Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
संकटकाळात एकमेकांना धरुन राहण्याची
‘सर्वजन हिताय' वृत्ती हीच भारताची मोठी शक्ती
- ‘मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
सिंगापूरच्या सात उपग्रहांचं
इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण.
·
ठाणे- नाशिक आठ पदरी महामार्गाचं
काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
आणि
·
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील
दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करणार-शालेय शिक्षण मंत्री दीपक
केसरकर यांची माहिती.
****
देशात अलिकडेच आलेल्या नैसर्गिक संकटांचा सामना आपण एकजुटीने केला असून, संकटकाळात एकमेकांना धरुन राहण्याची आपली ‘सर्वजन हिताय'
वृत्ती हीच भारताची शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं. आकाशवाणीवरुन दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी
प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा आजचा शतकोत्तर तिसरा भाग होता. गेल्या महिनाभरात
देशाच्या विविध भागात अतिवृष्टी, पूर, दरड
कोसळणं अशा दुर्घटना झाल्या मात्र देशवासियांनी एनडी आर एफ आणि प्रशासनाच्या बरोबरीने
खंबीरपणे सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलं असं पंतप्रधान म्हणाले. पावसाळा
‘वृक्षारोपण आणि ‘जलसंरक्षण'
यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असं
सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ‘अमृत महोत्सवा'निमित्त तयार झालेल्या 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांची माहिती
दिली. उज्जैनमधे 18 चित्रकार मिळून भारतीय परंपरेतल्या पुराणकथांवर आधारित चित्रकथा
तयार करत आहेत याचा उल्लेख त्यांनी केला. राजकोटचे चित्रकार प्रभातसिंग बरहाट यांनी
काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या प्रसंगावर काढलेल्या चित्राची
माहिती देत पंतप्रधानांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ते म्हणाले -
ये
Painting, छत्रपति वीर शिवाजी महाराज के जीवन
के एक प्रसंग पर आधारित थी| Artist प्रभात भाई ने दर्शाया था
कि छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक के बाद अपनी कुलदेवी ‘तुलजा
माता' के दर्शन करने जा रहे थे, तो उस समय
क्या माहौल था| अपनी परम्पराओं, अपनी धरोहरों
को जीवंत रखने के लिए हमें उन्हें सहेजना होता है, उन्हें जीना
होता है, उन्हें अगली पीढ़ी को सिखाना होता है| मुझे खुशी है, कि, आज, इस दिशा में अनेकों प्रयास हो रहे हैं|
स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवानिमित्त' सुरू होत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश' - ‘माझी माती माझा देश' या अभियानाची पंतप्रधानांनी माहिती
दिली. या अभियानात सर्वांनी सहभागी होत, अमृतकालसाठी आपण मागे
चर्चा केलेल्या ‘पंच प्राण' पूर्ततेसाठी
देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घ्यावी, आणि ही शपथ घेतानाचे
सेल्फी yuva.gov.in या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी
केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान परवा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
येत्या मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे इथे लोकमान्य टिळक
पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यात फुगेवाडी मेट्रो स्थानक ते शासकीय न्यायालय
स्थानक आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानचं मेट्रो रेल्वेचं काम
पूर्ण झालं असून या मेट्रोला पंतप्रधान परवा हिरवा झेंडा दाखवतील. पिंपरी चिंचवड पालिकेच्या
टाकाऊतून उर्जाप्रकल्प या प्रकपाचं उद्घाटन ही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार २८०
घरांचं हस्तांतरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा
इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सिंगापूरच्या डी. एस. - एस. ए. आर. उपग्रहासह एकूण
सात उपग्रह आज पहाटे अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. पी.एस.एल.व्ही.
सी- छप्पन या रॉकेटद्वारे हे उपग्रह सकाळी साडे सहा वाजता अवकाशात प्रक्षेपित करण्यात
आले. ही कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा असून व्यावसायिक
स्वरुपातील अभियानही याद्वारे यशस्वीरित्या साध्य झालं आहे. हे प्रक्षेपण म्हणजे इस्रोच्या
रिमोट सेन्सिंग क्षमतेच्या प्रगतीचं प्रतीक आहे. डीएस-एसएआर उपग्रहाच्या माध्यमातून
खराब वातावरणात आणि रात्रीही उत्तम दर्जाची छायाचित्रं मिळू शकतात. पीएसएलवीच्या कोर
अलोन प्रकारातील हे १७ वं उड्डाण आहे.
****
जम्मू इथल्या यात्री निवासातून एक हजार ९८४ भाविकांचा अठ्ठावीसावा जथ्था आज अमरनाथ
यात्रेसाठी अमरनाथ गुहेच्या दिशेनं रवाना झाला . यातले ५६४ भाविक बालतल मार्गाने तर
४१० भाविक नुनवान पहलगाम या मार्गाने अमरनाथ ला पोहोचतील. या वर्षीची अमरनाथ यात्रा
गेल्या १ जुलै पासून सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ५३४ भाविकांनी हिमशिवलिंगाचं
दर्शन घेतलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी श्रावणपौर्णिमेला ही यात्रा पूर्ण होईल.
****
ठाणे- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आठ पदरी रस्त्याचं काम युद्धपातळीवर
पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिंदे
यांनी आज सकाळी ठाणे-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत
होते. लहान वाहनांना रस्ता मिळावा याकरिता
अवजड वाहनं डाव्या बाजूने चालवण्यासंदर्भात वाहनचालकांना सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तसंच या मार्गावरील खड्डे तातडीनं मास्टीकनं
भरण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिले.
****
कामगार विभागाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळवून देण्यासाठी त्यांची
नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात
येणार असल्याचं कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे. वर्धा इथं शासन आपल्या
दारी उपक्रमांतर्गत २२ ते ३० जुलै या कालावधीत कामगारांना विविध येाजनेचा लाभ देण्यासाठी
आयोजित कामगार सेवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात आज ते बोलत होते. उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये कामगारांची भूमिका महत्वाची असते. मात्र, या कामामध्ये कामगारांना सन्मान मिळत नाही. त्यांना त्यांचा सन्मान मिळावा
यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहेत, असं
खाडे यांनी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार
करण्याचा प्रयोग केला जाणार अहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज
नाशिक इथं ही महिती दिली. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सभागृहात केसरकर यांच्या
अध्यक्षतेखाली आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार तसंच दुसऱ्या टप्यात
२० हजार शिक्षकांची भरती सुरू केली आहे. जोपर्यंत नवीन भरती पूर्ण होत नाही,
तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार
आहे, असंही केसरकर यांनी सांगितलं.
****
पश्चिम विभागीय आंतराज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धे करता महाराष्ट्र संघात औरंगाबाद
इथले येथील बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुलकर्णी याची एकेरी करता आणि सोनाली
मिलखेलकरची दुहेरी करता निवड झाली आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्य शिवाय गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा या मध्य प्रदेशातील
इंदूर या शहरात आठ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. सोनाली आणि प्रथमेश हे
दोघं अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे विद्यार्थी
आहेत.
****
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले. जोशी यांचं काल उपचारादरम्यान निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर
लातूर इथं एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने
त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील दवाखान्यात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
****
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
नागरिकांना व्हावी, त्यांना योग्य तो लाभ घेता यावा. तसंच नागरिकांमध्ये
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा बाबत जागरुकता निर्माण व्हावी. यासाठी
परवा एक ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यभरात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment