Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 26 September
2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
शासकीय सेवेत नव्यानं भर्ती झालेल्या
सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आज नियुक्तीपत्रांचं वितरण
·
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातल्या
याचिकांवर सुनावणीनंतर निकाल राखीव
·
वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाची वैद्यनाथ
सहकारी साखर कारखान्यावर कारवाई
·
औरंगाबाद जिल्हा तसंच विभागाच्या छत्रपती
संभाजीनगर नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
आणि
·
आशियाई स्पर्धेत भारताची काल दोन सुवर्णपदकांची
कमाई
सविस्तर
बातम्या
शासकीय सेवेत नव्यानं भर्ती
झालेल्या सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. यावेळी ते नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. हा
रोजगार मेळावा देशभरात ४६ ठिकाणी होणार आहे. केंद्र सरकारच्या टपाल, अणुऊर्जा, महसूल, उच्च शिक्षण आणि संरक्षण मंत्रालय
तसंच विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये, नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.
दरम्यान, नांदेड इथं केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब
दानवे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होणार आहे.
****
केंद्र सरकारनं अत्यावश्यक
वस्तू कायद्यांतर्गत तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यावरची मर्यादा, २०० टनावरून ५० टनापर्यंत कमी केली
आहे. ही मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. आधी ही मुदत ३० ऑक्टोबरला संपणार
होती. डाळींची अवैध साठवणूक रोखणं,
तूर आणि
उडीद डाळींची पुरेशा प्रमाणात बाजारात विक्री करणं आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत
तूर आणि उडदाची डाळ उपलब्ध करून देणं,
यासाठी साठवणुकीच्या
मर्यादेत सुधारणा करून कालावधी वाढवण्यात आला आहे.
****
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातल्या
याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल झालेल्या सुनावणीनंतर निकाल राखून
ठेवला आहे. या सुनावणीला शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते आपापल्या वकीलांसह हजर होते.
दोन्ही वकिलांच्या संमतीने निर्णय राखून ठेवत असून, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ, असं अध्यक्षांनी सांगितल्याची माहिती, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी
दिली. या याचिकांवरची सुनावणी ऑनलाईन व्हावी, खुली व्हावी अशी विधानं केली जात असल्याबद्दल अध्यक्षांनी
नाराजी व्यक्त केल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्ष लवकरच वेळापत्रक जाहीर
करतील, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
****
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना
राष्ट्र सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करावं, असं आवाहन,
राज्यपाल
तथा कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल दूरदुष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
यावेळी ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं तर १०२ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट
पदवी प्रदान करण्यात आली.
****
माथाडी कायद्याशी छेडछाड करणार
नाही, तसंच माथाडी कायदा रद्द होवू
देणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत
कृषी उत्पन्न बाजार समितीमधे काल झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
१८ माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माथाडी कामगारांसाठी
एक पाक्षिक आणि संकेतस्थळाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं.
****
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस
पक्षाला आपल्यासोबत आघाडी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत काँग्रेसकडून
उत्तर न मिळाल्यास राज्यात लोकसभेच्या ४८ जागांवर उमेदवार उभे करु असा इशारा, वंचित बहूजन आघाडीचे नेते विधीज्ञ
प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबेडकर यांनी काल यासंदर्भात ट्विटरवर एक संदेश जारी
करत, प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि
समविचारी पक्षांना सहभागी करून घेणं हे काँग्रेसचं कर्तव्य असल्याचं म्हटलं आहे.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच परळी इथल्या औद्योगिक
वसाहतींचा विस्तार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं
आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मराठवाड्यासाठी विशेष उद्योग भवन उभारणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.
****
वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने
बीड जिल्ह्यातल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची काल १९ कोटी रुपयांची
मालमत्ता जप्त केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातल्या या
कारखान्यावर वस्तू आणि सेवा कर विभागाने सहा महिन्यांपूर्वी छापे टाकून केलेल्या तपासणीत
१९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचं निदर्शनास आलं होतं. कारखान्याला जीएसटी भरण्यासंदर्भात
बजावलेल्या नोटीसींना उत्तर न दिल्याने ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्हा तसंच विभागाच्या
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली
असून, येत्या २९ तारखेला या याचिकेवर
सुनावणी होणार आहे. मोहम्मद हिशाम उस्मानी असं या याचिकाकर्त्यांचं नाव आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या
छत्रपती संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने या
नामांतराची अधिसूचना जारी केली होती,
या विरोधात
नव्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर नामांतराविरोधात उच्च न्यायालयात
येत्या चार ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई
स्पर्धांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने काल अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत
सुवर्ण पदक पटकावलं. तर नेमबाजीत १० मीटर एअर रायफलमध्ये रुद्रांश पाटील, दिव्यांग पन्वर आणि ऐश्वर्य तोमर
यांनी सुवर्णपदक पटकावलं.
१० मीटर एअर रायफल वैयक्तिक
प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग यांनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या रॅपिड फायर पिस्तोल
संघानं २५ मीटर गटात कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या संघानं नौकानयनमध्येही कांस्य
पदकाची कमाई केली. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य, अशा ११ पदकांची कमाई केली आहे.
दरम्यान, या स्पर्धेत नेमबाजीमध्ये एअर रायफल्स
प्रकारात पहिलं सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघाचं
अभिनंदन केलं आहे. या संघातला रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू असून, नेमबाजीतल्या नैपुण्यासाठी मुख्यमंत्री
शिंदे यांनी त्याला पाठबळ दिलं आहे.
****
आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय
शिक्षण धोरण महत्त्वाचं असल्याचं,
शिक्षणतज्ज्ञ
डॉ.प्रशांत साठे यांनी म्हटलं आहे. धाराशिव इथं काल दैनिक तरुण भारतच्या गणेशोत्सव
व्याख्यानमालेत दुसरं पुष्प गुंफताना ते बोलत होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार
सतीश चव्हाण,
शिक्षक आमदार
विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. साठे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातल्या अनेक तरतुदींची
यावेळी माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात विकासकामांना
गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून प्रयत्नशील राहावं, असं खासदार प्रताप पाटील चिखलीकर
यांनी म्हटलं आहे. ते काल डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आढावा बैठकीत बोलत
होते. राष्ट्रीय महामार्गाची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात
आल्या.
****
जालना इथल्या जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीचा कंत्राटी संशोधक सहाय्यक राहुल बनसोडे याला ३५ हजार रुपयांची लाच घेतांना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या मुलाच्या जात वैधता
प्रमाणपत्रासाठी कागदपत्रातल्या त्रुटींची कमतरता भरुन काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली
होती.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या
एका वर्षाच्या बालकाची कर्नाटकात ५० हजार रुपयात विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस थाण्यात चार जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल
करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात गेल्या पाच
- सहा दिवसांपासून अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे, ज्या भागात किंवा मंडळात या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं
आहे, अशा शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत
संरक्षित पीक नुकसानीची माहिती ऑनलाईन किंवा जिल्हा, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावी, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त
हिंगोली इथं जे. के. कॉलेज ऑफ फार्मसी आणि जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशियनच्या
वतीने काल शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थांनी अवयव दानासंबंधी जागृतीपर
घोषणा देत, शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं.
****
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीच्या वतीने काल स्वच्छता दौड घेण्यात आली.
गट विकास अधिकारी रविराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौडसोबत शालेय
विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
****
बीड जिल्ह्यात विविध संघटनांनी
काल आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या
वतीने रामगड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी फेरी नेण्यात आली. पंतप्रधान आवास
योजनेच्या घरकुल मंजूर झालेल्या घरकुलाचा चौथा हप्ता थकीत असल्याच्या कारणावरून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं
बीड नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment