Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नांदेडचे
खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हैदराबाद इथल्या किम्स
रुग्णालयात उपचार सुरु होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी
भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा पराभव केला होता.वसंत चव्हाण यांची राजकीय
कारकिर्द १९७८ साली सुरु झाली, त्यावेळी
ते नायगावचे पहिल्यांदा सरपंच झाले होते.२००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली.तिथून
पुढे तब्बल १६ वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात
एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला.नांदेड
जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर वसंतराव
चव्हाण हे या मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश
केला. याशिवाय मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात
आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
वसंतराव
चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार
करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
****
श्रीकृष्ण
जन्माष्टमी आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदीरांसह घरोघरी देखील मध्यरात्री
१२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्णाष्टमीच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
न्याय
प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जयपूरमध्ये राजस्थान
उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते काल बोलत होते.
न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून, अनेक कालबाह्य कायदे सरकारनं रद्द केले आहेत. नुकतेच नवे फौजदारी
कायदे लागू केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातल्या १८ हजार न्यायालयात ई- कोर्ट
प्रणाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज्यपाल हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
नैसर्गिक
शेतीतून निर्माण झालेल्या उत्पादनांची थेट विक्री ग्राहकांना करण्यासाठी, मोठी बाजारपेठ उभारली जाईल, ज्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं गुजरातचे राज्यपाल
आचार्य देवव्रत यांच्या हिंदी पुस्तकाच्या ‘नैसर्गिक शेती’, या मराठी अनुवादाचं प्रकाशन काल गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली
झालं, त्यावेळी ते बोलत होते. सुपीक
जमीनीमध्ये कीटकनाशकं आणि खतांचा मारा करुन, शेती नापीक झाली आहे, आणि
आजारांचंही प्रमाण वाढलं आहे, असं
सांगत आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं.
****
रत्नागिरीत
कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यासाठी टाटा उद्योग समूह आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
यांच्यात काल सामंजस्य करार झाला. रत्नागिरी शहराजवळच्या झाडगाव एमआयडीसीमध्ये या केंद्राचं
भूमिपूजनही झालं. यावेळी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित
होते. दोनशे कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारलं जात असून, एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के खर्च महामंडळाकडून केला जाणार आहे. या केंद्रामुळे
कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होणार असून, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा होणार आहे.
****
पुण्यातून
कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते
सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून
शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल.
****
विश्व
हिंदू परिषदेच्या षष्ट्यब्दी पूर्ती निमित्तानं अशोक सिंघल यांच्या गौरव अंकाचं प्रकाशन
काल नाशिक इथं झालं. सर्वोच्च न्यायालयातले ज्येष्ठ अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी एक देश एक विधान या विषयावर बोलताना त्यांनी जोपर्यंत कठोर कायदे होऊन त्याची अंमलबजावणी होत
नाही, तोपर्यंत गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार
कमी होणार नाही, असं मत व्यक्त केलं.
****
अमरावती
इथं काल सकल हिंदू समाज आणि अनेक हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने बांगलादेशातल्या हिंदूंवर
होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल
बोंडे उपस्थित होते.
****
मालदिव
इथं सुरु असलेल्या आशिया सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेतल्या मारुहाबा चषक स्पर्धेत काल
भारतानं रौप्य पदक जिंकलं. कमाली पी, अजीश अली, श्रीकांत डी आणि संजय सेल्वामणी
यांचा समावेश असलेल्या विजेत्या भारतीय संघानं पहिल्यांदाच या स्पर्धेत पात्रता मिळवली
होती.
****
No comments:
Post a Comment