Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 September
2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
युवा शक्तीच्या बळावर देशात सकारात्मक बदलाचा अनुभव-पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
शासकीय सेवेत नव्यानं भर्ती सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना
नियुक्तीपत्रांचं वितरण; नांदेड
इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मराठवाड्यातल्या कर्मचाऱ्यांना
नियुक्तीपत्रं प्रदान
·
स्वच्छता हीच सेवा अभियान शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी
प्रशासकीय यंत्रणेनं ‘मिशन
मोड’वर
काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
धनगर आरक्षण मागणीसाठी चौंडी इथं सुरू असलेलं यशवंत सेनेचं उपोषण मागे
·
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब
फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर
आणि
·
आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला घोडेस्वारीत सुवर्णपदक
सविस्तर
बातम्या
युवा शक्तीच्या बळावर आपला
देश एक सकारात्मक बदल अनुभवत आहे,
असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत भारत मंडपम इथं जी ट्वेंटी युनिवर्सिटी
कनेक्ट फिनाले कार्यक्रमात ते बोलत होते. भारताचे इतर देशांबरोबर संबंध जेव्हा बहरतात
तेव्हा अर्थव्यवस्थेसोबत रोजगाराच्या संधी वाढतात, आणि त्याचा थेट लाभ युवकांना होतो, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या
हस्ते, भारताचं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद, या विषयावरच्या चार पुस्तकांचं प्रकाशन
करण्यात आलं.
****
शासकीय सेवेत नव्यानं भर्ती
झालेल्या सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. नियुक्तिपत्रं मिळालेल्यांमध्ये अनेक युवतींचा
समावेश आहे, याकडे लक्ष वेधत, नुकत्याच अस्तित्वात आलेल्या नारी
शक्ति वंदन अधिनियमामुळे देशाला नवी ताकद मिळाल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशभरात ४६
ठिकाणी ठिकाणी झालेल्या या रोजगार मेळाव्यातून केंद्र सरकारच्या टपाल, अणुऊर्जा, महसूल, उच्च शिक्षण आणि संरक्षण मंत्रालयासह
विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये,
नवीन कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली.
नांदेड इथं केंद्रीय रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शंभरहून जास्त उमेदवारांना नियुक्तिपत्रं
देण्यात आली. यामध्ये नांदेड,
परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,
लातूर, भुसावळ, आणि जळगाव या जिल्ह्यातल्या युवकांचा समावेश आहे. खासदार
प्रतापराव पाटील चखिलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागपूर इथं केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी तर पवनेल इथं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत हे मेळावे
पार पडले.
****
स्वच्छता हीच सेवा हे अभियान
शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं ‘मिशन मोड’वर काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी दिले आहेत. येत्या एक तारखेला राबवण्यात येणार असलेल्या स्वच्छतेसाठी 'एक तारीख एक तास' या उपक्रमाच्या तयारीच्या आढावा बैठकीत
ते काल बोलत होते. स्वच्छता अभियानाला चळवळीचं स्वरूप यावं, यासाठी एक ऑक्टोबरला प्रत्येक नागरिकानं
आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा,
असं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमाती
प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं,
या मागणीसाठी
अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं सुरू असलेलं यशवंत सेनेच्या आंदोलकांचं उपोषण काल मागे
घेण्यात आलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी इथं जाऊन उपोषणकर्ते सुरेश
बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण
सोडलं. या यशस्वी मध्यस्थीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी, धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी सरकारची
भूमिका असून,
लवकरच याबाबत
मार्ग काढू, असं सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा
व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी व्यक्त केला आहे. काल मंत्रालयात कांदा व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत पवार यांनी
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, गोयल यांनी हा प्रश्न सोडवण्याचं
आश्वासन दिलं असून परवा २९ तारखेला गोयल यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं पवार यांनी
सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी
समाधान व्यक्त केलं,
तर, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी
व्यवहार सुरू करावेत,
असं आवाहन
पवार यांनी केलं
****
संसदेत महिला आरक्षण विधेयक
एकमतानं मंजूर झालं असून या विधेयकाला कोणीही विरोध केला नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महिला आरक्षण
देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून, आपण मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
महिलांना आरक्षण दिलं,
याकडे त्यांनी
लक्ष वेधलं. देशात महिला धोरण आणणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, असं सांगत, महिला आरक्षण विधेयकाला काही पक्षांनी
नाईलाजानं पाठिंबा दिला,
हे पंतप्रधानांनी
केलेलं विधान बरोबर नाही,
असंही पवार
यांनी नमूद केलं.
****
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी
नागपूरचं सिमेंटीकीकरण केल्याचा तसंच नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केला आहे. काल नागपूर इथं पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या पुराला नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास
या यंत्रणाही जबाबदार असल्याचं टीका दानवे यांनी केली.
****
यंदाच्या दादासाहेब फाळके जीवन
गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ही माहिती दिली. वहिदा रहमान
यांनी पाच दशकांच्या कारकीर्दीत,
अभिनयाचं
उत्तुंग दर्शन घडवत चित्रपटसृष्टी समृद्ध केली, तसंच सामाजिक कार्यातही भरीव योगदानही दिलं, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. वहिदा
रहमान यांना रेश्मा और शेरा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं तसंच पद्मश्री आणि
पद्मभूषण या नागरी सन्मानांनीही गौरवण्यात आलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या १९
व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं घोडेस्वारी प्रकारात तब्बल ४० वर्षांनंतर सांघिक
सुवर्ण पदक पटकावलं. सुदीप्ती हजेला,
दिव्यकिर्ती
सिंग, अनुश अग्रवाल आणि हृदय छेडा
यांच्या संघानं ही कामगिरी केली. या सर्वांनी उत्तम कौशल्य, सांघिक एकता दाखवत आंतरराष्ट्रीय
पातळीवर देशाला सन्मान मिळवून दिला,
असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नौकानयन स्पर्धेच्या डिग्गी
प्रकारात नेहा ठाकूर हिनं रौप्य पदक जिंकलं, तर पुरुषांच्या विंडसफर स्पर्धेत एबदाद अलीनं कांस्य पदक
जिंकलं. या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण १४ पदकं जिंकत भारत
पदक तालिकेत सातव्या स्थानावर आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला
सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं याआधीच
विजयी आघाडी घेतली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श
नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी,
कर्जदारांच्या
तारण मालमत्ता ताब्यात घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. यानुसार
१९ कर्जदारांच्या तारण मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांच्या लिलावातून कर्जाची सुमारे दोनशे
आठ कोटी रक्कम वसूल केली जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर
इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात आली. या सप्ताहात बालकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे.
****
स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता
ही सेवा या अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात येत्या एक ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभाग
घ्यावा, असं आवाहन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी केलं आहे.
****
नांदेड इथं महानगरपालिकेच्या
स्वच्छता विभागाने काल स्वच्छता ही सेवा अंतर्गत गुरुद्धारा परिसरात स्वच्छता मोहीम
राबवली. नागरिकांनी घंटागाडीत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा याबाबत प्रबोधन करण्यात
आलं. या पंधरवड्यांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनानं आज नांदेड शहरातून स्वच्छता दाौड
चं आयोजन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या
पीकपेऱ्याची ई-पीक ॲपद्वारे शंभर टक्के नोंदणी करण्यासाठी, येत्या तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर
या दोन दिवशी,
जिल्हा प्रशासन
एक विशेष मोहीम राबणार आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती शेतकऱ्यांना द्यावी
आणि त्याबद्दलची जनजागृती करावी,
असे आदेश
जिल्हाधिकार्यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
****
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा
प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस परतेल असा अंदाज
आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर,
नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही
जोरदार पाऊस झाला.
अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा
करणारा काळवीट साठवण तलाव ओसंडून वाहत आहे. तर दुसरीकडे मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस
न झाल्यानं, या धरणाची पाणीपातळी अजूनही
शून्य टक्क्यांच्या खाली आहे.
****
No comments:
Post a Comment