Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 29 September
2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· दहा
दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता;ढोल ताशाचा गजर आणि गुलालाची उधळण करत, पुढच्या वर्षी लवकर येण्याचं गणरायाला साकडं
· राज्यात
विसर्जनादरम्यान सात जणांचा बुडून मृत्यू;वाहून गेलेल्या पाच जणांचा शोध सुरू
· हरित
क्रांतीचे जनक कृषी वैज्ञानिक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचं निधन
· महामार्ग
निर्मितीत कचऱ्याचा वापर करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू
आणि
· आशियायी
क्रीडा स्पर्धेत दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात भारतीय संघाला सुवर्ण पदक
सविस्तर
बातम्या
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची
काल सांगता झाली. राज्यभरात नागरिकांनी ढोल ताशाचा गजर आणि गुलालाची उधळण करत, पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं
घालत, लाडक्या गणरायाला भावपूर्ण
निरोप दिला. स्थानिक प्रशासनानं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांनी विसर्जनासाठी विविध
सोयी सुविधा पुरवल्या होत्या. गणेशमूर्ती विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम तलावांची निर्मिती
करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं शहराच्या
विविध भागात विसर्जन विहिरींसह महानगरपालिकेनं गणेश मूर्ती संकलन वाहनं तसंच मूर्ती
दान कक्षही उभारले होते. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विसर्जन
मिरवणुका आणि गणेशभक्तांवर गुलालाची उधळण करणारी यंत्र हे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचं
खास वैशिष्ट्यं ठरलं.
जालना शहरात महानगरपालिकेतर्फे
मोतीतलाव इथं सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम तलाव उभारण्यात आला होता.
निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
****
नांदेड शहरात महापालिकेनं १८
मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली होती. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनास
प्रतिबंध करण्यात आला असल्यानं नांदेड
शहरानजीक झरी इथल्या तलावात मोठया श्री मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. आसना नदी आणि
पासदगाव नदी काठावर महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
नगरपालिकेनं पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण टाळण्यासाठी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर
मध्ये कृत्रिम हौद तयार करत विसर्जनाची सोय केली होती. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरने
शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, घरोघरच्या गणरायाचं विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.
****
हिंगोली इथं चिंतामणी गणपतीचा
मोदकोत्सव काल साजरा करण्यात आला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte…
हिंगोली शहरातील 'विघ्नहर्ता
चिंतामणी'चा
मोदकोत्सव दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा होतो. यंदा मध्यरात्रीपासूनच भाविकांनी
दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्रसह परराज्यातून चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक
हिंगोलीत दाखल झाले आहेत. यावर्षी संस्थांनच्या वतीने दीड लाख नवसाचे मोदक तयार करण्यात
आले आहेत. त्यांचे भाविकांना वाटपही करण्यात येत आहेत.
****
गणेश विसर्जनादरम्यान काल राज्यात
विविध घटनांमध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला. तर वाहून गेलेल्या पाच जणांचा शोध
सुरू आहे.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली
तालुक्यातल्या बामणी बुद्रुक इथं चार मुलांचा डोहात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये
दोन सख्या भावांचा समावेश आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीत गोवर्धन घाट परिसरातही एक
तरुण बुडाला. जीवरक्षक दलाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक शहरात चेहडी बंधाऱ्याजवळ
दारणा नदी पात्रात विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला, तर पंचवटीत रामकुंडा जवळ नदी विसर्जन
करताना दोन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाकडून त्यांचा
शोध घेण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या
उल्हास नदीत चार गणेशभक्त वाहून गेले. त्यापैकी एक जण बचावला, तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे.
उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे.
****
देशातल्या हरित क्रांतीचे जनक
आणि ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचं काल चेन्नई इथं वार्धक्यानं
निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. साठच्या
दशकात देशात अन्नधान्याची कमतरता असताना, स्वामिनाथन यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या गहू आणि भाताची
वाणं विकसित करून हरित क्रांती घडवून आणली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात
आलं होतं. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक
व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
महामार्ग निर्मितीत कचऱ्याचा
वापर करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू असून, देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन
उत्सर्जनाचं ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या `स्वच्छता हीच सेवा` या अभियानाअंतर्गत अनेक पर्यावरण पूरक उपक्रम सुरू केले
असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. येत्या डिसेंबर पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग खड्डे
मुक्त करणार असून,
पावसामुळे
रस्त्यावर होणाऱ्या खड्यांबाबत सरकार नवीन धोरण आखत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर
यांचा जन्मदिवस ईद - ए -मिलादउन्नबी काल साजरी झाली. यानिमित्त ठिकठिकाणी मिलाद मेहफिलींचं
आणि सीरत परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद
इथं प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोषाख आणि पवित्र केसाचं दर्शन घेण्यासाठी
हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या १९
व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत काल नेमबाजीत दहा मीटर एयर पिस्टल सांघिक प्रकारात सरबजोत
सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिव नरवाल
यांनी सुवर्ण पदक पटकावलं. वुशू या क्रीडा प्रकारात रोशिबिना नाओरिमा देवी हिनं रौप्य
पदक जिंकलं. घोडेस्वारीमध्ये अनुष अगरवाल यानं कांस्य पदकाची कमाई केली.
पुरुषांच्या फ्री स्टाईल रिले
प्रकारात जलतरणपटू तनिश जॉर्ज मॅथ्यू,
विशाल ग्रेवाल, आनंद ए एस आणि श्रीहरी नटराज यांनी
३ मिनिटं २१ सेकंद अशी वेळ साधत राष्ट्रीय विक्रम नोंदवला. टेनिसच्या पुरुष दुहेरीत
रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत
सहा सुवर्ण, आठ रौप्य, आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकं
जिंकली आहेत.
****
दहावी आणि बारावीसाठी खाजगीरित्या
परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळानं १७ क्रमांकाचा अर्ज
उपलब्ध करून दिला आहे. नियमित शुल्कासह उद्या ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
आहे. विलंब शुल्कासह येत्या तीन ते १५ ऑक्टोबर दरम्यान, तर अतिविलंब शुल्कासह, १६ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार
आहेत.
****
मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत
अहमदनगर जिल्ह्यात कचेश्वरनगर कोकमठान इथं अमृत कलश यात्रा आणि पोषण फेरी काढण्यात
आली. यावेळी उपस्थितांनी पोषण अभियान प्रतिज्ञा आणि पंच प्रण शपथ घेतली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत येत्या एक
तारखेला धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. सोलापूर
इथल्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी
सहभागी होण्याचं आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केलं आहे.
****
नांदेड विमानतळावरुन देण्यात
येणाऱ्या विमानसेवा पूर्ववत करण्यात याव्यात, अशी मागणी,
माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भातलं निवेदन त्यांनी सरकारला दिलं आहे. नांदेड इथून मुंबई, दिल्ली,
पुणे, हैदराबाद या शहरांना जोडणारी विमानसेवा
सुरू करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात
दुर्मिळ वृक्षांच्या बियांची बॅंक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांच्या हस्ते काल या बँकेचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये
अशाप्रकारे दुर्मिळ वृक्षांच्या बियांची बँक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. या बियाणे बँकेत स्थानिक प्रजातीच्या ७५ दुर्मिळ वृक्षांच्या बियांचं
संकलन करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात दूध भेसळ
रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीनं काल दोन डेअरीची पाहणी करुन
दुधाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत तक्रार
असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन दोन तीन सहा पाच यावर
तक्रार नोंदवण्याचं आवाहन,
अन्न आणि
औषध प्रशासन विभागानं केलं आहे.
****
नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण
विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण पूर्ण भरलं आहे.
त्यामुळे काल धरणातून १६ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आला आहे. गोदावरी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं
आवाहन, पूर नियंत्रण कक्षानं केलं
आहे.
****
नाशिक जिल्ह्यात नऊ दिवसांच्या
खंडानंतर काल विंचूर उपबाजारात समितीत कांदा लिलाव सुरू झाले. यावेळी कांद्याला सरासरी
दोन हजार ४०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
****
No comments:
Post a Comment