Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
• संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वेगानं वाटचाल-संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन.
• एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा.
• मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचं दिल्ली इथं निधन.
आणि
• मांजरा धरणात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा-जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा.
****
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. वायूसेनेने सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं राजनाथसिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले..
६० वर्षो बाद भारत के आसमान मे इतनी बडी टेकनिकल एक्सरसाइज आयोजित कियी गयी हैं। सब से पहले मे एक्सरसाइज को कंडक्ट कराने के लिय इंडियन एअर फोर्स ओर इस एक्सरसाइज से जुडे सभी स्टेट होर्डस को हार्दिक बधाई देता हुं। भारतीय वायु सेना अपनी स्थापना के समय से आपनी शक्ति ओर शौर्य के लिय जानी जाती रही हैं। देश को जब जब जरूरत पडी, वायु सेनाने डटकर उस परिस्थिती का सामना करना पडा और उस अपनी शक्ति का प्रदर्शन करते हूये, राष्ट्र का मस्तक सारे विश्र्व मे उंचा किया हैं।
चौदा तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. अनेक उत्पादनं आणि तंत्रज्ञानांची चुणूक त्यात बघायला मिळणार आहे. यंदाच्या तरंग शक्ती सरावाचा हा दुसरा अंक असून त्यात १० देश सहभागी झाले आहेत, तर १८ देश निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत. तरंगशक्तीमध्ये भारत आणि मित्र देशांच्या हवाई सामर्थ्याची आणि नवनवीन आविष्कारांची चुणूक नागरिकांना बघायला मिळणार आहे.
****
‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकारण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
दरम्यान, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं.
यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता अवघ्या १० मिनिटात पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वर्सोवा ते विरार असा हा प्रकल्पही राबवला जात असून, त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वर्सोवा हे अंतर केवळ ४० मिनिटात पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं, महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे
****
शिवसेना जातीच्या नावाने उमेदवारांची चाचपणी करत नाही आणि करणार नाही, असं शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते बीड इथं पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिवसैनिक आणि संघटना म्हणून शिवसेनेच्या विचारानेच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्यात येईल, असंही दानवे यांनी सांगितलं.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी खासदार सीताराम येचुरी यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्ली इथल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. येचुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद कांगो यांनी, येचुरी यांच्या निधनानं डाव्या चळवळीची हानी झाल्याची भावना व्यक्त केली.
अत्यंत मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. विशेषत कम्युनिस्टामध्ये फार कमी गुण असतात की पक्षाच्या बाहेर लोकांना त्यांच्या बद्दल आपले पण वाटते. सिताराम येचुरी असे एक नेते होते की त्यांच्या वक्तृत्व गुणांमुळे आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे ते अनेकांना आपले हवेहवेसे वाटत होते. मला असं वाटतं की हे फार महत्वाच त्यांचं योगदान होतं की कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी असतांना फक्त वर्गीय पुढारी न राहता ते आम जनतेचे पुढारी झाले होते. त्यामुळे त्याचं नसणं हे डाव्या चळवळीला फार मोठी हानी आहे असं माझ मतं आहे.
संसदेत वेळोवेळी जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या येचुरी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना भाकपचे राज्य सह सचिव राम बाहेती यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी, कम्युनिस्ट चळवळीतला प्रगल्भ तारा हरपला, या शब्दांत तर भाकप राज्य कार्यकारिणीचे सदस्य विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी, येचुरी यांचा प्रभावी आवाज आणि मुद्देसूद मांडणी देशाच्या कायम स्मरणात राहील, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
हिंगोली जिल्ह्यातले मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पुरभाजी सखाराम हेंद्रे यांचं आज वृद्धापकाळाने आज निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं त्यांची प्राण ज्योत मावळली. उद्या १३ सप्टेंबर रोजी आखाडा बाळापूर इथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेहून परतलेल्या भारतीय संघाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन, सर्व दिव्यांग खेळाडूंचं अभिनंदन केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यावेळी उपस्थित होते. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय संघानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २३ पदकं जिंकली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या संविधान संपवणार या वक्तव्याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आज नागपूर इथल्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. गांधी यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात उद्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज हिंदूत्वादी संघटनांनी निषेध आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव असलेल्या पत्रक जाळण्यात आलं.
****
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा तथा ध्वजारोहणा संबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्यासंदर्भात आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. हा सोहळा सिद्धार्थ उद्याना होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थत होते.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात धनेगाव इथलं मांजरा धरण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जास्त झाल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे संबंधित गावांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
****
लातूर- धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माकणी इथल्या निम्न तेरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून, सध्या धरणातील पाणी पातळी ६०३ पुर्णांक ५५ मीटर आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची येणारी आवक पाहता धरणातून पाणी सोडण्यात येऊ शकतं, त्यामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीकाठावरील गावात पूरस्थिती उद्भवू शकते त्यामुळे नदी काठावरील गाव आणि वस्त्यांना सतर्कतेच्या इशार देण्यात आला आहे.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या ९८ पूर्णांक ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
गणेशोत्सवाची येत्या १७ तारखेला सांगता होणार आहे. गणेश विसर्जनासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा महापालिकेने सर्व १० प्रशासकीय कार्यालयांतर्गत ४६ मूर्ती संकलन केंद्र स्थापन केली आहेत. महानगरपालिकेला निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.
****
हिंगोली इथं गणपती आणि गौरीसमोर वेगवेगळे देखावे साकारण्यात आले आहेत. रांगोळीतून स्त्रीमुक्तीचा संदेश देणारे देखावे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. माजी नगरसेवक चंदू लव्हाळे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीच्या आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून महिला जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणाऱ्या फार्म हाउस, मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळा तसच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर बंदी घातली आहे. लेझर वापरामुळे विमान चालकांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत ही बंदी लागू असेल, असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 12 September 2024
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...
No comments:
Post a Comment