Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 07 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
भारताने काल रात्री पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी ठिकाणांवर
हल्ला केला. या मोहिमेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले
अतिरेक्यांचे महत्त्वाचे तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री
दीडच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार भारतानं केलेल्या या
हल्ल्यामध्ये ९० अतिरेकी ठार झाले आहेत. तर अनेक दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.
****
भारताच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पहलगाम
हल्ल्यानंतर भारताने केलेल्या या लष्करी कारवाईची सविस्तर माहिती पत्रकार
परिषदेमध्ये दिली. पाकिस्तानच्या मदतीनं भारताविरोधात होणाऱ्या अतिरेकी कारवाया, आणि त्यांची पाठिशी असणाऱ्यांना मुळासकट उखडून फेकण्यासाठीची ही कारवाई आहे.
या कारवाईची माहिती सर्वांना देण्यात आली आहे, असं
विदेश मंत्रालयानं म्हटलं आहे. कर्नल
सोफिया कुरेशी,
यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं की, मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत ही कारवाई
करण्यात आली. यात पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवरील अतिरेकी तळ पूर्णतः उद्ध्वस्त
करण्यात आले.
****
भारतीय संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात केवळ पाकिस्तानमधील अतिरेकी तळांवर हल्ला करून
ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत कुठेही पाकिस्तान लष्करी तळ अथवा
सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी
हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेकी संघटनांच्या ठिकाणांनाच या कारवाईत लक्ष्य
करण्यात आले आहे.
****
काल रात्री भारतीय हवाईदलानं पाकिस्तानवर एअर स्टाईक करीत
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर असं भारताच्या या
मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील
अतिरेकी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन यासह इतर दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले.
****
कोटली, बहावलपूर, मुरीदके,
सियालकोट आणि मुझफ्फराबाद इथल्या अतिरेकी तळांवर भारताने
मध्यरात्री क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी अड्डे
पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यामध्ये ९० हून अतिरेकी मारले गेल्याचे
वृत्त आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
****
हवाई हल्ल्यानंतर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोबाल
यांनी अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली आणि भारताने केलेल्या
कारवाईची माहिती दिली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम् यांनीही
प्रतिक्रिया देत भारताला अशी कारवाई करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.
इस्रायलच्या राजदुतांनीही भारताने केलेल्या या कारवाईचे समर्थन केलं आहे. भारताला
या कारवाईचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. भारताने केलेल्या कारवाईची
माहिती वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अनेक देशांमधील त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली
आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी
अरेबिया,
संयुक्त अरब अमिरात आणि रशिया यांचा समावेश आहे.
****
मध्यरात्री पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करीत भारतीय सैन्यानं
केलेल्या कारवाईनंतर त्यावर देशातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भारताच्या
लष्कराचा आपल्याला अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यानंतर ``भारत माता की जय`` अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी आम्हाला भारतीय लष्कराचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूर हे
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्त्यूत्तर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर विदेशमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबायला हवं. विरोधी
पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या लष्करावर आम्हाला गर्व असल्याचे प्रतिक्रिया
देताना म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी ``ऑपरेशन
सिंदूर की जय हो``, असं आपल्या प्रतिक्रियेत
म्हटलं आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांनी ``जय हिंद,
जय हिंद की सेना`` अशी
प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय
मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या प्रतिक्रियेत ``जय
हिंद,
जय हिंद की सेना`` असं
म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही
भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ
ठरवत,
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री पहलगाममधील दहशतवादी
हल्ल्याचा बदला घेतल्याचं म्हटलं आहे.
****
भारताच्या कारवाईनंतर मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने
जम्मू-काश्मीरजवळील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून
अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
भारतीय हवाई दलाने श्रीनगर विमानतळ बंद केल्याची पुष्टी केली आहे. यामुळे आज सर्व
नागरी उड्डाणे पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. हज यात्रेकरूंसह सर्व प्रवाशांना
संबंधित अधिकाऱ्यांकडून विमान वाहतुकीच्या स्थितीबद्दल माहिती घेण्यास सांगण्यात
आलं आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा आणि
गुरेझमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद राहतील. काश्मीर
विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment