Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· नारी शक्ती वंदन अधिनियमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी;विधेयकाचं
कायद्यात रुपांतर
· येत्या एक ऑक्टोबरला स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं
आवाहन
· अहमदनगर- बीड -परळी या रेल्वेमार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण
आणि
· छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गणेश मूर्ती दान आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद;दानात
मिळालेल्या अडीच हजार मूर्ती पुन:वापरासाठी मूर्तीकारांना प्रदान
****
एकशे सहाव्या घटनादुरुस्तीच्या नारी शक्ती
वंदन अधिनियमावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे संसदेनं
संमत केलेल्या या विधेयकाचं आता नारी शक्ती वंदन कायद्यात रुपांतर झालं आहे. संसदेच्या
नव्या वास्तुत नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात लोकसभेनं बहुमतानं, तर
राज्यसभेनं एकमतानं हे विधेयक मंजूर केलं होतं. या कायद्यामुळे लोकसभा तसंच राज्यांच्या
विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजना
२०२१-२२ चे पुरस्कार राष्ट्रपतींनी आज प्रदान केले. सामाजिक सेवेतल्या योगदानासाठी
५२ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ पवन रमेश
नाईक, जान्हवी विजय पेड्डीवार, वेदांत सुदाम डीके यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच युवा कार्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते.
****
येत्या एक ऑक्टोबरला संपूर्ण देशभरात राबवण्यात
येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. सामाजिक माध्यमावर आज जारी केलेल्या संदेशात त्यांनी, स्वच्छ
भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असल्याचं
नमूद केलं.
उत्तर प्रदेशनं स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या
दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के गावांनी ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त करून आणखी एक मोठा टप्पा
गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. महात्मा गांधीजींच्या जयंतीपूर्वी, उत्तर
प्रदेशची ही अभूतपूर्व कामगिरी संपूर्ण देशाला प्रेरणा देईल, असं
ते म्हणाले.
****
दरम्यान, पंतप्रधान उद्या नवी
दिल्लीत भारत मंडपम इथं 'संकल्प सप्ताह'
या विशेष अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. नागरिकांचं जीवनमान
सुधारण्यासाठी गट स्तरावरील कारभार सुधारणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था-
आयटीआयच्या वतीनं एक ऑक्टोबरला स्थानिक परिसर तर दोन ऑक्टोबरला राज्यातील गड -किल्ल्यांची
स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन लोढा यांनी केलं आहे.
****
देशातील सहा विमा कंपन्यांना वस्तू आणि सेवा
कर चुकवेगिरीबद्दल नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वस्तू
आणि सेवा कर दक्षता महासंचालनालयानं सहा विमा कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये चुकवल्याप्रकरणी
या नोटिसा बजावल्या आहेत. या विमा कंपन्यांवर इन्श्युरन्स प्रिमियमवर जीएसटी न भरल्याचा
आरोप आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही कंपनीचं नाव जाहीर केलेलं नाही.
एलआयसीसह अनेक विमा कंपन्याही करचुकवेगिरीच्या
चौकशीला सामोरे जात आहेत. याबाबत गेल्या आठवड्यात एलआयसीला २९० कोटी रुपयांची नोटीस
पाठवण्यात आली होती.
****
केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ अर्थात
सेन्सॉर बोर्डातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्रालयानं म्हटलं आहे. दाक्षिणात्य अभिनेते विशाल यांनी हा मुद्दा काल समाज माध्यमांवर
उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नसल्याचं
मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी मुंबईत या प्रकरणाची चौकशी करणार
आहेत. अशा प्रकारांची माहिती 'जे एस फिल्मस डॉट आय एन बी ॲट एन आय सी डॉट
इन' या इमेल आयडीवर पाठवण्याचं आवाहनंही मंत्रालयानं केलं आहे.
****
अहमदनगर- बीड -परळी या नवीन रेल्वेमार्गाचं
काम प्रगतीपथावर सुरु असून भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती मध्य रेल्वे
विभागानं दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून त्यापैकी जवळपास ६६ किलोमीटर
अंतराच्या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं आहे. यासाठी तीन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी
रुपये खर्च झाला असल्याचंही विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं नागरिकांना
गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला
प्रतिसाद देत नागरिकांनी सुमारे अडीच हजार गणेश मूर्ती महापालिकेच्या केंद्रांवर दान
केल्या. या मूर्ती शहरातील १० मूर्तिकारांना पुनःवापराकरता देण्यात आल्या.
महापालिकेनं शहरात ठिकठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती
संकलन केंद्र उभारली होती,
त्या केंद्रांवर २५ हजारावर मूर्तींचं संकलन करण्यात आलं. तर
महापालिकेच्या शहरभरातल्या विसर्जन विहिरींवर काल एक लाख १८ हजारावर गणेश मूर्तींचं
विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शहरातल्या
छावणी परिसरात स्थानिक प्रथेनुसार आज गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे.
****
'ईद-ए-मिलाद-उन-नबी अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाच्या निमित्यानं
आज राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली.
सोलापूर इथं मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात
शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत लहान मुलं जगाला शांतीचा संदेश देणारे देखावे घेऊन
सहभागी झाले होते.
चंद्रपूर इथंही आज सकाळच्या सुमारास ढोल
ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी नमाज पठण करण्यात आलं.
यंदा अनंत चतुर्दशी आणि हजरत पैगंबर जयंती
काल एकाच दिवशी होती. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाज बांधवांनी
कालच्या ऐवजी आज मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता.
****
ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत राज्य
सरकारने विरोधकांना सहभागी करून न घेतल्याबद्दल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. राज्यात परिस्थिती विपरीत असते तेव्हाच सरकारला विरोधकांची आठवण येते, अशी
टीका दानवे यांनी यावेळी केली.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात
आली आहे. शिक्षण पध्दतीमध्ये धोरण आणि कार्यतंत्र विकसित करणं, संशोधनाची
व्याप्ती आणि दर्जा यात वाढ करणं या उद्देशाने या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
****
केंद्र शासनाच्यावतीनं आयोजित 'एक
तारीख-एक तास-माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी' हा उपक्रम प्रत्येक गावात मोठ्या
प्रमाणात राबवण्याचं आवाहन जालना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी
शिरीष बनसोडे यांनी केलं आहे. यानिमित्त एक ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातल्या विविध ग्रामपंचायतींमध्ये
विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी सामुहिक
श्रमदान करण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड इथल्या स्वरतरंग प्रतिष्ठानच्या वतीने
दरवर्षी दिला जाणारा लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार गायिका वर्धिनी जोशी यांना
जाहीर करण्यात आला आहे. येत्या सहा ऑक्टोबरला नांदेड इथं सांगितिक मैफलीत हा पुरस्कार
त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
युवतींना, दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये
भारतानं ८ सुवर्णपदकांसह एकूण ३२ पदकं मिळवून पदकतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत पलक गुलियानं आज सुवर्ण पदक पटकावलं तर इशा
सिंगला रजत पदक मिळालं. पुरुषांच्या रायफल ३ पी स्पर्धेत ऐश्वर्य प्रतात सिंग तोमर, स्वप्निल
कुसळे आणि अखिल शेरॉन यांच्या संघाला सुवर्ण पदक मिळालं. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तौल
स्पर्धेत ईशा सिंग,
पलक आणि दिव्या यांना रजत पदक मिळालं.
****
No comments:
Post a Comment