Saturday, 22 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.02.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 February 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर हेलिकॉप्टरनं ते वेरुळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वराच दर्शन घेऊन वेरुळ लेणीला भेट दिल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर हेलिकॉप्टरनं त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घघाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण आज करण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलं आहे.

****

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं येत्या २६ तारखेला महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या पवित्र स्नानाची तयारी सुरू झाली आहे. या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल महाकुंभ परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेतला.

दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६९ कोटी ३१ लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी २८ लाख भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज १९व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात सहा परिसंवाद, १४ गटचर्चा, एक विशेष व्याख्यान, चार कविसंमेलनं, साहित्य संवाद यासारखे कार्यक्रम तसंच अजिंठा दृश्य कलादालन असणार आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे. आज सकाळी औरंगपूरा परिसरातल्या महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून विचार यात्रेला सुरूवात झाली.

****

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या वेरुळ इथं २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत मोठी यात्रा भरणार आहे. या कालावधीत घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता धुळे सोलापूर महामार्ग आणि खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरील जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, वेरुळ, खुलताबाद, दौलताबादकडे जाणारी जड वाहतूक छत्रपती संभाजीनगर -शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी- कसाबखेडा फाटा-वेरुळ बायपास मार्गे- कन्नडकडे जाईल.

तर कन्नडकडून -वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतूक कन्नड-वेरुळ बायपास- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल. तर फुलंब्रीकडून- सुलतानपूर, खुलताबाद, वेरुळकडे जाणारी जड वाहतूक फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी - कसाबखेडा फाटा- वेरुळ बायपास मार्गे कन्नडकडे जाईल.

****

क्रिकेट - महिला प्रीमियर लीगमध्ये आज संध्याकाळी बंगळुरूमध्ये यूपी वॉरियर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली यूपी वॉरियर्सनं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, तर दिल्ली कॅपिटल्सनं तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

काल बंगळुरूमध्ये झालेल्या मुंबई विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात मुंबई इंडियन्सनं बंगळुरूचा ४ खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित २० षटकांत ७ खेळाडू गमावून १६७ धावा केल्या. हे आव्हान मुंबई इंडियन्सनं १९ षटकं आणि पाच चेंडूंत सहा खेळाडू गमावून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं ५० धावा केल्या.

****

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...