Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करावं -
कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन.
· माथाडी कायद्याशी छेडछाड किंवा कायदा रद्द होवू देणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची ग्वाही.
· औरंगाबाद जिल्हा तसंच विभागाच्या छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात याचिका दाखल.
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची आज दोन सुवर्ण पदकांची कमाई.
****
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र सेवेसाठी
कार्य करण्यास प्रेरित करावं, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस
यांनी केलं आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत
समारंभात ते आज दूरदुष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. देशात नव्या शैक्षणिक धोरणांची
अंमलबजावणी सुरु झाली असून,
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचंही
बैस यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागातील शास्त्रज्ञ बी. सरवणन हे
या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरवणन तसंच विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते यावेळी ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान
केलं तर १०२ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
****
माथाडी कायद्याशी छेडछाड करणार नाही तसंच
माथाडी कायदा रद्द होवू देणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत
कृषी उत्पन्न बाजार समितीमधे आज झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १८
माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माथाडी कामगारांसाठी
एक पाक्षिक आणि संकेतस्थळाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
वंचित बहूजन आघाडीने काँग्रेस पक्षाला आपल्यासोबत
आघाडी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत काँग्रेसकडून उत्तर न मिळाल्यास
राज्यात लोकसभेच्या ४८ जागांवर उमेदवार उभे करु असा इशारा, वंचित
बहूजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात
आज ट्विट संदेश करत,
प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणं
हे काँग्रेसचं कर्तव्य असल्याचं या संदेशात म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने बीड जिल्ह्यातल्या
परळीतील वैद्यनाथ सहकारी कारखान्याची काल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
वस्तू आणि सेवा कर विभागाने सहा महिन्यांपूर्वी छापे टाकून काही कागदपत्रे तपासली होती, यामध्ये
१९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचं स्पष्ट केलं होतं. वस्तू आणि सेवा कर विभागाने
कारखान्याला जीएसटी भरण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या, मात्र
या नोटीसींना प्रत्युत्तर न दिल्याने ही कारवाई केल्याचं वृत्त आहे.
****
औरंगाबाद जिल्हा तसंच विभागाच्या छत्रपती
संभाजीनगर नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, येत्या
२९ तारखेला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मोहम्मद हिशाम उस्मानी असं या याचिकाकर्त्यांचं
नाव आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या बैठकीच्या
पूर्वसंध्येला राज्य सरकारने या नामांतराची अधिसूचना जारी केली होती, या
विरोधात नव्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर नामांतराविरोधात उच्च
न्यायालयात येत्या चार ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये
भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या अतिंम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण
पदक पटकावलं आहे. भारतीय संघाने ७ खेळाडुंच्या मोबदल्यात
निर्धारीत २० षटकात ११६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करतांना श्रीलंकेच्या
संघाने ८ खेळाडुंच्या मोबदल्यात केवळ ९७ धावा केल्या. यासोबतच
भारतानं २ सुवर्ण,
३ रौप्य आणि ६ कांस्य अशा ११ पदकांची कमाई केली आहे. रुद्रांश
पाटील, दिव्यांग पन्वर आणि ऐश्वर्य तोमर यांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये आज
सुवर्णपदक पटकावलं. ऐश्वर्य प्रताप सिंग यांनं १० मीटर एअर रायफलमध्ये आणि पुरुषांच्या
संघानं नौकानयनमध्ये कांस्य पदक जिंकलं. भारताच्या रॅपिड फायर पिस्तोल संघानं २५ मीटर
गटात कांस्यपदक पटकावलं. यात आशिष भानवाला, विजयवीर सिधु आणि आदर्श सिंग
यांचा समावेश आहे. टेनिसमध्ये रोहन बोपन्ना आणि युकी भांब्रीच्या जोडीला उझबेकिस्तानच्या
खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला.
****
तक्रारदाराच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी
कागदपत्रातील त्रुटींची कमतरता भरुन काढण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच घेतांना जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कंत्राटी संशोधक सहाय्यक राहुल शंकर बनसोडे याला आज जालना
इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. पोलिस
उपअधिक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अजिंठा सिल्लोड
मार्गावर पाच लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन
इथले दोन इसम या गुटख्याची वाहतुक करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. चारचाकी
गाडी आणि गुटखा असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
बीड जिल्ह्यात नेकनूर इथं आज पोलिसांनी ५
लाख ६० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं
आहे.
****
बीड जिल्ह्यात आज विविध संघटनांनी आपल्या
मागण्यांसाठी आंदोलन केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या
वतीने रामगड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी फेरी नेण्यात आली. एका शिष्टमंडळाने
जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.
धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी
धनगर समाजाच्या वतीने आज गेवराई इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी धनगर समाजातील
अनेक बांधवानी पारंपरिक घोंगडी, हातात कुऱ्हाड, पिवळा
रुमाल अशी वेशभूषा परिधान करत आंदोलनाकडे लक्ष वेधलं.
पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल मंजूर झालेल्या
घरकुलाचा चौथा हप्ता थकीत असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं
आज बीड नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. हा हप्ता थकित असल्यानं, अनेकांच्या
घराची कामं पूर्ण झाली नसल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं.
परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या विरोधात
परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव इथल्या गावकऱ्यांनी गाव राखमुक्त करण्याच्या मागणीसाठी
आज रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये दादाहरी वडगाव गावातले महिला, पुरुष तसंच शाळकरी मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. औष्णिक केंद्रामधून
निघणाऱ्या राखेच्या प्रदूषणामुळे लहान मुलांसह वृद्धा लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचं
या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
****
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त हिंगोली इथं
आज जे. के. कॉलेज ऑफ फार्मसी आणि जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशियनच्या वतीने शहरातील
इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. अवयव दान
सर्वश्रेष्ठ दान,
अंधविश्वास सोडा-अवयव दान जीवाशी जोडा आदी
घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं.
****
माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा राज्यात
लोकाभिमुख झाला आहे. त्याअनुषंगाने २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 'माहिती
अधिकार दिवस'
म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने राज्य माहिती आयुक्तालयात
येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येत आहे.
****
येत्या २९ सष्टेंबरला होणाऱ्या जागतिक हृदय
दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर इथं हृदय जाणून घ्या आणि हृदय वापरा या एक
दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ केदार रोपळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. हृदय विकार आणि उपचारासंबंधित संपूर्ण माहिती तज्ञांद्वारे मराठी भाषेतून, द्रुकश्राव्य
माध्यमातून दिली जाणार आहे. आय एम ए सभागृहात ही परिषद होणार आहे.
****
No comments:
Post a Comment