Friday, 28 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 28.07.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेसचे अधिररंजन चौधरी यांनी विरोधकांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. अशा प्रकारच्या प्रस्तावावर सादर झाल्यापासून दहा दिवसात चर्चा करण्याची मुदत असते, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाण्यास तयार असल्याचं ते म्हले. यावरुन दोन्ही बाजुने झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाम दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच मणिपूर मुद्यावरुन ४७ प्रस्ताव प्राप्त झाल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. या मुद्यावर चर्चेसाठी वेळ देणार असल्याचं ते म्हणाले. मात्र काँग्रेससह इत विरोधी पक्षांनी मणिपूर मुद्यावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी करत, घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सभापतींनी राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी आणि नागरीकांना सर्व प्रकारची मदत सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर ते बोलत होते. नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातल्या नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असं ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी इथं झालेल्या दरड दुर्घटनेनंतर केलेल्या मदत कार्यची त्यांनी माहिती दिली. विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या मागणीनुसार त्याचा लाभ दिला जाईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यातले निवृत्त शासकीय कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत, यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणण्यात येईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितलं. हे निवृत्तीवेतन अनेकदा उशीरा जमा होत असल्याबद्दल सदस्य नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

राज्यातल्या कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन, ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्यात येणार आहे. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून, पर्याय निवडता येणार आहेत. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालयं किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास परवानगी देण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.

****

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत तीन लाख ६९ हजार २८८ भाविकांनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं. प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी देशांतर्गत भाविकांसोबत विदेशी भाविकांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचं वृत्त आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे तिनावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे.

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

नांदेड जिल्ह्यात काल ९० पूर्णांक ५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. 

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर परिसरात तसंच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं हे धरण ७० टक्के भरलं आहे. त्यामुळे आज धरणातून ५३९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचं, जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितलं.

इगतपुरी मधल्या दारणा धरणातून सध्या दहा हजार ५१४, तर निफाड मधल्या नांदूर मधमेश्वर धरणातून पाच हजार ५७६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे.

****

टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...