Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची २७ वी बैठक आज पुण्यात सुरू झाली आहे. राज्य सरकारकडे या आंतरराज्य परिषदेचं यजमानपद असून ही बैठक गृह मंत्रालय सचिवालयानं आयोजित केली आहे. या बैठकीनंतर शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरातही हा कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर हेलिकॉप्टरनं ते वेरुळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वराच दर्शन घेऊन वेरुळ लेणीला भेट दिल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर हेलिकॉप्टरनं त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घघाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं विमानानं आगमन झालं. विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. समाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसंच कुलगुरु डॉ. विजय फुलारी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
****
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं पुसा कृषी विज्ञान मेळा २०२५ चे उद्घघाटन केलं. उन्नत कृषी - विकसित भारत ही मेळ्याची संकल्पना आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या पिकांच्या आधुनिक जाती आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन याठिकाणी भरवण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेळ्यात आधुनिक तसंच हवामान पूरक शेती, पिकातील विविधता आणि उद्योजकता विकास यासारख्या विषयांवर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना इथं आज पहाटे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफ्राबाद तालुक्यातल्या पासोडी इथं सुरू असलेल्या पुलाच्या कामावरील मजूर रात्री झोपले असताना ही दुर्घटना घडली. वाहन चालकानं वाळूने भरलेला ट्रक रात्री मजूर झोपलेल्या ठिकाणी रिकामा केला. यामध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलीसांनी सांगितलं.
****
मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला कर्मचारी भरतीबाबतच्या प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायाधीश ए. एस. गडकरी आणि कमल खटा यांच्या खंडपीठानं कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर स्वेच्छेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना काल या सूचना दिल्या.
****
कर्जविषयक माहिती देण्यासंबंधीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल काही वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेने काल दंड ठोठावला. यात सिटीबँकेला २९ लाख रुपये, आशिर्वाद मायक्रो फायनान्स कंपनीला सहा लाख वीस हजार आणि जेएम फायनान्शियल होम लोन लिमिटेडला एक लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील कर्जदारांकडून वेगवेगळे व्याजदर आकारण्याची कारणे न देणे, आणि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा, या उद्देश्यानं हे धोरण आखणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. काल कोल्हापूर इथं झालेल्या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. आधारभूत दरानुसार महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघामार्फत हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन पिकाची नोंदणी करुन शेतमाल विक्रीसाठी न्यावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यु. राठोड यांनी केलं आहे. ही तूर खरेदी १३ मे पर्यंत सुरु राहणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात आज रौप्य महोत्सवी अभिरूप न्यायालय स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातले पंचवीसहून जास्त संघ सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
****
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment