Monday, 25 September 2023

Text - Regional Marathi Bulletin, Aurangabad. Date: 25.09.2023, Time: 07.10 AM to 07.25 AM, Text, PDF & Audio

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 25 September 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ सप्टेंबर  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      जी-ट्वेंटी परिषदेमुळे पर्यटन वाढीला चालना मिळेल-मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त

·      गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम

·      नांदेड तसंच बीड जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीची नोंद

·      ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत विजयी आघाडी

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारताला पाच पदकं

 

सविस्तर बातम्या

जी - ट्वेंटी परिषदेमुळे देशात पर्यटन वाढीला चालना मिळेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या एकशे पाचाव्या भागात ते काल बोलत होते. भारतातल्या जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता ४२ झाली असून, जास्तीत जास्त स्थळं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा, जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा, हाच सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. परवा २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या अनुषंगानं बोलताना त्यांनी, भारतातली विविध वारसा स्थळं पाहण्याची तसंच संस्कृती जाणून घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं.

भारतानं जी ट्वेंटी परिषदेत भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडोअर प्रस्तावित केला आहे, हा मार्ग पुढची शेकडो वर्षं जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ ठरेल, आणि त्याची सुरुवात भारतीय भूमीवर झाल्याची नोंद इतिहासात कायम राहील असं ते म्हणाले. चांद्रयान मोहिमेच्या यशासोबतच शिक्षण, वाचन, स्वयंरोजगार आदी विषयांवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं. येत्या रविवारी एक ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावं, विविध ठिकाणांसह अमृत सरोवरांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, असं आवाहन त्यांनी केलं. ही स्वच्छता मोहीम गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले...

Byte...

एक अक्तुबर यांनी रविवार को सुबह १० बजे स्वच्छता पर एक बडा आयोजन होने जा रहा है. आप भी अपना वक्त निकाल कर स्वच्छता से जुडे इस अभियान में अपना हाथ बटाऐं. आप अपनी गली, आस-पडोस, पार्क, नदी, सरोवर, या फिर किसी दूसरे सार्वजनिक स्थल पर इस स्वच्छता अभियान से जुड सकते हैं.  स्वच्छता की यह कार्यांजली ही गांधीजी को सच्ची श्रद्धांजली होगी

दरम्यान, पंतप्रधानांनी काल नऊ वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा प्रारंभ केला. देशाच्या विविध रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेंची संख्या आता ३४ झाली आहे. वंदे भारत रेल्वेची लोकप्रियता सतत वाढत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

गांधी जयंतीचं औचित्य साधून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याअंतर्गत अनेक ठिकाणी स्वच्छता दौडसह निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. पालघर जिल्ह्यात बोर्डी समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नंदूरबारमध्ये तोरणमाळ इथं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर इथल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभागी होत, कर्मचाऱ्यांसोबत साफसफाई केली. सोलापूरातही सांगोला, बार्शी, मोहोळ, मंद्रुप, अक्कलकोटसह जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता दौड घेण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात सोनई इथं विविध शाळांचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.

****

चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी शास्त्रज्ञांची कामगिरी आणि पंतप्रधान मोदी यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मत, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, त्यात भारतीय रिपब्लीकन पक्षाला स्थान मिळावं, अशी मागणी आठवले यांनी केली. आगामी निवडणुका शिवसेना भाजप युतीसोबतच लढवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, बीड इथं काल आठवले यांच्या हस्ते दिव्यांगांसाठी विविध साहित्य वाटप करण्यात आलं. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

****

मुंबईत दहिसर इथं काल 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपस्थित महिला आणि नागरीकांनी अमृत कलशात धान्य अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. दोन्ही गटांच्या मिळून ५४ आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांमोर सुनावणी होणार आहे.

****

महात्मा फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्याच विचारांनी देश सुखी होईल, असं प्रतिपादन, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी‌. कोळसे पाटील यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. काल दिवसभरात झालेल्या विविध परिसंवादात राज्यातून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****


राज्यात अनेक ठिकाणी कालही जोरदार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात काल पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यातल्या येवती, जाहूर आणि अंबुलगा या तीन आणि देगलूर तालुक्यातल्या शहापूर आणि नरंगल बुद्रुक या मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९ मिलिमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ आणि परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. परवा आणि काल झालेल्या पावसामुळे आष्टी आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

आष्टी तालुक्यात परवा मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिनी इथं एका कुक्कूटपालन केंद्रातल्या तीन हजार कोंबड्या दगावल्या. कोंबड्यांसाठी आणलेलं खाद्यही वाहून गेलं. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित कुक्कूटपालकाने केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल सलग चौथ्या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं. महाळुंगी मंडळातल्या लोणवाडी, खडदगाव माळेगाव, तसंच बरफगाव मंडळातल्या अनेक गावांमध्ये नदी ओढ्यांना पूर आला. गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरे पडली तसंच २० ते २५ जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली. दरम्यान, प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या २६ तारखेला बीड आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं र्वतवला आहे.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी जिंकला आहे. काल इंदूर इथं झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत शुभमन गील आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या बळावर ३९९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, पावसाचा व्यत्यय आल्यानं, ऑस्ट्रेलियाला ३३ षटकांत ३१७ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. मात्र हा संघ २८ षटकं दोन चेंडूत २१७ धावांवर सर्वबाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन गडी बाद केले. या विजयामुळे भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

चीनमध्ये हानझोऊ इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसी यांच्या संघानं दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. तर १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रमितानं कांस्य पदक जिंकलं.

पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेच्या विविध प्रकारात भारतानं दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.

महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत निखत झरीन हीनं व्हिएतनामच्या गुयेन हिचा पाच - शून्य असा पराभव करत विजयी सुरुवात केली.

हॉकीमधे भारताच्या पुरुष संघानं उझबेकिस्तानचा १६ - शून्य असा दणदणीत पराभव केला आणि अ गटात अव्वल स्थान मिळवलं. भारताचा पुढचा सामना सिंगापूरसोबत  होणार आहे.

महिलांच्या टेबलटेनिस आणि फुटबॉलमध्ये मात्र भारताला थायलंडकडून पराभूत व्हावं लागलं. भारताच्या महिला क्रिकेट संघाचं या स्पर्धेत एक पदक निश्चित आहे. या संघाचा आज श्रीलंकेसोबत अंतिम सामना होणार आहे. 

****

राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील असून, यासाठी खेळाडू केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम, योजना राबवण्यात येत असल्याची माहिती, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. उदगीर इथं पोस्ते पोतद्दार लर्न कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन बनसोडे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा असून, युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदगीर इथं लवकरच दिवंगत खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, असं बनसोडे यांनी सांगितले.

****

No comments: