Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय महामार्गांना येत्या डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्त करणार - केंद्रीय परिवहन
आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी
· लाडक्या गणरायाला निरोपासाठी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका
· नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावाला सुरुवात
आणि
· कृषी शास्त्रज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन
****
देशातल्या राष्ट्रीय महामार्गांना येत्या
डिसेंबर पर्यंत खड्डे मुक्त करणार असल्याचं केंद्रीय परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन
गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या संदर्भातली
माहिती दिली. पावसामुळं रस्त्यावर होणाऱ्या खड्यांबाबत सरकार नवीन निती आखत असल्याचं
त्यांनी सांगितलं. शहरात तयार होणारा कचरा महामार्ग निर्मितीत वापरण्यासाठी राष्ट्रीय
स्तरावर विचार विनिमय सुरू असून याबाबत संबंधितांबरोबर चर्चाही चालू असल्याचं गडकरी
म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या `स्वच्छता
हीच सेवा` या अभियानाअंतर्गत त्यांच्या मंत्रालयानं अनेक पर्यावरण पूरक उपक्रम सुरू केले
असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
आज अनंत चतुर्दशी. दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा
समारोप मोठ्या उत्साह आणि भक्तीभावात होत आहे. `गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
वर्षी लौकर या`
च्या गजरात ठिकठिकाणी मिरवणुकांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण
निरोप दिला जात आहे. स्थानिक प्रशासनानं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांनी विसर्जनासाठी
विविध सोयी सुविधा पुरवल्या आहेत. गणेशमुर्ती विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम तलावांची
निर्मिती करण्यात आली आहे.
****
हिंगोली इथं चिंतामणी गणपतीचा 'मोदकोत्सव' सुरू
आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
हिंगोली शहरातील 'विघ्नहर्ता
चिंतामणी'चा मोदकोत्सव दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा होतो. यंदा मध्यरात्रीपासूनच
भाविकांनी दर्शनासाठी रांगा मोठ्या लावल्या
होत्या. महाराष्ट्रसह परराज्यातून चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक हिंगोलीत दाखल झाले
आहेत. यावर्षी संस्थांनच्या वतीने दीड लाख नवसाचे मोदक तयार करण्यात आले आहेत.
त्यांचे भाविकांना वाटप करण्यात येत आहेत.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी
उत्साहात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. जालना शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक
उत्साहात सुरू आहे. महानगरपालिकेतर्फे मोतीतलाव इथं सार्वजनिक गणेश विसर्जनाची व्यवस्था
करण्यात आली आहे. नाशिक इथंही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात आज
दुपारी मुख्य पारंपारिक विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला. नाशिकचे पालकमंत्री
दादा भुसे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वाशिम शहरात खासदार भावना
गवळी यांनी गणेशाची आरती करुन विसर्जन मिरवणूकीची सुरुवात केली. नवी मुंबई महापालिका
हद्दीत २२ नैसर्गिक आणि १४१ अशा १६३ विसर्जन स्थळांवर आज गणेश मूर्तीचं विसर्जन केलं
जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या बामणी
बुद्रुक इथं श्री विसर्जनादरम्यान आज दुपारी तीन मुलांचा डोहात बुडून मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीत गोवर्धन घाट परिसरातही
एक तरुण बुडाला. जीवरक्षक दलाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
****
नाशिक जिल्ह्यात नऊ दिवसांच्या खंडानंतर
विंचूर उपबाजारात समितीत आज कांदा लिलावाला सुरुवात झाली. यावेळी कांद्याला क्विंटलला
सरासरी दोन हजार ४०१ रुपये भाव मिळाला. जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या विविध
मागण्यांसाठी संप पुकारल्यानं जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधले कांद्याचे लिलाव बंद
होते. मात्र,
व्यापारी आणि संचालक मंडळाच्य़ा बैठकीनंतर लासलगाव कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात आज सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले. यावेळी कमीत
कमी एक हजार,
कमाल दोन हजार ४०१ तर सरासरी दोन हजार १७५ रुपये भाव मिळाला.
अनंत चतुर्दशी असल्यानं दुपारच्या सत्रात लिलाव बंद होते. उद्यापासून नियमितपणे दोन्ही
सत्रातले लिलाव सुरु राहणार आहेत.
****
राष्ट्रीय तपास संस्था- एनआयएनं ठाणे बनावट
नोटांप्रकरणी एका दहशतवाद्यासह चौघांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. अंकल उर्फ
जावेद पटेल याच्यासह रियाझ शिकिलकर, मोहम्मद फयाज शिकीलकर आणि नासिक
चौधरी अशी या चौघांची नावं आहेत. हे सर्व मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती एनआयएनं
दिली आहे. यातल्या तीन आरोपींविरुद्ध गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ठाणे पोलिसांनी
आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी रियाझकडून दोन हजार रुपयांच्या १४९ बनावट नोटा जप्त
करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
****
देशाचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन
यांचं आज सकाळी चेन्नई इथं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. स्वामीनाथन यांना हरित
क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. १९८७ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रात सर्वोच्च समजल्या
जाणाऱ्या पहिल्या जागतिक अन्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी स्वामीनाथन यांच्या मृत्यूबद्दल दुख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातल्या
कार्यामुळं भारतीय लोकांचं जीवन बदललं असून त्यांच्या
योगदानामुळं देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वतंत्र झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रपति दौपद्री मुर्मु यांनी देशवासियांना
ईद-ए-मिलाद निमित्त शुभेच्छा
दिल्या आहेत. पैगंबरांनी जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश दिला आहे. त्यांची शिकवण आपल्याला
एकोपा आणि बंधुता यासह जीवन जगण्याची प्रेरणा देते, असं
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मानवतेच्या कल्याणासाठी एकजुटीनं काम करण्याचं
तसंच मोहम्मद पैगंबरांच्या आदर्शांचं स्मरण करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र
पोषाख आणि पवित्र केसाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांनी
रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
****
नांदेड इथला शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प
१०० टक्के क्षमतेनं भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात
घेता विष्णुपुरी प्रकल्पातून आजपासून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतल्या नागरिकांनी कोणतीही
हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन पूर नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आलं
आहे.
****
नांदेड विमानतळाची निगा आता राज्य औद्योगिक
विकास महामंडळाकडे सोपवल्यामुळे या विमानतळावरुन देण्यात
येणाऱ्या विमानसेवा पूर्ववत करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भातनं निवेदन त्यांनी दिलं आहे. वर्ष २००८ साली नांदेड
इथं गुरु-त्ता-गद्दीच्या काळात विमान रात्री उतरण्याच्या सोयीसह अन्य सुविधा निर्माण
करण्यात आल्या होत्या. मात्र एका खाजगी कंपनीकडे विमानतळ सुपूर्द करण्यात आल्यानंतर
या सर्व सुविधा बंद झाल्या होत्या. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची
नांदेड इथून मुंबई,
दिल्ली, पुणे, हैदराबाद या शहरांना
जोडणारी विमानसेवा आता पुन्हा सुरू करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनीही लतादीदींना सामाजिक संपर्क माध्यमातल्या संदेशाद्वारे आदरांजली वाहिली.
****
यवतमाळ इथं राज्य परिवहन महामंडळ- एसटी बँकेच्या
सत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. बँकेच्या अहवाल पुस्तिकेत नाथूराम
गोडसेचं छायाचित्र छापल्यावरून सभासदांनी गोंधळ घालत बहिष्कार टाकला. कामगार संघटनेचे
अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली.
****
धुळे जिल्ह्यात दुग्धव्यवसाय केंद्रात खव्याच्या
वजनाआधारे दुध खरेदी करावी अन्यथा एक ऑक्टोबरपासून दूध दिलं
जाणार नाही,
असा इशारा पशुपालकांनी दिला आहे. आज धुळे शहरातल्या दसेरा मैदानावर
ग्रामीण भागातल्या पशुपालकांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी हा इशारा देण्यात
आला. धुळे शहरातले दुग्धव्यवसाय चालक आणि मालकांकडून चरबीच्या आधारावर दुधाची खरेदी
होणार असल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी हा इशारा दिला आहे.
****
गौरी गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या
परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून आतापर्यंत जादा
आणि नियमित मिळून सुमारे २८० गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुढच्या तीन दिवसांसाठी अजून
११४ बसेस सोडण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment