आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या हिंडन इथल्या भारतीय वायूदलाच्या तळावर भारत ड्रोन शक्ती - २०२३ या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. भारतीय वायू दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी C-295 या वाहतूकीसाठीच्या विमानाचा भारतीय वायूदलात औपचारिकपणे समावेश करण्यात येईल. या दोन दिवसीय भारत ड्रोन शक्ती कार्यक्रमात ५० हून अधिक प्रात्यक्षिकांच्या आधारे भारतीय ड्रोन उद्योगातल्या प्रगतीचं दर्शन घडवण्यात येणार आहे.
****
न्याय आणि दंड संहिता या दोन वेगळ्या गोष्टी असून, ब्रिटीशकाळातला फौजदारी कायदा गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी बनला होता तर आपला कायदा न्याय मिळावा यासाठी बनला असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आयोजित जागतिक वकील परिषदेच्या समारोप समारंभात काल ते बोलत होते. जागतिक हवामानबदल, दहशतवाद, अंमली पदार्थांचा प्रसार अशा अनेक आव्हानांशी सामना करताना भारताचं उदाहरण इतर देशांना मार्गदर्शक ठरत असल्याचं ते म्हणाले.
****
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत संमत झाल्याचं वनवासी कल्याण आश्रम संस्थेनं स्वागत केलं आहे. आदिवासी महिला लोकप्रतिनिधी समाजाचा आवाज उठवू शकतील, असं संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
महिला आरक्षण विधेयक संमत केल्याचं नांदेड इथं भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केलं होतं, याच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडीच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. यासंबंधित काही हरकती आणि सूचना असल्यास सात दिवसांच्या आत लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयानं केला आहे.
****
No comments:
Post a Comment