Monday, 25 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 25.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 25 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, आज उत्तर प्रदेशातल्या हिंडन इथल्या भारतीय वायूदलाच्या तळावर, भारत ड्रोन शक्ती - २०२३ या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. भारतीय वायू दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सर्वेक्षण, पाळत ठेवण्यासाठी तसंच कृषी, अग्नीशमन आदी क्षेत्रांमधील ड्रोनच्या वापराची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या दोन दिवसीय भारत ड्रोन शक्ती कार्यक्रमात ५० हून अधिक प्रात्यक्षिकांच्या आधारे भारतीय ड्रोन उद्योगातल्या प्रगतीचं दर्शन घडवण्यात येणार आहे.

****

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज दुसरी सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रतेप्रकरणी ११ मे ला सुनावणी झाली. या सुनावणीत उर्वरित आमदारांच्या अपात्रतेप्रकरणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. मात्र, तीन महिने उलटल्यानंतर निर्णय न झाल्यानं उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

****

बनावट कागदपत्रांचा वापर करून बांग्लादेशातल्या नागरिकांना रेशन कार्ड बनवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यातून तिघांना अटक केली आहे. भिवंडी भागात ही कारवाई करण्यात आली. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतल्या नौशाद रेशन दुकानात हे आरोपी बांग्लादेशातल्या नागरिकांसाठी भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट रेशन कार्ड देत होते. या प्रकरणात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभं असून, या समाजातल्या तरूणांना पुढे नेण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. काल नागपूर इथं चर्मकार समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्यात ते बोलत होते. चर्मकार महामंडळाच्या कर्ज वितरणात सुलभता आणण्यासाठी मुंबई इथं लवकरच बैठक घेवून जामीन देण्याबाबतच्या आणि इतर अटी-शर्थी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या ममदापूर इथं बेकायदा १२ तलवारी बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थहा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव, येत्या १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयात होणार आहे. या महोत्सवात सहभागासाठी प्रवेशिका सादर करण्याची मुदत आज संपणार होती, ती आता दोन दिवस वाढवण्यात आली आहे. इच्छुकांना २७ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या काही रेल्वेगाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड ते इरोड एक्स्प्रेस २९ सप्टेंबर आणि दहा ऑक्टोंबर दरम्यान, तर इरोड ते नांदेड एक्स्प्रेस एक आणि आठ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस आज, तसंच येत्या दोन आणि नऊ ऑक्टोबर रोजी, तर तिरुपती ते पूर्णा एक्स्प्रेस उद्या २६ सप्टेंबर, तसंच तीन आणि दहा ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

****

चीनमधल्या हांगचौ इथं सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकं जिंकली आहेत.

नेमबाजीत दहा मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटील, दिव्यांग पवार आणि ऐश्वर्य तोमर यांचा समावेश असलेल्या भारतीय संघानं सुवर्ण पदक पटकावलं. तर दहा मीटर एअर रायफल वैतक्तिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग यानं कांस्य पदक जिंकलं.

२५ मीटर रॅपिड फायर पिस्टल सांघिक प्रकारात आशिष भानवाला, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय संघानं कांस्य पदक पटकावलं.

रोइंग स्पर्धेतही आज भारतीय संघानं कांस्य पदक जिंकलं.

****

बीड जिल्ह्यात आष्टी, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातल्या आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. धानोरा मंडळात काल १३२ मिलीमीटर पाऊस झाल्यानं, मोठ्या प्रमाणात रस्त्याचं, शेतीचं नुकसान झालं.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसाची रिमझिम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ९८ टक्के भरलं असून, धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...