Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· युवा शक्तीच्या बळावर देशात सकारात्मक बदलाचा अनुभव - पंतप्रधानांचं प्रतिपादन.
· शासकीय सेवेत नव्यानं भर्ती सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान.
· धनगर आरक्षण मागणीसाठी चौंडी इथलं यशवंत सेनेचं उपोषण मागे.
· ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार
जाहीर.
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला घोडेस्वारीत सुवर्णपदक.
****
युवा शक्तीच्या बळावर आपला देश एक सकारात्मक
बदल अनुभवत आहे,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत
भारत मंडपम इथे जी ट्वेंटी युनिवर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताचे इतर देशांबरोबर संबंध जेव्हा बहरतात
तेव्हा अर्थव्यवस्थेसोबत रोजगाराच्या संधी वाढतात, आणि त्याचा थेट लाभ युवकांना
होतो, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते, 'भारताचं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद', या
विषयावरच्या चार पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.
****
शासकीय सेवेत नव्यानं भर्ती झालेल्या सुमारे
५१ हजार कर्मचाऱ्यांना,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. आज नियुक्तिपत्रं मिळालेल्यांमध्ये अनेक युवतींचा समावेश
आहे, असं सांगत,
नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नारी शक्ति वंदन अधिनियमामुळे देशाला
नवी ताकद मिळाली आहे,
असं पंतप्रधान म्हणाले. देशभरात ४६ ठिकाणी ठिकाणी झालेल्या या
रोजगार मेळाव्यातून केंद्र सरकारच्या टपाल, अणुऊर्जा, महसूल, उच्च
शिक्षण आणि संरक्षण मंत्रालयासह विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये, नवीन
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
नांदेड इथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शंभरहून जास्त उमेदवारांना नियुक्तिपत्रं देण्यात आली.
टपाल विभाग,
भारतीय अन्न महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयकर
विभाग आणि केंद्रीय लोकनिर्माण विभागातल्या जागांसाठी ही नियुक्तिपत्रं देण्यात आली.
नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर रायगड इथं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या
उपस्थितीत हे मेळावे पार पडले.
****
स्वच्छता हीच सेवा हे अभियान शंभर टक्के
यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं 'मिशन मोड'वर काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिले आहेत. येत्या एक तारखेला राबवण्यात येणार असलेल्या स्वच्छतेसाठी 'एक
तारीख एक तास'
या उपक्रमाच्या तयारीच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. १५
सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. या
उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच
येत्या १ ऑक्टोबरला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानाला चळवळीचं स्वरूप
यावं, यासाठी १ ऑक्टोबरला प्रत्येक नागरिकानं आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून
आरक्षण देण्यात यावं,
यामागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं सुरू असलेलं यशवंत
सेनेच्या आंदोलकांचं उपोषण आज मागे घेण्यात आलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी
चौंडी इथं जाऊन उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर
बंडगर आणि रुपनवर यांनी महाजन यांच्या हस्ते सरबत पिऊन गेल्या २१ दिवसांपासून सुरू
असलेलं उपोषण सोडलं. या यशस्वी मध्यस्थीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी, धनगर
समाजाला आरक्षण मिळावं अशी सरकारची भूमिका असून, लवकरच याबाबत मार्ग काढू, असं
सांगितलं. ते म्हणाले -
धनगर समाजाला लागू करण्यात
आलेल्या ज्या योजना आहेत, सोयी सवलती आहेत, प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी, यासंदर्भामध्ये
त्या बैठकीत निर्णय झालेला होता. आणि त्या तात्काळ अधिक प्रभावीपणे लागू करण्यात आलेल्या
आहेत. सरकार अतिशय सकारात्मक आहे ती जी न्याय मागणी आहे ती आपल्या पदरात पडलीच पाहिजे.
परंतू काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत, त्या तात्काळ कशा
सोडवल्या जातील पन्नास दिवसामध्ये, दोन महिन्यामध्ये त्या सोडवायच्या दृष्टीने सरकारने
अतिशय एक पाऊल टाकलेलं आहे. आणि आज या ठिकाणी गेल्या वीस दिवसांपासून चाललेलं उपोषण
हे सोडलेलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांच्या
समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा
विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवला आहे. आज मंत्रालयात कांदा व्यापाऱ्यांसोबतच्या
बैठकीत पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
केली, गोयल यांनी हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या
तत्परतेबद्दल कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी समाधान व्यक्त केलं, तर, शेतकऱ्यांचं
नुकसान होऊ नये,
यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी व्यवहार सुरू करावेत, असं
आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
****
संसदेत महिला आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर
झालं असून या विधेयकाला कोणीही विरोध केला नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
महिला आरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून, आपण
मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं, याकडे
पवार यांनी लक्ष वेधलं. देशात महिला धोरण आणणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, असं
सांगत, महिला आरक्षण विधेयकाला काही पक्षांनी नाईलाजानं पाठिंबा दिला, हे
पंतप्रधानांनी केलेलं विधान बरोबर नाही, असंही पवार यांनी नमूद केलं
****
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी नागपूरचं सिमेंटीकीकरण
केल्याचा तसंच नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आज नागपूर इथं पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष
आढावा घेऊन नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत
बोलत होते. या पुराला नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास या यंत्रणाही
जबाबदार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
****
यंदाच्या दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कारासाठी
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ही माहिती दिली. वहिदा रहमान यांनी पाच दशकांच्या
कारकीर्दीत अभिनयाचं उत्तुंग दर्शन घडवत चित्रपटसृष्टी समृद्ध केली, तसंच
सामाजिक कार्यातही भरीव योगदानही दिलं, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
वहिदा रहमान यांना रेश्मा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं तसंच पद्मश्री
आणि पद्मभूषण या नागरी सन्मानांनीही गौरवण्यात आलं आहे.
****
चीनच्या हांगचोओ इथे सुरू असलेल्या एकोणिसाव्या
आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतानं तिसरं सुवर्णपदक जिंकलं. घोडेस्वारीच्या ड्रेसेज
टीम स्पर्धेत सुदीप्ति हजेला, दिव्याकृति सिंह, हृदय
छेदा आणि अनुष अग्रवाल यांच्या संघानं प्रथम स्थान मिळवलं. घोडेस्वारी या क्रीडाप्रकारात
भारताला एक्केचाळीस वर्षांनंतर सुवर्णपदक मिळालं आहे. नौकानयन स्पर्धेच्या डिंगी प्रकारात
नेहा ठाकूर हिनं रजत पदक जिंकलं तर पुरुषांच्या विंडसफर स्पर्धेत एबदाद अलीनं कांस्य
पदक जिंकलं. या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रजत आणि सात कांस्य पदकं
जिंकत भारत पदक तालिकेत सातव्या स्थानावर आहे.
****
मध्य रेल्वेच्या एकशे सतरा स्थानकांवर चेहरा
ओळखण्याची प्रणाली असलेले तीन हजार सहाशे बावन्न कॅमेरे बसवण्यात येणार असून, तीनशे
चौसष्ट स्थानकांवर व्हिडिओ पाळत ठेवणारे सहा हजार एकशे बावीस कॅमेरे बसवण्यात येणार
आहेत. या प्रणालीमुळे,
ही सगळी स्थानकं सुरक्षेच्या दृष्टीने सतत डिजिटल देखरेखीखाली
राहणार आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. शासकीय नोकरीच्या
भरतीचं खाजगीकरण तसंच अन्य काही निर्णयांच्या शासन आदेशांच्या प्रती यावेळी पेटवून
देण्यात आल्या.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या जवाहर
नवोदय विद्यालयात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत सगळे विद्यार्थी, शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात आली. या सप्ताहात बालकांसाठी
विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment