आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा
स्पर्धेत आज नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऐश्वर्य सिंग, स्वप्निल कुसळे आणि अखिल शेवरॉन यांचा समावेश असलेल्या
भारतीय संघानं सुवर्ण पदक जिंकलं. महिलांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताच्या
पलकनं सुवर्ण पदक पटकावलं, तर इशा सिंगनं रौप्य पदक जिंकलं.
तर महिलांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात दिव्या सिंग, इशा आणि पलक यांच्या चमुने रौप्य पदक जिंकलं. टेनिसमध्ये
पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या जोडीनं रौप्य पदक पटकावलं.
****
जागतिक ह्रदय दिवस आज पाळला जात आहे.
ह्रदयविकारांपासून बचाव आणि त्याचे परिणाम याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा
दिवस पाळला जातो. युज हार्ट, नो हार्ट ही यंदाची ह्रदय दिनाची
सकंल्पना आहे.
****
राज्यात गणपती विसर्जन काल पार पडलं, तरीही मुंबई आणि पुण्यात मोठ्या गणपतींचं आज सकाळी विसर्जन
झालं. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं आज तब्बल २२ तासानंतर विसर्जन झालं. यावेळी
गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते काल शेतकरी संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. ठाणे शेतकरी सेनेच्या वतीनं आयोजित
ही यात्रा ३४ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याद्वारे सरकार राबवत असलेल्या योजनांबद्दल
शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांसाठी
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ - २४ अंतर्गत
हंगामातली प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केली आहे.
या अधिसूचनेनुसार सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची आगाउ
रक्कम अदा करण्याचे निर्देश त्यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
****
धाराशिव पंचायत समितीमधला वरीष्ठ
सहायक लेखाधिकारी मिलिंद काबळे आणि सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हनुमंत
पवार यांना चार हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या आईची सेवानिवृत्ती
नंतरची अंशराशीकरण आणि उपदानाची रक्कम खात्यावर जमा करून देण्यासाठी त्यांची ही लाच
मागितली होती.
****
No comments:
Post a Comment