Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 August 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
लद्दाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण
करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावर
ही घोषणा केली. यानुसार लद्दाखमध्ये आता जांस्कर, द्रास, साम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. भगवान श्रीकृष्णाचा
जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण
झाली असून, मंदीरांसह घरोघरी देखील मध्यरात्री
१२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्णाष्टमीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जन्माष्टमीनिमित्त जुहूच्या
राधा रासबिहारी इस्कॉन मंदिरात आज भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आरती केली.
****
भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या
पहिल्या टप्प्यातल्या ४४ जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली. या टप्प्यासाठी अर्ज
भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तिनही टप्प्यांची मतमोजणी चार
ऑक्टोबरला होणार आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने
निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर
गेल्या अनेक दिवसांपासून हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकत्याच
झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर
यांचा मोठा पराभव केला होता. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून
त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला.
वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी
सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी
दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल
शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत
लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन
खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी आणि
काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना
श्रद्धांजली वाहिली आहे. जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख असं नेतृत्व
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे गमावलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
****
राज्यभरातल्या सर्व बाजार समित्या उद्या २७ ऑगस्ट रोजी
एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. द ग्रेन राइस अॅड ऑइल सीड मर्चंट असोसिएशन - ग्रोमा चे
सचिव भिमजी भानुशाली यांनी आज ही माहिती दिली. अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी
लागू करण्यात आल्याने बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर - सेस रद्द करण्यात
यावा, जीएसटी कायदा सुटसुटीत करुण्यात
यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुपारी मुंबईत बैठक होणार असून, या बैठकीत उद्याच्या बंद बाबत निर्णय होणार असल्याचंही
भानुशाली यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग रस्ते वाहतूकीसाठी
तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना, केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार
बालासाहेब ठेंग यांनी संबंधितांना दिल्या आहेत. गणोशोत्सवाच्या काळात अनेक लोक या मार्गाने
कोकणाकडे जातात, त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी
हा मार्ग खड्डे मुक्त करुन त्याची दुरुस्ती केली जावी, असं निवेदन मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार
रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं, त्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात काल सर्वदूर पाऊस झाल्याने, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी
धरणाची पाणीपातळी ४६ टक्क्यांवर गेली आहे. धरणात ९३ हजार ३३८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिमुसळधार
पावसामुळे राधानगरी धरण १०० टक्के भरलं असून, धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला
पुर आला आहे. गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच असून नदीकाठच्या
नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment