Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 July
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० जूलै २०२३
सकाळी
७.१० मि.
****
****
·
नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या आकलनाचं
मोजमाप फक्त भाषा ज्ञानाच्या आधारे होणार नाही-पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· पुढील तीन
वर्षात राज्याला बेघरमुक्त करण्याचा संकल्प-उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
· उस्मानाबाद
इथं लोक अभिरक्षक कार्यालयाचं पालक न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन
·
बुलडाणा जिल्ह्यात दोन खासगी बसच्या अपघातात सहा प्रवाशांचा
मृत्यू
आणि
· जागतिक
आंतरविद्यापीठ स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई तर
श्रीलंकेतल्या ॲथलेटीक्स स्पर्धेतही भारताला काल दुसऱ्या दिवशी तीन
सुवर्णपदकं
****
नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य
देण्यात आलं असून, विद्यार्थ्यांच्या
ज्ञान आणि आकलनाचं मोजमाप केवळ भाषा ज्ञानाच्या आधारे केलं जाणार नाही, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त काल
नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण संगम या संमेलनाचं
उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या धोरणाअंतर्गत देशभरात एकच
अभ्यासक्रम विविध २२ प्रादेशिक भाषांमधे शिकवला जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं.
ते म्हणाले,
‘‘संसद मे नॅशनल रिसर्च फाऊंडेशन
बिल पेश करने के लिये कॅबिनेट अपनी मंजुरी दे
दी है। राष्ट्रीय शिक्षा निती के तहत नॅशनल करूक्युलम फ्रेमवर्क भी जल्दी ही लागू हो रहा है। यानी तीन से आठ साल के
बच्चों के लिये फ्रेमवर्क तयार भी हो गया
है। बाकी के लिये करूक्युलम बहोत जल्द ही हो जायेगा। अब पुरे देश में सी बी एस ई स्कुलों मे एक तरह का पाठ्यक्रम होगा।‘‘
२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका
महत्त्वाची राहिली आहे. देशाला यश प्राप्त
करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
विविध भाषांमधल्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनही यावेळी
करण्यात आलं. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग
इंडिया - प्रधानमंत्री श्री
योजनेअंतर्गत देशभरातल्या सहा हजार ७०७ शाळांना मिळून ६३० कोटी रुपयांचा पहिला
हप्ता पंतप्रधानांनी वितरीत केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १०३ वा भाग आहे. हा कार्यक्रम सकाळी
११ वाजता आकाशवाणी, दूरदर्शन तसंच माहिती आणि प्रसारण
मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील थेट प्रक्षेपित केला जाईल. मराठीमध्ये रात्री
आठ वाजता या कार्यक्रमाचा अनुवाद आकाशवाणीवरुन प्रसारित होईल.
****
पुढील तीन वर्षात राज्याला बेघरमुक्त करण्याचा संकल्प
असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि
इतर मागासवर्गीय घटकातल्या नागरीकांसाठी शासन आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन करण्यात
आलं होतं, त्यावेळी फडणवीस दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
बोलत होते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पाच
लाख घरकुले, आवास योजनेंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी तीन लाख,
तसंच विमुक्त आणि भटक्या जमाती आणि इतरांसाठी दोन लाख घरकुलांचं
नियोजन केल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम
झाला. वंचितांच्या
जीवनात विकासाचा नवीन मार्ग दाखवण्यासाठी त्यांना तंत्रशिक्षणासोबतच व्यावसायिक
प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असल्याचं गडकरी यावेळी
म्हणाले.
****
संयुक्त किसान मोर्चानं पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं
आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय
संघटनेनं जाहीर केला. या बैठकीत
शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून,
त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन करून, केंद्र
सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली. या
बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना, तसंच ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार संघटनेच्या वतीनं मांडण्यात आलेल्या
विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे प्रस्तावित
आंदोलन मागे घेतल्याचं, संघटनेनं जाहीर केलं.
****
महसूल सप्ताहानिमित्त शासनाच्या कामकाजाप्रती
नागरिकांचा विश्वास वाढेल यावर लक्ष केंद्रीत करत, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करावं, असं आवाहन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी
केलं आहे. एक ऑगस्टपासून राज्यात महसूल सप्ताह राबवण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर विखे - पाटील यांनी काल
राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला,
त्यावेळी ते बोलत होते. या सप्ताहामुळे महसूल विभागातल्या अधिकारी-
कर्मचार्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळेल, तसंच
यात जिल्ह्यातल्या नागरिकांना सहभागी करुन घेतल्यानं संपूर्ण जिल्ह्यात एकोपा
निर्माण होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
देशाला गुलाम करणारा विकास आम्हाला नको, असं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल ठाणे इथं हिंदी भाषिक मेळाव्यात उद्धव ठाकरे
बोलत होते. शिवसेना - भारतीय जनता पक्षाची २५ वर्षांची युती होती.
ती युती त्यांनीच तोडली त्यामुळेच आपल्याला कॉंग्रेससोबत जावं लागलं
असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. आपल्याला घंटा बडवणारा
हिंदू नको तर आतंकवाद मिटवणारा हिंदू हवा आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षानं काल केंद्रीय कार्यकारिणी जाहीर
केली. यामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय सचिव पदी विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे
यांची नियुक्ती झाली आहे तर राष्ट्रीय सरचिटणीस पदावर विनोद तावडे यांची नियुक्ती
झाली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु तारीक मन्सूर यांना
उपाध्यक्षपद दिलं आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्टनी यांचे पुत्र
अनिल अॅन्टनी यांना राष्ट्रीय सचिव पद दिलं आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षांमधे माजी मुख्यमंत्री
रमण सिंह, वसुंधरा राजे,
रघुवर दास, यांचा समावेश आहे.
****
न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी काल मुंबई
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल मुंबईत झालेल्या समारंभात
राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं काल लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबाद
जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते झालं. गरजू व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत मिळावी
या उद्देशानं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणानं उस्मनाबाद इथं लोक अभिरक्षकांची
२४ एप्रिल २०२३ रोजी नेमणूक केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणं, नियमित जामिनासाठी सहाय्य, खटला चालवणं, पुनर्निरीक्षण याचिका दाखल करणं, आदी कामांसाठी लोक
अभिरक्षक कार्यालयामार्फत मोफत मदत पुरवण्यात येत आहे. जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यावेळी
उपस्थित होत्या.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या भारतीय
राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं अनावरणही न्यायमूर्ती पेडणेकर यांच्या हस्ते काल झालं.
****
बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर शहराजवळ दोन खासगी बसच्या अपघातातल्या
मृतांच्या वारशांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून,
जखमींवर शासकीय खर्चात उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
काल पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन बस ची
समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २५ ते ३० जण जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त झालेली एक बस, अमरनाथ यात्रा आटोपून
हिंगोलीला जात होती, तर दुसरी बस नाशिकच्या दिशेनं जात होती.
नाशिकला जात असलेल्या बसनं ट्रकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात, समोरुन येणाऱ्या बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
भारत- वेस्ट इंडिज दरम्यान काल विंडीजच्या बार्बाडोस इथं झालेला दुसरा एक
दिवसीय क्रिकेट सामना वेस्ट इंडिजनं सहा गडी राखून जिंकला. या सामन्यात विंडीजनं
नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीत भारताचा डाव ४१व्या
षटकांत सर्वबाद १८१ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं हे आव्हान
३७व्या षटकांतच आणि चार गड्यांच्या मोबदल्यात पार करुन हा विजय मिळवला. तीन
सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अंतिम
सामना परवा एक ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
****
जपानमधल्या टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यला
इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टीकडून १५-२१, २१-१३, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.
****
चीनमधे सुरु असलेल्या एफ आय एस यू जागतिक
आंतरविद्यापीठ स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारतानं तीन सुवर्णपदकांची कमाई केली.
नेमबाजीच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकर, यशस्विनी देसवाल आणि अभिज्ञा पाटील या भारतीय संघानं चीन आणि
इराणला मागे टाकत सुवर्णपदक पटकावलं. मनु भाकरनं महिलाच्या वैयक्तिक दहा मीटर एअर
पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत, २३९ पूर्णांक सात दशांश गुण
मिळवत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. एलाव्हेनिल वलारिवननं दहा मीटर एअर
रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.
****
श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या ॲथलेटीक्स नॅशनल
विजेतेपद स्पर्धेत भारतानं काल दुसऱ्या दिवशी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि
एक कांस्य पदक पटकावलं. बाल किशन यानं पुरुषांच्या तर प्रिती लांबा हिनं महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस
प्रकारांत सुवर्ण पदक मिळवलं. तर सोनिया बईश्या हिनं महिलांच्या ४०० मिटर
धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक आणि जिस्ना मॅथ्युज हिनं कंस्य पदक मिळवलं.
****
महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य
केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती इथं एका कार्यक्रमात भिडे यांनी हे वक्तव्य केलं
होतं.
दरम्यान, संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली
भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी, काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. संभाजी भिडे यांना अटक करुन कठोर कारवाई
होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी
दिला आहे.
पुणे, सातारा, बुलडाणा, मोताळा,
धुळे जळगाव जामोद सह काल राज्यभर, काँग्रेसच्या
वतीनं संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथंही काँग्रेस
पक्षाच्या वतीनं आंदोलन करून भिडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
****
आशुरा - ए - मोहरम काल पाळण्यात आला. प्रेषित
मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी करबला इथं
आपल्या प्राणांची आहुती दिली, तो दिवस मोहरम म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त काल ठिकठिकाणी
मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिया मिरवणुका माती जुलूस काढण्यात आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात एक ऑस्टपासून इंद्रधनुष लसीकरण मोहीम
राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरणापासून
वंचित राहिलेल्या आणि अर्धवट लसीकरण झालेल्या गर्भवती तसंच शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या
बालकांचा शोध घेवून त्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातला
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, यांच्या मार्फत घरोघरी जावून
सर्वेक्षण करण्यात आलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात विसामुंडी इथं
नक्षलवाद्यांनी उभारलेलं, जहाल नक्षलावादी
बिटलू मडावी याचं स्मारक पोलिसांनी काल उध्वस्त केलं. पोलिसांनी
जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या संतधार पावसामुळे
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला हनुमान सागर प्रकल्प पूर्ण भरला आहे. प्रकल्पाचे
दोन वक्रकार दरवाजे काल उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल
बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. आपदग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ काल नाशिक
जिल्ह्यातल्या सटाणा इथं विविध संघटनांच्या वतीनं अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
मात्र या मोर्चानंतर अचानक काही युवकांनी दगडफेक केल्यानं पन्नासहून अधिक वाहनांचं
नुकसान झालं, तर चार जण जखमी
झाल्याचं वृत्त आहे. या दगडफेकीमुळे सटाणा शहरातल्या बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद
केल्या होत्या.
****
लातूर शहरात डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी
घर आणि परिसराची स्वछता पाळावी, असं अवाहन, लातूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात
आलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
शिक्षक प्रेरणा परीक्षा आज घेण्यात येणार आहे. दोन दिवस असलेल्या या परीक्षेसाठी नोंद
केलेल्या शिक्षकांनी परीक्षेस वेळेवर उपस्थित राहून परीक्षा देण्याचं आवाहन नांदेडचे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद इथं खासगी प्रवासी बसवर दगडफेक करून प्रवाशांना
लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. काल पहाटेच्या सुमारास मुंबई तसंच पुण्याहून
औरंगाबादमार्गे नागपूर तसंच हिंगोलीला जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न
झाला. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवल्यानं चोरटे पसार झाले.
पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करून दोन जणांना अटक केली.
****
उस्मानाबाद इथं जिल्हा पोलीस दल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग
यांच्या संयुक्त विद्यमानं काल महादेव टेकडी परिसर वरंवटी, तसंच घाटनांदुर, ईट
डोंगरमाळावर पंधराशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment