Monday, 31 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मणिपूर मुद्यावरुन संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुर होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी, मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी करत, घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. कामकाज सुरु होताच विरोधकांनी मणिपूर मुद्यावर नियम २६७ अन्वये चर्चेची मागणी लाऊन धरली. या मुद्यावर सरकार आज दुपारी दोन वाजता चर्चा करेल, असं सभागृह नेते पियुष गोयल यांनी सांगितलं. विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी केली. यावरुन गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सत्तारुढ रालोआ बैठका घेणार आहेत. या बैठका १० ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. बैठकीची सुरुवात पश्चिम उत्तरप्रदेश आणि बुंदेलखंड आणि ब्रज क्षेत्रातल्या खासदारांसोबतच्या चर्चेनं होईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन आणि पूजा करून करणार आहेत. पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.

कचऱ्यातून उर्जा या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं, तर पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या एक हजार २८० हून अधिक आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या दोन हजार ६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण पंतप्रधान करणार आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये सीमा संरक्षण दलाच्या जवानांनी जम्मू नजिकच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका पाकिस्तानी घुसखोर्याला गोळ्या घालून ठार केलं. या घटनेनंतर संबंधित क्षेत्रात तपास अभियान सुरु करण्यात आलं आहे.

****

केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं कुशल मनुष्यबळ, उत्कृष्ट पायाभूत सुविधा असून, आपलं राज्य हरित तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि बंदर पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

पुणे पोलिसांकडून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशवाद्यांच्या तपासात अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये ५०० जीबी डाटा आढळून आला आहे. तसंच यामध्ये ड्रोनद्वारे करण्यात आलेलं चित्रीकरणही पोलीसांच्या हाती आलं आहे. दहशतवाद्यांनी राज्यातल्या अनेक शहरात पाहणी केली होती. मुंबईतल्या छाबड हाऊसची छायाचित्रंही आढळून आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

****

रेल्वे सुरक्षा बल - आरपीएफच्या एका हवालदारानं आज पहाटे पालघर इथं जयपूर एक्सप्रेस रेल्वेत चार जणांची गोळी झाडून हत्या केली. चेतन सिंह असं त्याचं नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये आरपीएफचे अधिकारी टिकाराम मीना यांच्यासह इतर प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफच्या या दोन कर्मचार्यांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यूमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

****

चीनमधल्या चेंगंदू इथं सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत महिला कपांऊंड तिरंदाजी प्रकारात अवनीत कौरनं आज सुवर्ण पदक पटकावलं.

नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री - पोझिशन आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्य तोमरनं सर्वोच्च कामगिरी करत दोन सुवर्ण पदक जिंकले. १० मीटर एअर रायफल प्रकारात दिव्यांश सिंग पनवरला रौप्य पदक मिळालं. नेमबाजीतच सांघिक प्रकारात ऐश्वर्य, दिव्यांश, अर्जून बबुता यांनी एक हजार ८९४ गुणांची कमाई करत सांघिक सुवर्ण पदकाची देखील कमाई के  ली. या स्पर्धेत आतापर्यंत भारत आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १६ पदकं जिंकत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

No comments: