Wednesday, 27 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 27.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 27 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौर्यावर असून, अहमदाबाद इथं व्हायब्रंट गुजरातच्या जागतिक शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. २० वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या व्हायब्रंट गुजरातचं आजचं यश हे संपूर्ण देशानं आदर्श घेण्यासारखं असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. भूकंपापूर्वीचा आणि आताचा गुजरात यामध्ये जाणवण्योवढा फरक केवळ व्हायब्रंट गुजरातमुळे आहे, जगासमोर ताकदीनं उभं राहण्याची हिंमतही यामुळे मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रोबॉर्ट पार्क मध्ये आयोजित प्रदर्शनाची त्यांनी यावेळी पाहाणी केली.

****

खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज पाच राज्यांमध्ये ५० ठिकाणी छापेमारी केली. आज सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एनआयएनं हे छापे मारले असून, तपास सुरु आहे. दुसर्या देशातले खलिस्तानी णि गँगस्टर्स हवालाच्या माध्यमातून भारतात अंमली पदार्थ आणि हत्यारांसाठी निधी पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

श्रीमती नाथिबाई दामोदरदास ठाकरसी - एस एन डी टी महिला विद्यापीठाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी नवीन महाविद्यालयं तसंच परिसंस्थांना मंजूरी दिली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात, जालना जिल्ह्यात १२, बीड जिल्ह्यात पाच, परभणी सात, हिंगोली पाच, नांदेड आठ, तर धाराशिव इथल्या चार संस्थांचा समावेश आहे.

****


नाशिक जिल्ह्यात आजही कांदा लिलाव बंद आहेत. निर्यात शुल्कात करण्यात आलेली ४० टक्के वाढ कमी करावी, तसंच नाफेड आणि एन सी सी एफ च्या मार्फत खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये, यासह विविध मागण्यांसाठी, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने गेल्या मंगळवार पासून लिलाव बंद आंदोलन सुरू केलं आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या बैठकीत येत्या २९ तारखेला दिल्ली इथं पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं होतं, आणि व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, व्यापारी आंदोलनावर ठाम आहेत.

दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी, लिलाव सुरू करावेत अन्यथा पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असा इशारा दिला आहे. कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवलेला कांदा सडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, असं भुसे यांनी म्हटले आहे.

****

मेरी माटी मेरा देश अभियानातंर्गत लातूर जिल्ह्यातल्या वरवंटी इथं, काल शालेय विद्यार्थी, बचत गटाच्या महिला आणि ग्रामस्थांनी कलश यात्रा काढली. या कलश यात्रेदरम्यान, ग्रामस्थांनी आपल्या शेतातली माती कलशात जमा केली. त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत सागर यांच्या हस्ते, वृक्षारोपण करण्यात आलं. या अभियानातंर्गत गावात ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

****

बीड शहरातल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दहा आणि वीस रुपयांची नाणी चलनामध्ये आणावी, त्याचा स्वीकार करावा, असं आवाहन करणार्या स्टिकरचं प्रकाशन आज करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ बीड, रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष संजय गुप्ता, सचीव सुरेश बुद्धदेव आणि व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं निर्माण केलेली ही नाणी ही कायद्यानुसार वैध आहेत, तरीही बीड शहर आणि जिल्ह्यातले अनेक दुकानदार, विक्रेते आणि नागरीकांनी गैरसमज दूर करावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

सोलापूर-बीड-जालना या रेल्वे मार्गाला मान्यतेसह, अमहदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी बीड इथल्या  स्वातंत्र्य सैनिक रेल्वे समितीनं केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीनं काल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आलं.

****

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकंची पटकावली. नेमबाजीत महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या सामरा कौर हिनं सुवर्ण पदक जिंकलं. तर महिलांच्या २५ मीटर पिस्टल सांघिक प्रकारात मनु भाकेर इशा सिंग आणि रिदम सांगवान यांचा समावेश असलेल्या भारतीय संघानेही सुवर्ण पदकाची कमाई केली.

महिलांच्या ५० मीटर रायफल सांघिक प्रकारात सामरा कौर, आशी चौकसी आणि कौशिक मानिनी यांच्या संघानं रौप्य पदक जिंकलं, तर याच प्रकारात वैयक्तिक गटात आशी चौकसीनं कांस्य पदक जिंकलं.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांसह एकूण १८ पदकांची कमाई केली आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं याआधीच विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments: