Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 September
2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने यासंदर्भातील
उपाययोजना अधिक कार्यक्षमपणे करण्याची गरज आहे. यामध्ये तंत्रज्ञानाची
मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. त्यात आणखी अधिनिकीकरण करण्याची
आवश्यकता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज केलं. नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र-आयफोरसी च्या
पहिल्या स्थापना दिवस सोहळ्याला ते संबोधित करत होते. याप्रसंगी ते सायबर गुन्ह्यांपासून
बचावासाठी प्रमुख उपाययोजनांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सायबर फसवणुकीपासून बचाव केंद्र शाह यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात
आले.
****
गुजरात मधल्या स्टॅच्यू ऑफ यूनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पडू शकेल
याबाबतची सुतराम शक्यता नाही, असे माहिती कार्यालय-पीआयबीच्या सत्यता पडताळणी समितीनं
स्पष्ट केलं आहे. स्टॅच्यू ऑफ यूनिटी ला भेगा पडल्या असून कोणत्याही क्षणी
तो पडू शकतो अशा अफवा काही दिवसांपासून सामाजिक प्रसार माध्यमांवरून प्रसारित होत आहेत
तसंच या पुतळ्याचं छायाचित्रही प्रसार माध्यमांवर फिरत असून यात पुतळ्याच्या कथित भेगा
दिसत आहेत. मात्र, हे छायाचित्र २०१८ मधलं असून तेव्हा हा पुतळा निर्माणाधीन होता आणि त्याचे काही
भाग पूर्ण व्हायचे होते. त्यामुळे या पुतळ्याला भेगा पडल्याचा आभास निर्माण केला
जात असल्याचं या समितीनं स्पष्ट केलं आहे.
****
देशात सध्या २४ कॅरेट सोन्याचा
भाव ७३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे. दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम
सुरू झाल्यावर सोन्याचे दर ७६ हजारांहून अधिक होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी
व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत
शेअर बाजारातही सोन्याने नवे उच्चांक गाठण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे यावर्षी
सप्टेंबरमध्ये सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या
लग्नसराईसाठी ज्वेलर्सकडे आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या
दागिन्यांची विक्री आणि आगाऊ बुकिंग ५० टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करण्यात येत
आहे.
****
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा
तालुक्यातल्या सोंडले इथे होणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जामफळ
कनोली उपसा सिंचन योजनेतंर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचं भुमिपुजन समारंभ कार्यक्रमासाठी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे बारा वाजता गोंदूर विमानतळावर पोहोचले. प्रशासनाच्यावतीने त्यांचं
स्वागत करण्यात आलं.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह कार्यकर्त्यांनी
आंदोलन करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. धुळे तालुक्यातील बाभळे फाट्यावर
हे आंदोलन करण्यात येत असतांना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अप्पा साळवी यांचं काल
रात्री रत्नागिरीतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. आज सायंकाळी
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अप्पा साळवी यांनी १९९०च्या
सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी निभावली. १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी
आमदार म्हणून राजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. रत्नागिरी
मध्ये शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विविध शासकीय
समित्यांमध्ये, तसंच अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अभ्यासू भाषणं
करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. राजापूर तालुक्यात पाणीयोजना उभारण्यात त्यांचं महत्त्वाचं
योगदान होतं.
****
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या
बाजूने ध्वनी अडथळे बसवण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत, 87.5 किलोमीटरच्या पट्ट्यात
ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत. गुजरातमध्ये एक लाख,75 हजार पेक्षा जास्त ध्वनी
अवरोधक बसवण्यात आले आहेत. एक किमीच्या विस्तारासाठी दोन्ही बाजूला दोन हजार ध्वनी अवरोध
स्थापित केले आहेत.
****
नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय दवाखानाच्या भोवतालच्या १०० मीटर परिसरात ढोल, ताशा, डॉल्बी सिस्टीम आदी कर्णकर्कश्श वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सभेसाठी, भाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक यांचा वापर हा दिवसा सकाळी ६ ते रात्री १०
यावेळेतच ५० डेसीबल आवाज क्षमता मर्यादेत करता येईल.
****
No comments:
Post a Comment