Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 May 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
गोव्यातल्या शिरगाव इथल्या प्रसिद्ध
लैराई जत्रेत आज सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला तर १५
हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिरगाव मधल्या
श्रीगाओमध्ये लैराई देवी मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली. या जत्रेत मोठ्या संख्येनं
नागरिक उपस्थित होते. अचानक गर्दी अनियंत्रित झाल्यानं चंगराचेंगरी झाली. जखमींवर गोवा जिल्हा रुग्णालयात इथं उपचार सुरु असून गोव्याचे मुख्यमंत्री
डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली तसंच जखमींच्या उपचाराचा
संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी घोषणा केली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संवाद साधून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून या कठीण प्रसंगात पाठीशी असल्याचं त्यांनी
म्हटलं असल्याचंही सावंत यांनी सांगितलं आहे.
****
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची
एकूण निर्यात आठशे चोवीस पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली
आहे. रिझर्व्ह बँकेनं मार्च २०२५ साठी सेवा व्यापाराबद्दल ही आकडेवारी जारी केली आहे.
गेल्या वर्षीच्या सातशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक
१ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या आकडेवारीपेक्षा
यावर्षीची निर्यात सहा पूर्णांक १ टक्क्याने जास्त असून हा देशाच्या निर्यातीमधला एक
महत्वाचा टप्पा आहे.
सेवा निर्यातीच्या वाढीचा वेग वाढत
राहिल्यामुळं सेवा निर्यात मार्च २०२४ मध्ये असलेल्या ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत
मार्च २०२५ मध्ये १८ पूर्णांक ६ टक्क्यांनी वाढून ३५ पूर्णांक ६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर
पोहचली.
****
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर
काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या अकारण गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर
दिलं. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं लहान शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे संरक्षण
सूत्रांनी सांगितलं.
****
मुंबईत आयोजित वेव्हज् परिषदेत आज
कम्युनिटी रेडीओवरील राष्ट्रीय संमेलनासह अनेक आकर्षक लोककला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या परिषदेत काल आठ हजार
कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले आणि जागतिक माध्यम संवाद कार्यक्रम
तसंच रेडिओ रि-इमॅजिन्ड या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. या वेव्हज् परिषदेत जगभरातले आशय निर्माते, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी
अधिकारी सहभागी होत आहेत.
****
सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर
इथं आयोजित पर्यटन उत्सवाचं, आंतरराष्ट्रीय महोत्सवाला
साजेसं असं आयोजन होत आहे, या महोत्सवामुळे पर्यटन
वाढीला निश्चितपणे चालना मिळेल तसंच महाबळेश्वरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र
शासन यांच्यातर्फे आयोजित महाबळेश्वर इथं महापर्यटन उत्सवाचं उद्घघाटन काल उपमुख्यमंत्री
शिंदे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कालपासून सुरु झालेला हा उत्सव उद्या चार तारखेपर्यंत चालणार आहे.
****
आदिवासी समाजाची आदर्श आणि लोकप्रिय
संस्कृती जीवंत राहिली पाहिजे, यासाठी शासन कटिबद्ध
असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी म्हटलं आहे. आदिवासी स्वातंत्र्यवीर
राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्त्याहत्तराव्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे इथल्या कारागृहामध्ये
आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे
आदी उपस्थित होते. आदिवासी समाजाला जल, जमीन, जंगलाची मुक्ती मिळाली पाहिजे. आदिवासी समाजाचा विकास व्हायला हवा, हा समाज मुख्य प्रवाहामध्ये यायला
हवा. हा संकल्प घेऊन कार्यरत राहू, असं मंत्री उईके यावेळी
म्हणाले.
****
भारतीय महिला हॉकी संघ आज पर्थमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. सामना भारतीय
वेळेनुसार दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल. या दौऱ्यातल्या पहिल्या सामन्यात
आस्ट्रेलियन संघानं भारतीय संघावर विजय
मिळवला आहे. पुढील वर्षी होणारा विश्वचषक आणि या वर्षाच्या अखेरीस युरोपमध्ये होणाऱ्या
हॉकी प्रो लीग लक्षात घेऊन, भारतीय संघ नवीन योजना
आणि रणनीती देखील वापरून पाहत आहे.
****
हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना
उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला इथं ४४ अंश सेल्सिअस आणि सोलापूर इथं ४४ अंश
सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवलं गेलं. पुढील काही दिवस तापमान अस्थिर राहणार असून
आरोग्य विभागानं या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं
आवाहन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment