Wednesday, 26 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 26.07.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. १९९९ मध्ये लडाखमधल्या उत्तर कारगिल युद्धातल्या वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या लढाईनंतर लडाखमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला होता. यानिमित्त कारगिल मधल्या द्रास इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास युद्ध स्मारकावर युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना अभिवादन केलं. या सैनिकांची शौर्यगाथा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

****

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते, लोकसभेचे अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. एका ट्विट संदेशात त्यांनी ही माहिती दिली. संसदेनं पक्षीय मतभेदांना बाजुला ठेऊन या विषयावर चर्चा करावी, संसदेच्या सदस्यांनी मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकजुटीने उभं राहावं, अशी मणिपूरसह देशभरातल्या जनतेची अपेक्षा असल्याचं शहा यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून पांढरी पूड जप्त करण्यात आली आहे; ही पूड स्फोटकं बनवण्यासाठी वापरली जात असल्याचं निष्पन्न झालं आहे. मोहम्मद युनूस आणि मोहम्मद इम्रान अशी अटक केलेल्यांची नावं असून, त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, मात्र जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून पाच हजार ५१५ घनफूट प्रतिसेकंद तर, गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर धरणातून पाच हजार ५७६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

No comments: