Saturday, 30 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 30.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 30 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

सुशासनाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं, तर आव्हानात्मक उद्दिष्टं देखील साध्य करता येतात, हे आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज 'संकल्प सप्ताह' या विशेष अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने ११२ जिल्ह्यांमधल्या २५ कोटी लोकांचं जीवन बदललं आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली, असं ते म्हणाले. देशातल्या ३२९ आकांक्षित जिल्ह्यांमधल्या ५०० गटांमध्ये जीवनमान सुधारणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याची संकल्प सप्ताहात निवड करण्यात आली आहे.

****

संपूर्ण देशभरात उद्या एक ऑक्टोबरला स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वॉर्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

****

आकाशवाणीची समृद्ध परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक डॉ. वसुधा गुप्ता यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज आकाशवाणीच्या पश्चिम विभागातल्या विविध विभागांच्या प्रमुखांच्या परिषदेत त्या बोलत होत्या. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षमतेनं करून, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून आकाशवाणीच्या लोकप्रियतेत वाढ करणं, समाज माध्यमांचा वापर वाढवणं, नवीन संकल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातले प्रमुख उपस्थित होते.

****

मराठा समाजाला इतर मागास वर्ग -  ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून चंद्रपूर इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते रवींद्र टोंगे यांच्यासह दोन सहकार्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर उपोषण सोडलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या सकारात्मक निर्णयांची माहिती फडणवीस यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं जाणार नाही, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

****

किल्लारी भूकंपाला आज तीस वर्ष पूर्ण झाली. या भूकंपात आठ हजारावर नागरिक मृत्यूमुखी पडले होते. तत्कालिन मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज किल्लारी दौर्यावर असून, भूकंपग्रस्तांकडून त्यांच्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी, भूकंपात मृत्यू झालेल्या नागरीकांना अभिवादन केलं.

****

भारतीय सैन्य दलाने २९ सप्टेंबर २०१९ रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्यानिमित्त काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी शौर्यपदक धारकांचा सत्कार करुन, मान्यवरांना मानवंदना आणि सलामी देण्यात आली. परभणी इथंही शौर्य दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी तसंच कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, वडवणी तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त आवाजात गाणे वाजवल्यानं कारवाई करण्यात आली. आठ डीजे चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड शहरानजिक घोसापुरी परिसरात तहसिलदार सुहास हजारे आणि त्यांच्या पथकानं काल ८५ ब्रास वाळू साठा जप्त केला. जवळपास १५ हायवा त्याठिकाणी रिकाम्या करून वाळू साठा करण्यात आल्याचं या कारवाईतून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

****

नांदेड इथं आज 'निर्भय बनो' या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी साडे पाच वाजता होणार्या या कार्यक्रमात, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि विधीज्ञ असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सालापूर इथं काल झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं हा ओढा पार करताना भीमराव धुळे यांची बैलगाडी आणि त्याच्या पाठीमागे दोन म्हशी वाहून गेल्या. या घटनेत भीमराव यांचा मृत्यू झाला, तर दोन बैल आणि पाठीमागे बांधलेल्या दोन म्हशी देखील दगावल्या.

****

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज नेमबाजीत दहा मीटर एयर पिस्टल मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या सरबजोत सिंह आणि दिव्या टी एसनं रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत आठ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण ३४ पदकांची कमाई केली आहे.

****

No comments: