यांनी आज सकाळच्या सत्रात उत्तर दिलं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, त्यामुळे या प्रकल्पाला विरोधकांनी विरोध करू नये, असं ते म्हणाले. सर्व कृषी फिडर सौर ऊर्जेवर आणल्यानंतर २०२५ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळणार, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, आणि पुढील काळात शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील असा विश्वास देखील मुंडे यांनी व्यक्त केला.  

****

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती, त्यावर राष्ट्रपतींच्या सहमतीनंतर यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

****

वर्ध्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं आहे. हे धोरण लागू करणाऱ्या संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अग्रभागी असल्याचं, कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल यांनी सांगितलं. ते काल वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या धोरणाअंतर्गत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आणि शिक्षण पद्धतीत करण्यात आलेले बदल त्यांनी सांगितले. सध्या या विद्यापीठात ३८ पदवी अभ्यासक्रम सुरु असून, या शैक्षणिक वर्षात ४१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, असं शुक्ल यांनी सांगितलं.

****


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या सेवेला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नांदेड रेल्वेस्थानकावर उद्यापासून विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. नऊ वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचीया संकल्पनेवर आधारित हे मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन २८ तारखेपर्यंत चालणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असणार आहे.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १३, २१ - १३ असा पराभव केला. तर महिला एकेरीत आकर्षी कश्यपला जपानच्या अकाने यामागुची कडून १७ - २१, १७ - २१ असा पराभव पत्करावा लागला.

****


No comments: