Friday, 28 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 28.07.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ जूलै  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचं वितरण; महाराष्ट्रातल्या ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, सुमारे एक हजार ८६६ कोटी रुपये जमा 

·      राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज चार ऑगस्टपर्यंत चालणार

·      महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना जाहीर

·      आर्थिक अनियमिताप्रकरणी परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित

·      दहशतवादी संघटना इसिसच्या एका हस्तकाला पुण्यातून अटक

·      नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आज सर्व शाळांना सुटी जाहीर

आणि

·      पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय


सविस्तर बातम्या 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. राजस्थानातल्या सिकर इथं झालेल्या या कार्यक्रमात देशभरातल्या इतर राज्यांसह महाराष्ट्रातल्या ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, सुमारे एक हजार ८६६ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शासकीय निवासस्थानी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,

Byte…

जवळपास अठराशे सहासष्ट कोटी आपल्या राज्यातल्या शहाऐंशी लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले. शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. दोन हजार एकोणीसला या शेतकऱ्यांच्या अतिशय हिताच्या सुरवात झाली निर्णयाला. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो.

****

पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. याअंतर्गत देशभरातल्या सुमारे दोन लाख ८० हजार खत विक्री दुकानांचं, पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रामध्ये रुपांतर होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २६४ पेक्षा अधिक पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.

नाशिक इथं पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं. राज्यात १४ हजार कृषी समृद्धी केंद्रांमधून शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणार असल्याचं, ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांची विविध कारणांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे केंद्र सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचंही बानवकुळे यांनी सांगितलं. 

****

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज चार ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र २९ जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान विधीमंडळाच्या कामकाजाला सुटी असेल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक काल विधानपरिषदेत मंजूर झालं. राज्यातल्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीनं, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

सरकारने केलेल्या उपायोजनांमुळे गेल्या ११ महिन्यात राज्यात एक लाख १८ लाख ४२२ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांचं राज्य बनलं असल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. या कायद्यामुळे उद्योजकांनी अर्ज केल्यावर परवानगी देण्यासाठी संबंधित प्रत्येक खात्याला कालावधीची मर्यादा घालण्यात आली आहे. या परवानग्या विहित कालावधीत न दिल्यास उद्योग विभागाच्या आयुक्त्यांना हे अधिकार जातील असं सामंत यांनी सांगितलं. मागच्या काळात उद्योगधंदे राज्याबाहेर का गेले यासंदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडणार असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

****


दरम्यान, मैत्री विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक असावी, अशी मागणी केली. अन्य राज्यांत उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या २४ तासांत दिल्या जातात, आपल्या राज्यात उद्योजकांना यासाठी आठ महिन्यांपर्यंत थांबावं लागतं, अशी टीका त्यांनी केली. राज्यात उद्योगांना वीज अतिशय महागड्या दरानं दिली जाते, मराठी उद्योजकांवर अन्याय होत असल्यानं उद्योग अन्य राज्यात नेले जात असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

****

राज्यातल्या ज्या अंगणवाड्यांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधांपैकी काही सुविधा उपलब्ध नसतील, तर त्या संबंधित विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.

औरंगाबाद जिल्ह्यात ११६ अंगणवाड्या शाळेच्या खोलीत, ३३६ अंगणवाड्या समाजमंदिरात आणि ३०४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरत असल्याकडे चव्हाण यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

****

कोरोना काळात केलेल्या आर्थिक अनियमिताप्रकरणी परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांना निलंबित करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. खरेदी केलेल्या साहित्याची नोंद नसणं, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्चासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न करणं, खर्च करण्यात आलेल्या रकमेपैकी काही देयके सादर न करणं,  कोरोना कालावधीत नियुक्त डॉक्टरांचं नियुक्तीपत्र उपलब्ध न करणं, आदी कारणांसाठी नागरगोजे यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलं. सदस्य शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

****

राज्यात सर्पदंशावरच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल विधानसभेत केला. रायगडच्या पेण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरचं औषध उपलब्ध नसल्यामुळे बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याची टीका त्यांनी केली.

****

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार असून, या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २०२२ सालच्या पिक विमा संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी विमा नुकसानीच्या प्रमाणात न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांनी यासंदर्भात दिलेली निवेदनं अपील म्हणून ग्राह्य धरण्यात येतील आणि त्याआधारे राज्य तक्रार निवारण समिती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देईल, असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत सांगितलं. आमदार कैलास पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. संबंधित विमा कंपनीच्या नफ्यातून वसुली करून शेतकऱ्यांना विमा वितरण केलं जाईल, असं मुंडे यांनी सांगितलं.

****

वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ३० दिवसात पीडितास न मिळाल्यास, त्या रकमेवर व्याज देण्यात येईल, आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल केलं जाईल. या विषयाचं विधेयक विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे विधेयक मांडण्यात आलं. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एन आय ए नं दहशतवादी संघटना इसिसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी काल पुण्यातून एकाला अटक केली. डॉ. अदनान अली सरकार असं या आरोपीचं नाव असून, त्याच्या घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिल्या प्रकरणी राज्यातून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

****

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, देगलूर या तालुक्यांमध्ये अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातल्या जवळपास ७२ गांवांचा संपर्क तुटला आहे.

मुखेड तालुक्यातल्या राजुरा बुद्रुक इथले प्रदीप बोयाळे हे पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह सापडल्याचं प्रशासनानं सांगितलं.

हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र काल पावसाची संततधार सुरु होती. अनेक भागात शेतामध्ये पाणी शिरुन पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

मुंबई आणि उपनगरात देखील काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी साचलं असून, नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तानसा धरण भरुन वाहत आहे. या धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असून, सात हजार ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्यातही अतिमुसळधार पाऊस सुरु असून, भोगावती आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत. पेण तालुक्यातल्या गणपती कारखान्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यानं, धरणाच्या पायथा वीज गृहातला दुसरा संच सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीमध्ये एकूण दोन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस सुरु असून, नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून मूत्यू झाला.

 

गडचिरोली जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. पुरामुळे ११ मार्गावरची वाहतूक बंद असून, सिरोंचा मधल्या १३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

नाशिक जिल्ह्यात अजूनही अपेक्षेनुसार पाऊस झालेला नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा नसून केवळ दारणा धरणातून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातल्या अपुऱ्या पावसाचा फटका खरीपाच्या पेरणीलाही बसला असून आत्तापर्यंत ७५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

****

हवामान विभागानं पुढचे दोन दिवस नांदेड तसंच ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा इथं अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमी पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात एकूण पाणीसाठा २७ पूर्णांक ४३ टक्के इतकाच असल्याचं विभागानं सांगितलं आहे.

****

बार्बाडोस इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फंलदाजी करत वेस्ट इंडिजचा संघ ११४ धावांवर सर्वबाद झाला. कुलदिप यादवनं चार, रविंद्र जडेजानं तीन, तर हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूरनं प्रत्येकी एक गडी बाद केला. ११५ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं २३व्या षटकात पाच गडी गमावत पूर्ण केलं.

****

उस्मानाबाद इथं `बेटी बचाव बेटी पढाव` या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे काल गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व लिंगनिदान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसंच वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव यांनी यावेळी, गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूण हत्येची माहिती मिळाल्यास, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला माहिती देण्याचं आवाहन केलं. जिल्हा डाँक्टर संघटना आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी औरंगाबाद इथल्या केंद्रीय विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचं, विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक साधनं उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या निमित्तानं शाळा आणि महाविद्यालय स्तरावर एकाच वेळी विविध स्पर्धाचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलं आहे. यानिमित्त जिल्ह्यात एक ते १४ ऑगस्ट पर्यंत, जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना कळावा, यासाठी सहली आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

****

अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भंते अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांच्या पार्थिव देहावर काल जालना इथल्या नागेवाडी नालंदा बुध्द विहार संघभूमी प्रांगणात बौध्द धम्म संस्कार पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जपान, थायलंड इथला भिक्खू गण, अखिल भारतीय भिक्खू संघासह हजोरा बौध्द उपासक आणि उपासिकांची उपस्थिती होती. भंते अंगुलीमाल शाक्यपुत्र यांचं काल पहाटे महापरित्राण पाठ श्रवण करत असताना परिनिर्वाण झालं. ते ९२ वर्षांचे होते.

****

No comments: