Friday, 26 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कांद्याच्या साठवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि सोलापूर इथं स्थापणार अणुउर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प

·      दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राज्याचा स्वतंत्र कठोर कायदा आणणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      राज्यातल्या बहुतांश भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत-प्रशासकीय यंत्रणेला समन्वयातून नियंत्रणाच्या सूचना

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीत धडक, आज उद्घाटन सोहळा

सविस्तर बातम्या

राज्यात छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि सोलापूर इथं तातडीने कांदा बॅंक सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे, काल या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या बँकांच्या उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळ, पणन विभाग, तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपलब्ध जागांचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

****

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधली भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कठोर कायदा करणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांसदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सध्याच्या महाराष्ट्र प्रोहिबीशन ऑफ डेंजरस ऍक्टीव्हीटी, एम पी डी ए पेक्षाही कठोर असा राज्याचा कायदा असणार आहे. तसंच, अन्न पदार्थातल्या भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसंच राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना आंतरवासिता -इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातली पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातल्या सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे.

****

राज्यात विविध भागांमध्ये काल मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकता नगरमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. पुणे जिल्ह्यात काल पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

मुंबई, पनवेल, पालघर, कल्याण-डोंबिवली, रायगड, रत्नागिरी, सातारा या ठिकाणी देखील काल जोरदार पाऊस झाला. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून, बहुतांश मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री आणि अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी पात्राजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना लाभदायक असून जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ४३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अनेक नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत असल्यानं, जिल्ह्यात मांजरा, माकणी, निम्न तेरणा आदी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने, अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के भरला आहे. बंधाऱ्याचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, त्यामुळे संबंधित गावांनी सतर्क राहण्याचा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

****

येत्या चोवीस तासात राज्यातल्या चारही विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

राज्यात ज्या -ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगानं सुरु असून, नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच, घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकरी पुन्हा संकटात सापडला असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

****

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दहावी तसंच बारावी पुरवणी परीक्षेत आज होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. आज दहावीची नियोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन, या विषयाची परीक्षा आता बुधवार ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. तर बारावीची वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान तसंच एम.सी.व्ही.सी पेपर दोन, या तीनही परीक्षा आता शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन या कालावधीत होणार आहे. याशिवाय वेळापत्रकात इतर कोणताही बदल नसल्याचं शिक्षण मंडळानं कळवलं आहे.

****

२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिन्कून ला या बोगदा प्रकल्पाचं पायाभरणी करणार आहेत. यानिमित्त आज सातारा इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. तिरंदाजीमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, आणि बी. धीरज, यांनी वैयक्तिक रँकिंग फेरीत भाग घेतला. स्पर्धेचे उर्वरित टप्पे २८ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार आज रात्री ११ वाजता सुरु होईल. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल यांना भारताच्या ध्वजवाहकाचा बहुमान मिळाला आहे. भारताच्या सहभागाविषयीचा हा वृत्तांत...

 

Byte…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णपदकासह सात पदकं पटकावणाऱ्या भारताचं ११७ खेळाडूंचं पथक पॅरिस ऑलिम्पिकसाठी दाखल झालं आहे. ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक २९, नेमबाजीत २१, बॅडमिंटनमध्ये ७ तर तिरंदाजीत आणि कुस्ती प्रकारात प्रत्येकी सहा क्रीडापटू सहभागी होत आहे. यापैकी स्टीपलचेसमध्ये बीडचा अविनाश साबळे, तिरंदाजीत प्रवीण जाधव, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, नेमबाजीत स्वप्नील कुसळे आणि उंच उडी प्रकारात सर्वेश कुशारे या महाराष्ट्रातल्या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे.  टोकियो ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनंतर अविनाश साबळेकडून पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

****

३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेला आजपासून बीड इथं प्रारंभ होत आहे. राज्यभरातून सुमारे साडे चारशे खेळाडू या स्पर्धेसाठी बीड इथं दाखल झाले आहेत. २७ जुलैपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. या स्पर्धेत काल सायंकाळी पुमसे या प्रकारातले सामने घेण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पार्थिव देहावर काल वसईत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिब्रिटो यांचं काल पहाटे वसई इथं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या.

****

परभणी पोलीस दलाच्या मोटार विभागाच्या वतीने 'शी-व्हॅन' तयार करण्यात आली आहे. या आधुनिक वाहनात पोलिस दलातल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी काल या व्हॅनचं उद्‌घाटन केल्यानंतर याबाबत अधिक माहिती दिली...

 

Byte..

ही व्हॅन ही आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार भगिनींसाठी तयार करण्यात आलेली आहे. आमच्या महिलांना जेव्हा बाहेर बंदोबस्तासाठी जातात तेव्हा त्यांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते. अतिशय त्यांचे हाल होतात आणि ते पाहून या समस्येवर उपाय म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यावर विचारमंथन करून आणि संशोधन करून ही व्हॅन बनवली आहे. ही प्रत्येक बंदोबस्ताला आमच्या महिला अंमलदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी पुरवली जाईल. यात सर्व सुविधा आहेत. आणि ही जिल्ह्यात सगळीकडे जाऊ शकते अशा प्रकारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आंबा-उत्तम कृषी पध्दत, या विषयावर काल एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापाठाचे कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्गाटन झालं. शंभर हून अधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

****

लातूर जिल्हा गृहरक्षक दल-होमगार्डमधील रिक्त १४३ जागा भरण्यासाठी २६ जुलै ते १६ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या रहिवाशी उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी केलं आहे.

****

मध्य रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकावर नियोजित कामामुळे येत्या रविवारपासून काही रेल्वेगाड्या पुढचे काही दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदेड-पनवेल, नांदेड पुणे, निझामाबाद पुणे, निझामाबाद पंढरपूर, या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं केलं आहे.

****

No comments: