Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 28 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ सप्टेंबर
२०२३ दुपारी १.०० वा.
****
जागतिक नाविन्यता निर्देशांक २०२३ मध्ये भारत ४० व्या क्रमांकावर
कायम आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेनं प्रकाशित
केलेल्या या क्रमवारीत १३२ अर्थव्यवस्थांपैकी भारत ४० व्या स्थानावर कायम असल्याचं
निती आयोगानं म्हटलं आहे. अफाट ज्ञान भांडवल, दोलायमान स्टार्ट-अप इकोसिस्टम आणि सार्वजनिक आणि खाजगी संशोधन संस्थांनी
केलेल्या कामामुळं ही सातत्यपूर्ण सुधारणा होत असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
यापूर्वी २०१५ मध्ये या क्रमवारीत भारत ८१ व्या स्थानावर होता.
****
भक्ती
आणि उत्साहात दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज उत्साहात समारोप होत आहे. छत्रपती संभाजी नगर इथं ढोल, ताशांच्या गजरात विसर्जन
सुरू झालं आहे. मुंबईच्या आकर्षणाचं
केंद्र असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक दुपारी बारा वाजता सुरू झाली
आहे. लाखो गणेश भक्त राजाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा थांबले आहेत.
गणेशगल्लीचा राजा, तेजूकाया,
चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या
प्रसिध्द गणपतींच्या भव्य मिरवणुका निघाल्या आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी गर्दीचं
नियोजन केलं आहे.
****
मुस्लिम धर्मीयांचे प्रेशित पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त
साजऱ्या होणाऱ्या मिलाद उन नबी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत. बंधुत्वाची आणि एकोप्याची भावना सदैव समाजात
राहो, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
देशाचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांचं आज सकाळी
चेन्नई इथं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. १९८७ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक
अन्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होत. त्यांनी कृषी क्षेत्रातल्या
संशोधनासाठी संशोधन संस्थेची स्थापना केली होती. भारत सरकारनं कृषी क्षेत्राच्या
अभ्यासासाठी स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापन केली होती.
****
प्रखर देशभक्त भगत सिंग यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताच्या
स्वातंत्र्यासाठी भगत सिंग यांचा त्याग आणि समर्पण नवीन पिढ्यांना सदैव प्रेरणा
देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं.तसंच भगत सिंग
यांना धैर्याचे दीपस्तंभ संबोधून पंतप्रधानांनी, ते कायमच
न्याय आणि स्वातंत्र्यासाठी भारताच्या अथक लढ्याचे प्रतीक असतील असं म्हटलं आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येत्या दोन ऑक्टोबर रोजी
राज्यभरात साडे तीनशे किल्ल्यांची स्वच्छता करण्याचं आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री
मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक,
तसंच जिल्हा व्यवसाय
शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी हे जिल्ह्यातील १२ गड-किल्ल्यांवर
स्वच्छता अभियान राबवणार आहेत. विविध सामाजिक संस्था,
विद्यार्थी, नागरिक, तसंच
स्वंयसेवकांनी या अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण
अधिकारी मंगला पवार यांनी केलं आहे.
****
मेरी माटी मेरा
देश या उपक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात कचेश्वरनगर कोकमठान इथं विविध उपक्रम घेण्यात
आले तसंच अमृत कलश यात्रा आणि पोषण फेरी देखील काढण्यात आली. एकल महिलांना गृह
भेटी देउन मार्गदर्शन करण्यात आले. तसंच यावेळी उपस्थितांनी पोषण अभियान
प्रतिज्ञा आणि पंच प्राण शपथ घेतली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशू प्रकारात महिलांच्या
साठ किलोग्राम वजनगटात रौप्य पदक जिंकणाऱ्या रोशीबीना देवी नाओरेमला शुभेच्छा दिल्या
आहेत. सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे पंतप्रधानांनी रोशीबीना देवी नाओरेमच्या असाधारण प्रतिभा
आणि सतत उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा केली आहे. मोदी यांनी आशियाई
क्रीडा स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूलच्या पुरुष संघाचे सदस्य सरबजीत सिंह, अर्जुन सिंह चीमा
आणि शिवा नरवाल यांचंही सुवर्णपदक जिंकल्याबद्दल
अभिनंदन केलं आहे.
****
हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
दिला आहे. सातारा शहर आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
****
नांदेड इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रामार्फत उद्या २९ आणि परवा ३० सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ
उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment