Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 29 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ सप्टेंबर
२०२३ दुपारी १.०० वा.
****
येत्या एक ऑक्टोबरला
संपूर्ण देशभरात राबवण्यात येणार्या स्वच्छता ही सेवा अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सामाजिक माध्यमावर आज जारी केलेल्या
संदेशात त्यांनी, स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी
आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा असल्याचं नमूद केलं.
उत्तर प्रदेशनं
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसर्या टप्प्यात शंभर टक्के गावांनी ओडीएफ प्लस दर्जा
प्राप्त करून आणखी एक मोठा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्याचं अभिनंदन केलं.
महात्मा गांधीजींच्या जयंतीपूर्वी, उत्तर प्रदेशची ही अभूतपूर्व कामगिरी
संपूर्ण देशाला प्रेरणा देईल, असं ते म्हणाले.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी
उद्या नवी दिल्लीत भारत मंडपम इथं संकल्प सप्ताह या विशेष अभियानाचा शुभारंभ करणार
आहेत. नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी गट स्तरावरील कारभार सुधारणं, हा या कार्यक्रमाचा
उद्देश आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
सेनगाव तालुक्यात सेनगाव नगर पंचायतीच्या वतीनं आज मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रा
काढण्यात आली. कलशा मध्ये माती टाकून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्याधिकारी
सचिन जोशी,
माजी उपनगराध्यक्ष कैलासराव देशमुख, कर्मचारी अंकुश
जाधव यांच्या सह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.
****
नांदेड जिल्ह्यात
आयुष्यमान भव मोहिम राबवली जात आहे. याअंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमधून आरोग्य
मेळावे आणि आरोग्य सभांचं आयोजन करण्यात येत आहे. नागरीकांनी या मेळाव्याचं लाभ घेण्याचं
आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रामार्फत आज आणि उद्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं
आयोजन करण्यात आलं आहे. उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही
डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन, विभागानं केलं
आहे.
****
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि
लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकलपनेतून साकारलेल्या वेध परिषदेचं छत्रपती संभाजीनगर
इथं येत्या एक ऑक्टोबरला आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत ऑलिम्पिकपटू नेमबाज तेजस्विनी
सावंत, रीअल रँचो जहांगीर
शेख, जगद्विख्यात अजिंठा
छायाचित्रकार प्रसाद पवार आणि साहसवीर चिंतन वैष्णव यांचा प्रवास ऐकण्याची संधी मिळणार
आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या या आगळ्यावेगळ्या
व्यवसाय प्रबोधन परिषदेचं आयोजन ओंकार विद्यालय, रोटरी क्लब एलीट
आणि गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात येत्या रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ही
परिषद होणार आहे.
****
चीनमध्ये सुरु
असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि
एका कांस्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऐश्वर्य
सिंग, स्वप्निल कुसळे
आणि अखिल शेवरॉन यांचा समावेश असलेल्या भारतीय संघानं सुवर्ण पदक जिंकलं. महिलांच्या
दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताच्या पलकनं सुवर्ण पदक पटकावलं, तर इशा सिंगनं
रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात दिव्या सिंग, इशा आणि पलक यांच्या
चमुने रौप्य पदक जिंकलं.
टेनिसमध्ये पुरुष
दुहेरीत रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या जोडीनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात
त्यांना चीनी तैपेईच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
स्क्वॅश मध्ये
अनाहत सिंग,
ज्योत्सना चिनप्पा, तन्वी आणि दीपिका पल्लिकल यांचा
समावेश असलेल्या भारतीय संघानं कांस्य पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारतानं
आतापर्यंत आठ सुवर्ण, ११ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण
३१ पदकं जिंकली आहेत.
****
आंतरराष्ट्रीय
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. सामन्यांत
सहभाग घेणाऱ्या दहा संघांचे प्रत्येकी दोन सामने होणार असून, भारताचा उद्या
आणि तीन ऑक्टोबरला सराव सामना होईल.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेपूर्वी
भारतीय संघामध्ये मोठा बदल झाला आहे. भारतीय संघातला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल
जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची
निवड करण्यात आली आहे.
****
जागतिक ह्रदय
दिवस आज पाळला जात आहे. हृदयाशी संबंधित आजार, त्यावरील उपाययोजना
आणि जागतिक पातळीवरील परिणाम याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ‘हृदयाचा उपयोग
करा, हृदय जाणून घ्या’, अशी यंदाच्या
हृदय दिनाची संकल्पना आहे.
****
No comments:
Post a Comment