Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 February 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
मराठी भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं
खुली केली-९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात
पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
भाषा समृद्ध होण्यासाठी सामान्य माणसांच्या भाषेला सामावून
घेण्याची गरज संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्याकडून व्यक्त
·
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर
दौऱ्यावर
·
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आज प्रधानमंत्री
ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण
आणि
·
दहावीच्या परीक्षेला सुरुवात-बदनापुरात
पेपर फुटल्याच्या वृत्ताचं जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडन
****
मराठी
भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं खुली केली, असं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ९८ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं,
त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार आता प्रादेशिक
भाषांमध्ये शिक्षणाला प्राधान्य देत असून, इंग्रजी भाषेअभावी
प्रतिभावंतांना दुर्लक्षित करणाऱ्या विचारांना थांबवलं असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष
वेधलं. मराठीतल्या नामवंत साहित्यिक आणि लेखकांचा त्यांनी आपल्या
भाषणातून गौरव केला.
‘‘लोकमान्य तिलक ने गीता रहस्य भी
मराठी में ही लिखी थी। लेकिन, उनकी इस मराठी रचना ने पूरे देश
में एक नई ऊर्जा भर दी थी।
साथियों,
मराठी भाषा और मराठी
साहित्य ने समाज के शोषित, वंचित वर्ग के लिए सामाजिक मुक्ति के द्वार खोलने का
भी अद्भुत काम किया है। ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले,
महर्षि कर्वे,
बाबा साहेब आंबेडकर,
ऐसे कितने ही महान
समाज सुधारकों ने मराठी भाषा में नए युग की सोच को सींचने का काम किया था।’’
संमेलनाध्यक्ष
तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य महामंडळाच्या
अध्यक्षा उषा तांबे, मावळते अध्यक्ष रविंद्र शोभणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निमंत्रक संजय नहार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महामंडळाच्या
अध्यक्ष उषा तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात, हे संमेलन मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी
असलेलं नातं अधिक जवळ आणणारं असल्याचं सांगितलं.
माजी केंद्रीय
मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं सत्र पार पडलं. यावेळी मावळते
अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्याकडून तारा भवाळकर यांनी संमेलनाची सूत्रं स्वीकारली.
यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी, प्रमाण लेखनाइतकीच
बोलीभाषाही महत्त्वाची असल्याने, सामान्य माणसांच्या भाषेला सामावून
घेतले तरच भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असं प्रतिपादन केलं.
दिल्लीतल्या
तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत होत असलेल्या
या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन,
विविध विषयावर परिसंवाद, आदी कार्यक्रम होत आहेत.
संमेलनानिमित्त
काल सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विविध साहित्यिक, राजकारणी,
साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास
त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने
वेरुळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वर दर्शन आणि वेरुळ लेणीला भेट
दिल्यावर दुपारी तीन वाजेनंतर त्यांचं हेलिकॉप्टरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला
प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
‘‘कुलपती तथा राज्यपाल
सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या दीक्षांत समारंभात
पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त
पात्र विद्यार्थी तसंच पीएच.डी संशोधकांना पदव्या प्रदान करण्यात येतील. एकूण ५६ हजार
१२२ विद्यार्थ्यांनी या सोहळयात पदवी घेण्यासाठी अर्ज केले आहेत.
दरम्यान, पीएम उषा
प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन,
आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक
संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत.’’
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री केंद्रीय सहकार
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शहा यांच्या
उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक आज होणार आहे. बालेवाडी इथल्या
श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री
ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना
मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या
लेखी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य
केंद्रावर परीक्षा होत असून, १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परिक्षा
देत आहेत.
दरम्यान, जालना
जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा
खुलासा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी
केला आहे. खरी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेलीच
नाही, काही दुकानदारांनी बनावट प्रश्नपत्रिकांच्या छायाप्रती
विकल्याचं पांचाळ यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘दहावीचा
पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करुन देण्यात आली अशी बातमी प्रसार
माध्यमांवर होती, तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरीत जालन्यामध्ये
कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आणि तो रेजिस्टंट
मध्ये काही लोकांनी तेथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यावर कायदेशीर कारवाई
करण्यात येत आहे. पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये
झालेला नाही.’’
जालना जिल्ह्यात
तळणी इथल्या जिल्हा परिषद प्रशालेत गर्दी केलेल्या पालकांना पोलिसांच्या मदतीनं परीक्षा
केंद्राच्या बाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
बीड जिल्ह्यात
१५३ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून, कुठलाही अनुचित
प्रकार होऊ नये याकरता सात भरारी पथकांसह १५६ बैठे पथक नियुक्त केले आहेत.
****
महसूल
विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना काल नांदेड इथं सुरुवात झाली. श्री
गुरूगोविंदसिंहजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव
राजेशकुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत
चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे अडीच हजार कर्मचारी नांदेडमध्ये
आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
****
जालना
जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात काल दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एक
बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू
झाला, तर पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. जखमींवर
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
धाराशिव
जिल्ह्यातले तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांचं काल वृद्धापकाळानं
निधन झालं. त्यांनी मराठवाडा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षपद तसंच शेतकरी
कामगार पक्षाचे नगराध्यक्षपद भूषवले. त्यांच्या पार्थिव
देहावर काल तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. ते
तुळजापूर नगरपरिषदेत नगरसेवक तसंच विविध समितीचे सभापतिपदी कार्यरत होते.
****
अश्लिल
चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी गुजरात पोलीसांनी काल लातूर इथून एका तरुणाला अटक केलं. प्रज्वल
तेली असं या तरुणाचं नाव असून तो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील रहिवासी आहे.
याप्रकरणी इतर राज्यातून आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी
दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात
कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे अपर
मुख्य सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले आहेत. काल परभणी
इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुशासन निर्देशांकामध्ये
जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल यासाठी सर्व विभागांनी कसोशीने प्रयत्न करावेत,
अशा सूचना त्यांनी केल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन
शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त
शिवार, या योजनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून,
ज्या शेतक-यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल, त्यांनी
तो घेऊन जावा, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment