Saturday, 30 September 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      सुशासनावर लक्ष केंद्रीत केलं, तर आव्हानात्मक उद्दिष्टंही साध्य होतात-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ

·      ईद-ए-मिलादच्या निमित्त आज ठिकठिकाशी शोभायात्रा;हजारो मुस्लिम बांधवांचा समावेश

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक

****

सुशासनाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं, तर आव्हानात्मक उद्दिष्टं देखील साध्य करता येतात, हे आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने दाखवून दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज 'संकल्प सप्ताह' या विशेष अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने ११२ जिल्ह्यांमधल्या २५ कोटी लोकांचं जीवन बदललं आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली, असं ते म्हणाले. देशातल्या ३२९ आकांक्षित जिल्ह्यांमधल्या ५०० गटांमध्ये जीवनमान सुधारणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याची संकल्प सप्ताहात निवड करण्यात आली आहे.

****

संपूर्ण देशभरात उद्या एक ऑक्टोबरला स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वॉर्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बुद्ध लेणी परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

****

दोन हजार रुपये मूल्याच्या चलनी नोटा बँक खात्यात जमा करणं किंवा बदलून घेण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिजर्व्ह बँकेनं गेल्या १९ मे रोजी जाहीर करत, आज ३० सप्टेंबरपर्यत नोटा जमा करण्याचं किंवा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. १९ मे रोजी चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या तीन लाख ५६ हजार कोटी रुपयांच्या नोटांपैकी तीन लाख ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या असून, १४ हजार कोटी रुपयांच्या नोटा अद्याप चलनात असल्याची माहिती, रिजर्व्ह बँकेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. आठ ऑक्टोबरपासून या शिल्लक नोटा जमा करण्याची सुविधा रिजर्व्ह बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.

****

मराठा समाजाला इतर मागास वर्ग - ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून चंद्रपूर इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्यासह दोन सहकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर उपोषण सोडलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या सकारात्मक निर्णयांची माहिती फडणवीस यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं जाणार नाही, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. दोन्ही अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दारुगोळा, शस्त्र आणि पाकिस्तानी चलन हस्तगत केलं.

****

गोंदिया जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बालाघाट जिल्ह्यातल्या कडला जंगलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी मारला गेला. कमलू असं या नक्षलवाद्याचं नाव असून, त्याच्या नावावर तब्बल १४ लाख रुपयांचं बक्षीस होतं.

****

किल्लारी भूकंपाला आज तीस वर्ष पूर्ण झाली. या भूकंपात आठ हजारावर नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या आपत्तीच्या वेळी राबवलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याबद्दल भूकंपग्रस्तांकडून कृतज्ञता सोहळा घेण्यात आला. शरद पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवरांनी, भूकंपात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही किल्लारी इथं स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. भूकंपस्थळी उभारलेल्या फुलपाखरू उद्यानाचं गोऱ्हे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सुमारे एक एकर क्षेत्रावर हे उद्यान तयार करण्यात आलं आहे.

****

या भूकंपात धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथले अनेक नागरिक दगावले होते. सास्तूर इथं उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला आज सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, लोहाराच्या नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

****

मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने आज ठिकठिकाशी शोभायात्रा काढण्यात आल्या.

बीड शहरात हजरत शर्हेशाहवली दर्गाह इथून निघालेला जुलूस चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बलभीम चौक, बशीरगंज मार्गे जुना बाजार इथल्या कादर पाशा मस्जिद परिसरात विसर्जित झाला.

छत्रपती संभाजीनगर इथंही भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

धुळे शहरातही मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणूक काढली. शहरातील पांझरा नदी किनारच्या अंजानशहा दर्गा इथं सामुहिक नमाज अदा केल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

****

परळी-बीड-अहमदनगर रेल्वे मार्गावर न्यू आष्टी ते इगनवाडी हा सुमारे ६७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्णत्वास येत असून, या वर्षाअखेर अहमदनगर ते ईगनवाडीपर्यंत रेल्वे धावणार आहे. रेल्वे विभागाकडूनही माहिती मिळाली. अहमदनगर-बीड-परळी हा एकूण २६१ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३ किलोमीटरचे काम लवकरच पूर्णत्वास जात आहे. इगनवाडी ते परळी या सुमारे १२८ किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.

****

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने दोन सुवर्णपदकं जिंकली. टेनिसच्या मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकलं. स्क्वॉश संघानेही पाकिस्तानचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं.

नेमबाजीत दहा मीटर एयर पिस्टल मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या सरबजोत सिंह आणि दिव्या टी एसनं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण ३६ पदकांची कमाई केली आहे.

****

मेरी माती मेरा देश या उपक्रमात आज गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्यातल्या भाजेपार गावात आज विशेष फेरी राबवून माती संकलित करण्यात आली. याबाबत गावचे सरपंच चंद्रकुमार बाहेकर यांनी अधिक माहिती दिली -

या रॅलीमध्ये प्रत्येक घरातून कलशमध्ये माती घेण्यात आली, जी माती दिल्ली येथील अमृत वाटीकेसाठी आम्ही पाठवणार आहोत. स्वच्छतेची शपथ गावातील शेकडो नागरिकांनी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली. आणि सर्वांनी गावाला स्वच्छ-सुंदर करण्याचा संकल्प आम्ही घेतला.

****

जालना इथं राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने कर्तव्यावर असतांना स्वतःजवळील रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. सचिन गोविंद भदरगे असं या आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. आत्महत्येचं नेमके कारण कळू शकलं नाही. दरम्यान, भदरगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

****

परभणी इथले मराठीचे निवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचं आज निधन झालं, ते ७६ वर्षाचे होते. संत साहित्य व्यासंगाचा विषय असलेले शेख शफी हे परभणी इथं सांस्कृतिक, संगीत, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. 'मराठवाड्याचा मळा आणि खानदेशचा गळा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे निवेदक आणि सूत्रधार असलेले शफी यांनी प्रसिद्ध बासरी वादक दत्ता चौगले यांच्या 'दुष्यंतकुमार की गझले' या कार्यक्रमाची निर्मितीही केली होती.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या राक्षसभुवन इथल्या पहिला वाळू डेपोत वाळूच्या नोंदणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. महाखनिजच्या संकेतस्थळावरून नोंदणी केल्यास सहाशे रुपयांना एक ब्रास वाळू मिळणार आहे. मध्यंतरी पावसामुळे राक्षसभुवन परिसरात निर्माण झालेल्या चिखलामुळे वाळू उपसा करता येत नव्हता.

****

No comments: