Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· आर्थिक प्रगतीसाठी निश्चित धोरणं आखून विकास घडवण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त.
· शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सहा ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान सुनावणी.
· छत्रपती संभाजीनगर इथल्या नियोजित गॅस पाईपलाईनचे काम येत्या एक डिसेंबरपूर्वी
पूर्ण करण्याचे निर्देश.
· गणेश विसर्जनासाठी सर्वत्र चोख व्यवस्था; शुक्रवारी ईद ए मिलाद निमित्त
राज्यशासनाकडून सुटी जाहीर.
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघाला सुवर्णपदक;सिफतकौर
समराचाही सुवर्णवेध.
****
आर्थिक प्रगतीसाठी निश्चित धोरणं आखून पद्धतशीर
विकास घडवण गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हायब्रंट गुजरात
संकल्पनेच्या द्वि दशकपूर्तीनिमित्त अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.
२० वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी या संकल्पनेनुसार
कार्याला प्रारंभ केला होता. गेल्या २० वर्षात गुजरातमधे विकसित झालेल्या विविध उद्योगांची
त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधान आज गुजरात दौऱ्यावर असून सुमारे पाच हजार दोनशे कोटी
रुपये खर्चाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना
आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीच्या कामकाजाचं वेळापत्रक निश्वित केलं आहे.
६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान अपात्रता याचिकांवर युक्तिवाद चालणार आहे.
अपात्रतेच्या सर्व याचिकांवरची सुनावणी एकत्रित घ्यायची की वेगवेगळी याबाबत १३ ऑक्टोबरला
सुनावणी होईल,
त्यावर २० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय जाहीर
करतील. २३ नोव्हेंबरपासून उलट तपासणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. ही कार्यवाही
पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाणार असल्याचं विधिमंडळ
सचिवालयानं कळवलं आहे.
****
राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ
आणि बारामती इथल्या विमानतळांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेण्याचे
निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु
करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या पाच
विमानतळांची उभारणी सुरू केली होती, या प्रक्रियेला वेग देण्याच्या
दृष्टीने या पाच विमानतळांचं खासगी कंपनीकडे हस्तांतरण करण्यास २००९ मध्ये परवानगी
देण्यात आली होती. मात्र,
गेल्या १४ वर्षांत याठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने
आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दळणवळणाचा विकास तसंच
महानगरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित भागात विशेषत: छोट्या
शहरांमध्ये विमान सेवा सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, पवार
यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरातील गॅस पाईपलाईनचे
काम येत्या एक डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत
कराड यांनी दिले आहेत. डॉ कराड यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
गॅस पाईपलाईन कामाचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा
पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले तसंच भारत पेट्रोलिअमचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिलिंडरच्या तुलनेत कमी दरात मिळणारा हा गॅस पर्यावरणपूरक आहे, या
गॅसची गळती झाल्यास,
तो तात्काळ हवेत विरघळतो, अशी माहिती डॉ कराड यांनी
दिली. पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस सध्याच्या सिलेंडरमध्ये मिळणाऱ्या गॅसच्या दरापेक्षा
३० ते ३५ टक्क्यांपर्यत स्वस्त असणार आहे. गॅस पाईपलाईनच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी
सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
उद्या अनंत चतुदर्शी, गेल्या
१० दिवसांपासून भक्ती आणि उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा उद्या समारोप होत असून
या पार्श्वभूमीवर राज्यात विर्सजनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांसाठी
होणारी गर्दी लक्षात घेऊन काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त
पाळावी आणि शांतता,
सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन करावं, असं
आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना केलं आहे. गणेश मंडळांनी देखील विसर्जन
आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला
संदेश द्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या ईद-ए-मिलाद निमित्तही
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ईद-ए-मिलादचं पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल.
यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, असं
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
****
राज्य सरकारने ईद ए मिलाद निमित्त परवा शुक्रवारी
शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. अनंत चतुर्दशी तसंच आणि
ईद ए मिलादनिमित्त राज्याच्या विविध भागात मिरवणुका काढण्यात येत असतात. उद्या हे दोन्ही
सण एकत्र आल्यामुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची
शक्यता लक्षात घेऊन परवा २९ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
****
नांदेड शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जनाची
जय्यत तयारी झाली असून शहरात १८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती या संकलन केंद्रावर देण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं
करण्यात आलं आहे. पोलीस दलाच्या वतीने विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्त
ठेवला जाणार आहे. विसर्जनादरम्यान शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून उद्या
भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत
भारताच्या खेळाडूंनी आज दोन सुवर्ण पदकं पटकावली. महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर
रायफल प्रकारात सिफतकौर समराने सुवर्णपदक तर आशी हिने कांस्यपदक जिंकलं. ५० मीटर रायफल
प्रकारात महिला संघाने रौप्य पदक पटकावलं. नेमबाजीतच २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या
महिला संघाने सुवर्ण पदक पटकावलं. तर याच प्रकारात ईशा सिंह हिने रौप्य पदक जिंकलं.
पुरुषांच्या संघाने स्कीट स्पर्धेत कांस्य पदक, तसंच नौकायन स्पर्धेत डोंगी
प्रकारात विष्णू सर्वानन याने कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत पाच सुवर्ण, सात
रौप्य आणि १० कांस्य पदक मिळवत भारतीय संघ पदकतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
****
****
सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विविध
कार्यकर्त्यांना,
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
करण्यात आले. 'सुधारक-कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार' हेरंब कुलकर्णी यांना, तर
'अंनिस कार्यकर्ता जीवनगौरव' पुरस्कार प्रभाकर नानावटी यांना जाहीर करण्यात
आला आहे. यासह इतर विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले. सन्मानपत्र आणि १५ हजार रुपये
असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. येत्या एक ऑक्टोबर रोजी नांदेड इथं होणाऱ्या अंनिसच्या
राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हिंद विद्यामंदिर
इथं आज मेरी माटी मेरा मेरा देश या उपक्रमाअंतर्गत 'अमृत कलश यात्रा' काढण्यात
आली.यावेळी या भागात वाद्य वृंदासह प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांच्या हस्ते अमृत
कलशामध्ये परिसरातील माती आणि धान्य एकत्रित करण्यात आलं.
****
दसरा, दिवाळी सणांसाठी दक्षिण
मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. नांदेड - ईरोड - नांदेड ही गाडी
२६ नोव्हेंबरपर्यंत,
तिरूपती - साईनगर शिर्डी - तिरूपती ही गाडी २७ नोव्हेंबरपर्यंत
तर काझीपेट - दादर - काझीपेट या गाडीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment