Saturday, 30 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.09.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 30 September 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० सप्टेंबर  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या    

·      नारी शक्ती वंदन अधिनियमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी-विधेयकाचं कायद्यात रुपांतर

·      पंतप्रधानांच्या हस्ते आज 'संकल्प सप्ताहाचा शुभारंभ;उद्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन

·      मराठवाड्यात काल वीज पडून सहा जणांचा मृत्यू

·      किल्लारी भूकंपाला आज तीस वर्ष पूर्ण

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला काल तीन सुवर्णपदकं;पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप

 

सविस्तर बातम्या

नारी शक्ती वंदन अधिनियमावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वाक्षरी केली. त्यामुळे संसदेनं संमत केलेल्या या विधेयकाचं, आता नारी शक्ती वंदन कायद्यात रुपांतर झालं आहे. संसदेच्या नव्या वास्तुत नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात लोकसभेनं बहुमतानं, तर राज्यसभेनं एकमतानं हे विधेयक मंजूर केलं होतं. या कायद्यामुळे लोकसभा तसंच राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजना २०२१-२२ चे पुरस्कार राष्ट्रपतींनी काल प्रदान केले. यामध्ये महाराष्ट्रातले डॉ पवन नाईक, जान्हवी पेड्डीवार, वेदांत डीके यांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 'संकल्प सप्ताह' या विशेष अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी गट स्तरावरील कारभार सुधारणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याची संकल्प सप्ताहात निवड करण्यात आली आहे. आज भारत मंडपम, इथं होत असलेल्या या सप्ताहाच्या उद्‌घाटन सोहळ्यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि सरपंच आदी मान्यवर सहभागी होत आहेत.

****

दरम्यान, उद्या एक ऑक्टोबरला संपूर्ण देशभरात राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सामाजिक माध्यमावर काल जारी केलेल्या संदेशात त्यांनी, स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असल्याचं नमूद केलं.

स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या उद्या राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वॉर्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. काही ठिकाणी स्वच्छतेचं महत्त्व सांगणारी विशेष शिबिरं, प्रदर्शनं आयोजित केली जाणार आहेत.

****

राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआयच्या वतीनं उद्या एक ऑक्टोबरला स्थानिक परिसर तर दोन ऑक्टोबरला राज्यातल्या गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

****

'एक तारीख-एक तास-माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी' हा उपक्रम जालना जिल्ह्यात प्रत्येक गावात राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केलं आहे.

****

कांदा उत्पादन, खरेदी तसंच विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं आश्वासन, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. कांदा व्यापारांच्या समस्यांसंदर्भात काल नवी दिल्ली इथं राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी गोयल यांची भेट घेतली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सत्तार यांनी ही माहिती दिली. सरकारतर्फे आणखी ४०० कोटी रूपयांची कांदा खरेदी करण्यात येणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

****

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल इतर मागास वर्ग तसंच भटके-विमुक्त समाजातल्या विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या या बैठकीत विरोधकांना सहभागी करून न घेतल्याबद्दल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात परिस्थिती विपरीत असते तेव्हाच सरकारला विरोधकांची आठवण येते, अशी टीका दानवे यांनी यावेळी केली.

****

अहमदनगर- बीड -परळी या नवीन रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर सुरु असून, भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती, मध्य रेल्वे विभागानं दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून, त्यापैकी जवळपास ६६ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं आहे. यासाठी तीन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये खर्च झाला असल्याचंही विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

 

छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर महानगरपालिकेनं नागरिकांना गणेश मूर्ती दान करण्याचं आवाहन केलं होतं, त्याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सुमारे अडीच हजार गणेश मूर्ती महापालिकेच्या केंद्रांवर दान केल्या. या मूर्ती शहरातील १० मूर्तिकारांना पुनःवापराकरता देण्यात आल्या.

लातूर इथंही अनेक नागरिकांनी गणेशमूर्तींचं विसर्जन न करता या मूर्ती महापालिकेने उभारलेल्या संकलन केंद्रात दिल्या. प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांनी केलेल्या या सहकार्याबद्दल महापालिकेच्या वतीनं नागरिकांचे आभार मानण्यात आले.

****

 'ईद-ए-मिलाद-उन-नबी अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाच्या निमित्यानं काल राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं आज मिरवणूक काढण्यात येणार आहे

****

मराठवाड्यात काल वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला, यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात नागसवाडी इथले साईनाथ घुगे, हिमायतनगर तालुक्यात एकंबा इथल्या शांताबाई खंदारे, बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सोनिमोहा इथल्या संगीता करड, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं सविता आणि निकीता कतारे या माय-लेकी, तर भेंडेवाडी इथं एका १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. विभागात वीज पडून अनेक जनावरंही दगावली. नांदेड जिल्ह्यात तीन म्हशी, दोन गायी आणि तीन बैल, तर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या मोढा बुद्रुक इथं दोन बैल, आणि कन्नड तालुक्यातल्या पळशी इथंही एक बैल वीज पडून दगावल्याचं वृत्त आहे.

****

किल्लारी भूकंपाला आज तीस वर्ष झाली. ३० सप्टेंबर १९९३ रोजी अनंत चतुर्दशीनंतरच्या पहाटे हा भूकंप झाला होता. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात किल्लारी या गावी केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातली ५२ गावं उध्वस्त झाली होती, तर आठ हजारावर नागरिक मृत्यूमुखी पडले होते. या भूकंपाच्या वार्तांकनासाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे तत्कालिन प्रमुख पुरुषोत्तम कोर्डे यांना सर्वोत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार मिळाला होता.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्णांसह एकूण आठ पदकं मिळवत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.

नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन तसंच रायफल ३ पी प्रकारात भारतीय पुरुष संघानं दोन सुवर्णपदकं पटकावली. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल वैयक्तिक प्रकारात पलक गुलियानं सुवर्ण तर इशा सिंगनं रौप्य पदक पटकावलं. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात महिला संघाने रौप्य पदक मिळवलं.

टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत राम कुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी यांनी रौप्य पदक जिंकलं, तर रुतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॅश प्रकारात महिला संघानं कांस्य पदक जिंकलं. तर महिलांच्या गोळाफेक प्रकारात किरण बलियान हिला कांस्य पदक मिळालं.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत आठ सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य, अशी एकूण ३३ पदकं जिंकली आहे. 

****

आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यांना कालपासून सुरुवात झाली. स्पर्धेत सहभागी दहा संघांचे प्रत्येकी दोन सामने होणार असून, भारताचा आज गुवाहाटी इथं इंग्लंडसोबत आणि मंगळवारी तीन ऑक्टोबरला तिरुवअनंतपुरम् इथं नेदरलँडसोबत सराव सामना होईल. दरम्यान, भारतीय संघातला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची निवड करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा वाढला आहे. धरणात सध्या ४३ पूर्णांक ५७ टक्के जलसाठा झाला आहे.

नांदेड शहरालगत असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यानं प्रकल्पाच्या एक दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धाराशिव शहरातही काल रात्री मुसळधार पाऊस झाला.

*****

No comments: