Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
तीन ते आठ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
सीबीएसईचा देशभरात एकच अभ्यासक्रम, मातृभाषेतून
शिक्षणाला प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
·
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय
कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांचा समावेश.
·
बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर शहराजवळ
दोन खाजगी बसची समोरासमोर धडक, ६ जणांचा मृत्यू.
·
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या
उपान्त्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात.
आणि
·
भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये
दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना बार्बाडोसच्या मैदानावर थोड्याच वेळात रंगणार
****
२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. देशाला
यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित
अखिल भारतीय शिक्षण संगम या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवीन शिक्षण
धोरणा अंतर्गत मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या
ज्ञान आणि आकलनाचं मोजमाप केवळ भाषा ज्ञानाच्या आधारे लागणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.
नवीन शिक्षण धोरणामुळं देशभरात एकच अभ्यासक्रम विविध २२ प्रादेशिक भाषांमधे शिकवला
जाईल असं मोदी यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
संसद मे नॅशनल रिसर्च
फाऊंडेशन बिल पेश करने के लिये कॅबिनेट अपनी मंजुरी दे दी है। राष्ट्रीय शिक्षा निती
के तहत नॅशनल करूक्युलम फ्रेमवर्क भी जल्दी ही लागू हो रहा है। यानी तीन से आठ साल
के बच्चों के लिये फ्रेमवर्क तयार भी हो गया है। बाकी के लिये करूक्युलम बहोत जल्द
ही हो जायेगा। अब पुरे देश में सी बी एस ई स्कुलों मे एक तरह का पाठ्यक्रम होगा।
विविध भाषांमधल्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनही यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
करण्यात आलं. नवीन शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात
आलं असून ते दोन दिवस चालेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचंही भाषण
यावेळी झालं.
****
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची
घोषणा केली. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेल्या संजय बंदी आणि राधामोहन अग्रवाल
यांना सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे
आणि विजया रहाटकर यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह, वसुंधरा राजे, रघुवर दास, सौदान
सिंह, सरोज पांडेय, रेखा वर्मा,
डीके अरुण, एम चौबा, अब्दुल्ला
कुट्टी, लक्ष्मीकांत वाजपेयी, लता उसेंडी
आणि तारीक मंसूर यांचाही या यादीत समावेश आहे. राष्ट्रीय महामंत्र्यांमधे महाराष्ट्राच्या
विनोद तावडे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर अरुण सिंह, कैलाश
विजयवर्गीय, दुष्यंत कुमार, तरुण चुग,
सुनील बंसल, संजय बंदी, राधामोहन
अग्रवाल यांचाही राष्ट्रीय महामंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० जुलैला नागरिकांशी आकाशवाणीवरून मन की बात या
कार्यक्रमाद्वारे संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारीत होणाऱ्या या मासिक
कार्यक्रमाचा हा १०३ वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील थेट
प्रक्षेपित केला जाईल. मराठीमध्ये रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचा अनुवाद आकाशवाणीवरुन
प्रसारित होईल.
****
बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर झालेल्या
दोन खाजगी बसची समोरासमोर धडक होऊन ६ जण ठार, तर २५ ते ३०
प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त
झालेली एक बस, अमरनाथ यात्रा आटोपून हिंगोलीला जात होती,
तर दुसरी बस नाशिकच्या दिशेनं जात होती. नाशिकला जात असलेल्या बसनं ट्रकला
मागे टाकण्याच्या प्रयत्नात, समोरुन येणाऱ्या बसला धडक दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची
मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात उद्या ३० आणि ३१ जलै रोजी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यात येणार
आहे. परीक्षेसाठी नोंद केलेल्या शिक्षकांनी परीक्षेस वेळेवर उपस्थित राहून परीक्षा
देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
महसूल सप्ताहानिमित्त शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वाढेल यावर लक्ष
केंद्रीत करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करावं,
असं आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. १ ऑगस्टपासून
राज्यात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विखे यांनी आज
राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी
ते बोलत होते. या सप्ताहामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या
विविध कलागुणांना वाव मिळेल, तसंच यात जिल्ह्यातील नागरिकांना
सहभागी करुन घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकोपा निर्माण होईल, असं विखे यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद इथं आज लोक अभिरक्षक कार्यालयाचं उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे
पालक न्यायमूर्ती अरूण रामनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. गरजू व्यक्तींना
मोफत कायदेशीर मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने उस्मनाबाद
इथं लोक अभिरक्षकांची २४ एप्रिल २०२३ रोजी नेमणूक केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज दाखल
करण्यासाठी, अटक झाल्यानंतर रिमांडसाठी सहाय्य आणि नियमित
जामिनासाठी सहाय्य, तसंच खटला चालवण्यासाठी आणि खटला चालू असताना
एखाद्या अंतिम आदेशाच्या विरुध्द सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्यासाठी
लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत मोफत मदत पुरविण्यात येत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या
अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यावेळी उपस्थत होत्या.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात विसामुंडी इथं नक्षलवाद्यांनी उभारलेले
जहाल नक्षलावादी बिटलू मडावी याचं स्मारक पोलिसांनी आज उखडून टाकलं. शुक्रपासून सुरू
झालेल्या नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या पार्श्वभूमीवर
चोख बंदोबस्त ठेवला आहे.
****
लातूर शहरात डेंग्यु आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी
घर आणि परिसराची स्वछता पाळावी, असं अवाहन लातूर महानगरपालिकेच्या
वतीनं करण्यात आलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन
तपासणी करत आहेत. तथापि, नागरिकांनीही स्वछता पाळावी,
यासाठी नागरिकांना अवाहन केल्याचं महानगरपालिका प्रशासनाने कळवलं आहे.
****
महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या
विरुद्ध अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती इथं
एका कार्यक्रमात भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. प्रक्षोभक भाषण करणे याप्रकरणी
१५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
****
जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या जपान ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य
फेरीत भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याचं आव्हान संपुष्टात आलं. आज पुरुषांच्या
उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या
जोनाटन क्रिस्टीकडून लक्ष्य सेन १५-२१, २१-१३, १६-२१ असा पराभूत
झाला.
****
भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना आज विंडीजमध्ये
बार्बाडोस इथं केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी
सात वाजता हा सामना सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना मोठ्या फरकानं
जिंकून भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा
भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे मालिकेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विंडीजला
हा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही
ठिकाणी पूल देखील वाहून गेले आहेत. अशा गावांतल्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी
बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी विक्रमगड, वाडा, मोखाडा या तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी
करून आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी
आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
****
मोहरमनिमित्त मुस्लिम समाज देशभरात आज मातम पाळत आहे. मोहरमच्या निमित्तानं हजरत
इमाम हुसेन यांच्या त्यागाची आठवण होत आहे, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment