Thursday, 1 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.08.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 August 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार

·      मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

·      राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून सुमारे सोळाशे कोटी रुपये हस्तांतरित

·      लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द - यापुढे परीक्षा देण्यास अपात्र घोषीत

·      छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून एक तास शहरासाठीमहास्वच्छता अभियान

आणि

·      पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मुष्टीयुद्ध, बॅडमिंटन तसंच नेमबाजीत भारतीय खेळाडूंची आगेकूच

****

टोयोटा किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होण्यासह, एकूणच राज्य आणि देशातल्या मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असा विश्वास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला आहे. काल मुंबईत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सची निर्मिती करण्याबाबतच्या या नियोजित प्रकल्पासाठी, २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, आठ हजार थेट आणि आठ हजार अप्रत्यक्ष, असे सुमारे १६ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

****

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणार्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे.

****

मराठवाड्यातल्या सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नसून, जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातली आढावा बैठकही काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पाणीपुरवठा योजनेची कामं गतीने पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या निधीसाठी राज्य शासन मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसंच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा घेतला. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला तसंच सर्वच घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ देण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी यंत्रणेला यावेळी दिले.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं एक हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याचं लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं काल राज्य सरकारला हस्तांतरित केले.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग- यूपीएससीनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली असून, आता ती प्रशिक्षणार्थी अधिकारी राहणार नाही, याशिवाय भविष्यातही यूपीएससीची कोणतीही परिक्षा देऊ शकणार नाही. दरम्यान, पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल दिल्लीच्या एका न्यायालयात सुनावणी झाली. आपली दिव्यांग प्रमाणपत्रं खरी असून, आपल्याला सत्तेचाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचा दावा तीनं या याचिकेत केला आहे. न्यायालय याबाबतचा आज निर्णय सुनावणार आहे.

****

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी पदाची शपथ दिली. काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. जयपूर इथं राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

****

यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अर्थसंकल्पात कृषि क्षेत्रासाठी असलेल्या निधीत कपात केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

****

लातूर- मुंबई या रेल्वेगाडीला कळंब रोड तर नांदेड- पनवेल या गाडीला ढोकी इथं थांबा द्यावा, तसंच सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकरता ८० टक्के भूसंपादन पूर्ण करूनच रेल्वे मार्गाची निविदा काढण्यात यावी, अशा मागण्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल लोकसभेत केल्या.

कोरोना महामारीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार याच्यासाठी असणाऱ्या रेल्वेच्या सवलती पूर्ववत सुरू कराव्यात आणि लातूर- मुंबई, बिदर- मुंबई या रेल्वे गाडयांना अतिरिक्त जनरल डबे जोडावेत, या मागण्याही राजेनिंबाळकर यांनी सदनात मांडल्या.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून एक तास शहरासाठीहे शहरव्यापी महास्वच्छता अभियान आजपासून येत्या पंधरा तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता क्रांती चौकापासून या अभियानाची सुरुवात होईल. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अनोखं अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी समाजातल्या विविध घटकांनी सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली असून प्रत्येक नागरिकाला या मोहिमेत सामील करण्याचं उद्दिष्ट आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१- ५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१- १२ असा पराभव केला.

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानं सातवं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल्याने स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं.

मुष्टियोद्धा लोव्हलीना बोर्गोहेन हिनं नॉर्वेच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिरंदाजीत दीपिका कुमारी हिनंही पुढच्या फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे.

टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाला. यासोबतच या स्पर्धेतलं भारताचं टेबल टेनिस एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजार ४४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्याने महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं सुलभ झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

धाराशिव जिल्हयात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ९४ हजार महिलांचे अर्ज आले असून, एक लाख ११ हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव इथं काल कामिका एकादशीनिमित्त परतवारीच्या वारकऱ्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांच्या वस्त्र समाधीला आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते मानाचा आहेर अर्पण करण्यात आला. विठुनामाचा गजर करत शेकडो पायी दिंड्यांमधून आलेल्या भाविकांमुळे नर्सी नामदेव नगरी प्रति पंढरपूर भासत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आयटक संलंग्नित महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे काल आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

राज्यात आजपासून महिनाभर विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व अधिकारी आणि सर्व शाळांनी यात आपला सहभाग नोंदवावा, शी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केल्या आहेत.

****

आजपासून राज्यात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहादरम्यान धाराशिव जिल्ह्यात विविध घटकातल्या नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी शिबीरं तसंच उपक्रम राबवण्यात येणार आहे. महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहेत. महसूल विभागात कार्यरत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं जाणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं पोलिसांनी उमरग्याहून सोलापुरकडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतून सुमारे एक कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

बीड इथल्या मातोश्री शासकीय ई.बी.सी. वसतीगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी येत्या चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन या वसतीगृहाच्या प्रमुखांनी केलं आहे.

****

No comments: