Friday, 2 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:02.08.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 August 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, सिल्लोड इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा कार्यक्रम

·      अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं पारितोषिक

आणि

·      भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात

****

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं, २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, काल हा निर्णय दिला. अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता असून, त्यामुळे सर्व प्रकारच्या मागास वर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही, असं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी या निकालात नोंदवलं. सर्व प्रवर्गात आरक्षणाचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून, शिक्षण आणि नोकरीत अशा प्रकारचं आरक्षण देता येईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

****

हिंदकेसरी ठरलेल्या मल्लांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या ११ वर्षांपासून मिळालेलं नाही, या मुद्याकडे काल राज्यसभेत शून्यकाळात खासदार रजनी पाटील यांनी लक्ष वेधलं. कोणताही खेळाडू असो, त्याचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं, यासाठी विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी त्यांनी केली.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सिल्लोड इथं आयोजित कार्यक्रमात महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना लाभ प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे.

****

लोकमान्य टिळक यांची शतकोत्तर चौथी पुण्यतिथी आणि समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांची शतकोत्तर चौथी जयंती काल साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 'आर्टी' कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. अण्णाभाऊंचं साहित्य, जगण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तींकरता दीपस्तंभासारखं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं शिष्यवृत्ती किंवा कर्ज मिळणं, ही आर्थिक जबाबदारी नसून, ती सामजिक जबाबदारी असल्याचं भान युवकांनी ठेवलं पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यालयाचं संकेतस्थळ, तसंच सहज शिक्षा अॅपचे उद्घाटन ही काल करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पुरेशा निधीची तरतदू करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

**

अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आकाशातल्या ताऱ्याची नोंदणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक सुशील तुपे यांनी अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय तारे आणि अवकाश नोंदणी संस्थेत लोकशाहीरांच्या नावानं तारा नोंद केला आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हा तारा पाहता येणार आहे.

**

नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

**

बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते. शहरातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप झाला.

**

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी धाराशिव शहरातल्या शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा राज्य सरकारने मंजूर केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनीच जागा मंजूर केल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्नीलने ४५१ पूर्णांक चार दशांश गुण घेऊन तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक पटकावलं. स्वप्नीलच्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसाळे याला या कामगिरीबद्दल एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलनं राज्याला वैयक्तिक पदक पटकावून दिलं, असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांनी केला. त्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं.

मध्य रेल्वेनं देखील स्वप्निलला आगाऊ पदोन्नती दिली आहे. सध्या क गटात असणारा स्वप्नील पदोन्नती मुळे राजपत्रित गट ब श्रेणीत गेला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयात सी एस एम टी मध्ये क्रीडा विभागात विशेष कार्य अधिकारी म्हणून त्याला नेमणूक मिळाली आहे.

दरम्यान, या स्पर्धेत काल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात अंजुम मौदगील आणि सिफ्त कौर या पात्रता फेरीत जाण्यात अपयशी ठरल्या. मुष्टियुद्ध स्पर्धेत निखत जरीन हिला ५० किलो वजनी गटात सोळाव्या फेरीत चीनच्या अव्वल मानांकित वू यू हिच्याकडून पराभव पत्कारावा लागला. तर हॉकीमध्ये पात्रता फेरीत भारतीय संघाला बेल्जियमनं दोन - एक असं पराभूत केलं.

बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीत चीनच्या खेळाडुकडून १९ - २१, १४ - २१ असा पराभव झाला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं भारताच्याच एच एस प्रणॉयचा २१ - १२, २१ - सहा असा पराभव करत पुढची फेरी गाठली. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचा मलेशियाच्या जोडीकडून पराभव झाला.  

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेत त्या काल बोलत होत्या. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापर्यंत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडी बहीण योजनेत आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ८७६ अर्ज दाखल झाले आहेत. महसूल पंधरवडा निमित्त या योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, महसूल पंधरवडा निमित्त बीड इथं युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरता आज उमेदवारांच्या ऑनलाईन आणि ऑफलाइन नोंदणीचं आयोजन केलं आहे.

****

पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या प्रवासावर निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं काल जालना इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी स्वागत केलं. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जागतिक पातळीवरचा इन्व्ह्यारोकेअर ग्रीन अवार्ड २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथं नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.

****

बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी ४० हजार रुपये लाच घेतांना, परभणी जिल्ह्यातल्या फुलकळस सज्जाच्या तलाठी दत्ता होणामने याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments: