Tuesday, 26 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 26.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 26 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या युवा पिढीला सक्षम करण्यासाठी आणि देशाच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी रोजगार मेळावा महत्वपूर्ण ठरत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शासकीय सेवेत नव्यानं भर्ती झालेल्या सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना, आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महिलांनी नेहमीच अनेक क्षेत्रात बदल घडवून आणले आहेत, नवीन ऊर्जा दिली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, आज अनेक महिला भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रं मिळाल्याचं सांगितलं.

देशभरात ४६ ठिकाणी हे मेळावे झाले. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा झाला. सरकारी नोकरीत असताना काही मर्यादा असतात, तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं, असं आवाहन गडकरी यांनी केलं. नवनियुक्त उमदेवारांनी सकारात्मकता, योग्य दृष्टिकोन, भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचा संदेश त्यांनी दिला.

पनवेल इथं आयोजित रोजगार मेळाव्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मार्गदर्शन केलं. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी देशासमोरच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, तसंच भ्रष्टाचारमुक्त भारताचा भाग व्हावं, असं त्यांनी सांगितलं.

नांदेड इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला.

****


केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना जाहीर झाला आहे. चित्रपटातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक घेण्यात येणार आहे. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीसाठी शेतकरी, व्यापारी आणि बाजार प्रशासन सहभागी होणार आहे. केंद्रं आणि राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रांतल्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातल्या १७ बाजार समित्यांच्या माध्यमातून होणारी कांदा खरेदी गेल्या सात दिवसांपासून बंद आहे.

****

निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर मध्य, पश्चिम, पूर्व, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, पैठण, गंगापूर तसंच वैजापूर विधानसभा मतदारसंघात, नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बाबत आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत सादर करण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हानिवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी केलं आहे.

****

रिझर्व्ह बँक आणि शासनाच्या निर्देषानुसार थकीत कर्जदारांना शेवटची संधी म्हणून बीड जिल्हा बँकेने ओटीएस योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शेतकरी आणि अकृषी संस्थाकडच्या थकीत कर्ज वसुलीसाठी फायदा होईल. बँकेच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बँकेच्या ६८ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

****

जालना इथल्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात काल मेरी माटी मेरा देश उपक्रम राबवण्यात आला. तसंच पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयात विद्यार्थ्यांनी आणलेली मुठभर माती अमृत कलशात संकलित करण्यात आली.

वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरात आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. ठिकठिकाणी नागरीकांनी कलशामध्ये मातीचं संकलन केलं.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएने देशातल्या ४३ कुख्यात गुंडांची यादी जाहीर केली आहे. फरार असलेल्या या गँगस्टरच्या शोधासाठी भारत सरकारने बक्षीसही जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात हॉटेल्स, लॉज, यात्री निवास, डेरे, आश्रमशाळा इथं आश्रय देताना पूर्णतः ओळख पटवूनच आश्रय द्यावा, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या पावसात अंबाजोगाई आणि किल्ले धारूर या दोन तालुक्यातल्या दोन महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं. तर पुढच्या हंगामातील ज्वारी आणि इतर पिकांना हा परतीचा पाऊस लाभदायक असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बीड शहर आणि अंबाजोगाई तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...