Monday, 26 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांत रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत-राज्यपालांचं आवाहन.

·      २७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं येत्या तीन आणि चार सप्टेंबरला मुंबईत आयोजन.

·      कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय ही नवीन पद्धत सुरू करण्यात येणार.

·      नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं हैदराबाद इथं निधन-उद्या नायगावात अंत्यसंस्कार.

आणि

·      राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणं बसवण्याचा निर्णय.

****

आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या गावांमध्ये रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत, असंही राज्यपालांनी नमूद केलं

****

एक हजार दिव्यांगांना ई-रिक्षासाठी मदत म्हणून १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. आज नागपूर इथं ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तीनचाकींचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असून ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

****

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं  येत्या  तीन  आणि  चार सप्टेंबरला मुंबईत आयोजन होत आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवठा"हा या परिषदेचा विषय आहे. परिषदेमध्ये सहा मुख्य सत्रे आणि सहा उप-सत्रे होणार असून, शासकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार आहेत.

****

लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला. गेल्या ४ डिसेंबरला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.

****

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज हैदराबाद इथं दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या पार्थिव देहावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहतांना, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख नेतृत्व हरपलं, अशा शब्दात शोकभावना व्यक्त केल्या.

****

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल देणार आहे.

****

गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज या महामार्गाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. काम रखडण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई तसंच चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

****

दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पळ न काढता उत्तर द्यायला हवं होतं, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेले ठाकरे यांच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी, ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली.

****

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

****

कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

****

बीड जिल्ह्यातील कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतील चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी आज निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.

****

मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आलं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. शहरातल्या पूजा पवार प्रकरणी दोषीवर कडक कारवाईची मागणीही पाटील यांनी केली आहे. 

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा आज समारोप होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी या कृषी महोत्सवाला आज भेट देऊन पाहणी केली. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४८ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७२ हजार ८९० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंगापूर, दारणा धरणांसह नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली असून, घरोघरी देखील मध्यरात्री  श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल.

छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आज जन्माष्टमी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

****

 

No comments: